पुणे.दि.२: राज्यातील काही महिला लोकप्रतिनिधींशी संबंधित आक्षेपार्ह ऑडिओ संभाषणे सोशल मीडियावर व्हायरल झाल्याच्या प्रकरणाचा सखोल तपास गुन्हे अन्वेषण विभाग (CID) यांच्याकडे सोपविण्यात यावा, अशी मागणी शिवसेना नेत्या व विधान परिषदेच्या सदस्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. हे निवेदन उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. सुनेत्रा पवार, पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनाही पाठविण्यात आले आहे.
डॉ. गोऱ्हे यांनी म्हटले आहे की, या प्रकरणात केवळ ऑडिओ व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई करून थांबणे पुरेसे नाही. संबंधित ऑडिओंचा मूळ स्रोत, ते कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तयार करण्यात आले आहेत का, संबंधित डिजिटल डेटाचा उगम काय आहे, तसेच या संपूर्ण साखळीत सहभागी असलेल्या सर्व व्यक्तींची चौकशी होणे आवश्यक आहे. या प्रकारामुळे महिला लोकप्रतिनिधींच्या सन्मानाबरोबरच त्यांच्या कामाच्या अधिकारावरही परिणाम होऊ शकतो डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले आहे.
या प्रकरणामध्ये भारतीय न्याय संहिता (BNS) मधील सायबर गुन्ह्यांसह कटकारस्थानासंदर्भातील कलम ६१ आणि इतर लागू कायद्यांनुसार कठोर कारवाई करण्याची मागणीही डॉ. गोऱ्हे यांनी केली आहे.
महिलांचा अवमान करणारे ऑडिओ, व्हिडिओ अथवा अन्य डिजिटल साहित्य सोशल मीडियावर प्रसारित होण्यापूर्वीच रोखण्यासाठी सायबर यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक निर्देश देण्यात यावेत, अशीही मागणी डॉ. गोऱ्हे यांनी केली आहे.
प्रकरणाची व्याप्ती, त्याचे गांभीर्य आणि तपासातील सर्व पैलूंचा विचार करता, संपूर्ण सत्य समोर आणण्यासाठी हा तपास गुन्हे अन्वेषण विभाग (CID) यांच्याकडे सोपविणे आवश्यक असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे. महिलांच्या सन्मान आणि सुरक्षिततेशी संबंधित अशा प्रकरणांमध्ये राज्य शासनाने तातडीने ठोस व कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणीही डॉ. गोऱ्हे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.हे निवेदन
——

















