Home पालघर-ठाणे / नवी मुंबई / रायगड / रत्नागिरी / सिंधुदुर्ग शेतकऱ्यांसाठी सरकार कटीबद्ध ; कर्जमाफी, वीजबिल माफीला वेग मंत्री ॲड. आशिष...

शेतकऱ्यांसाठी सरकार कटीबद्ध ; कर्जमाफी, वीजबिल माफीला वेग मंत्री ॲड. आशिष शेलार यांची ग्वाही

8
0

ठाणे, दि. २५ (प्रतिनिधी)
राज्यातील सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना ४८ हजार कोटी रुपयांच्या कर्जमुक्तीचा लाभ देण्याचा ऐतिहासिक निर्णय महायुती सरकारने घेतला असून, शेतकऱ्यांना तांत्रिकदृष्ट्या माहिती पुरवत आर्थिक बळ देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले.
ठाणे येथील भाजप विभागीय कार्यालयात शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार माधवी नाईक, उपमहापौर कृष्णा पाटील, गटनेते मुकेश मोकाशी तसेच जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप लेले, सचिन पाटील आदी उपस्थित होते. बदलते हवामान, अवकाळी पाऊस, दुष्काळ आणि नैसर्गिक संकटांमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष दिलासा देण्यासाठी कर्जमुक्ती आणि वीज बिल माफी योजना राबविण्यात येत असल्याचे स्पष्ट करून ना. आशीष शेलार यांनी, सरकारी, सहकारी आणि राष्ट्रीयकृत बँकांच्या माध्यमातून जास्त अटी-शर्ती न ठेवता कर्जमाफीची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार असल्याचे सांगितले. शेतकरी वीजबिल माफीची अंमलबजावणीही लवकरच सुरू होणार असून, त्यासाठी अर्थसंकल्पात आवश्यक निधीची तरतूद करण्यात आली आहे. वीज वितरण कंपन्यांच्या आर्थिक स्थितीचा आणि शेतकऱ्यांच्या हिताचा समतोल साधत सरकार निर्णय घेणार असल्याचे ना. शेलार यांनी नमूद केले.
महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख, ७.५ अश्वशक्ती पर्यंतच्या कृषी पंपांच्या वीजबिलाबाबत दिलासा, तसेच जलयुक्त शिवार, सिंचन, पीकविमा, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), मृदा परीक्षण आणि हवामानाधारित तंत्रज्ञानाचा वापर करून शेती अधिक सक्षम करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. कापूस, कांदा आणि सोयाबीनच्या शासकीय खरेदीसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या असून, पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ वेळेत मिळावा यासाठी संबंधित यंत्रणांना सूचना देण्यात आल्याचेही ना. शेलार यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here