Home पुणे *डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून धर्म स्वातंत्र्य विधेयकाचे स्वागत;बेकायदेशीर धर्मांतराला बसणार कायदेशीर चाप*

*डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून धर्म स्वातंत्र्य विधेयकाचे स्वागत;बेकायदेशीर धर्मांतराला बसणार कायदेशीर चाप*

11
0

पुणे, दि. ३ : महाराष्ट्रात बेकायदेशीर, जबरदस्तीने, फसवणूक, प्रलोभन किंवा दबावाद्वारे होणाऱ्या धर्मांतराला आळा घालण्यासाठी राज्य विधिमंडळाने मंजूर केलेल्या धर्म स्वातंत्र्य विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्याबद्दल शिवसेना नेत्या तथा विधान परिषदेच्या सदस्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्वागत केले आहे.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “धर्म स्वातंत्र्याचा घटनात्मक हक्क अबाधित ठेवत बेकायदेशीर आणि सक्तीच्या धर्मांतराला प्रतिबंध घालण्यासाठी हे विधेयक महत्त्वाचे ठरणार आहे. स्वतःच्या जाणिवेने, वैचारिक आणि धार्मिक श्रद्धेच्या आधारे होणाऱ्या धर्मपरिवर्तनाला या कायद्याचा विरोध नाही. मात्र, प्रलोभन, दबाव, फसवणूक किंवा इतर बेकायदेशीर मार्गांचा वापर करून घडवून आणल्या जाणाऱ्या धर्मांतराला प्रतिबंध करणे हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे.”

डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री मा. श्रीमती सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली हे विधेयक राज्याच्या दोन्ही सभागृहांत मंजूर झाले होते. आता राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यामुळे या कायद्याच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला असून संबंधित नियमावलीही लवकरच लागू होईल, अशी अपेक्षा डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली.

सामान्य नागरिकांनी या कायद्याची माहिती करून घ्यावी आणि धर्म स्वातंत्र्याच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी त्याचा योग्य उपयोग करावा, असे आवाहनही डॉ. गोऱ्हे यांनी केले.

शिवसेना नेत्या, विधान परिषदेच्या सदस्या आणि महिला चळवळीतील कार्यकर्ती या नात्याने धर्म स्वातंत्र्याच्या हक्काचे संरक्षण करणाऱ्या आणि बेकायदेशीर धर्मांतराला प्रतिबंध करणाऱ्या या कायद्याला राष्ट्रपतींनी दिलेल्या मंजुरीचे मी मनःपूर्वक स्वागत करत असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.
——

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here