तळागाळातील नागरिकांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचवणे सर्वांची जबाबदारी – उपसभापती सचिन अहिर*
मुंबई – “रयतेचा राजा सिंहासनावर बसून चालणार नाही, तर राजा प्रजेपर्यंत पोहोचला पाहिजे हीच संकल्पना आणि विचारधारा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या जगण्यातून दाखवून दिली. तोच धागा आणि दूरदृष्टिकोन पकडून महाराष्ट्र शासन ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाच्या माध्यमातून काम करत आहे,” असे प्रतिपादन विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी केले.
वरळी विधानसभा मतदारसंघात आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर अभियाना’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आणि दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून या सामाजिक व शासकीय अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.
उपसभापती सचिन अहिर यांच्या हस्ते या शिबिराचे शानदार उद्घाटन पार पडले. यावेळी मुंबई शहराच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल, कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, सहायक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर, महेश हरीचंद्रे, शिवसेना विभागप्रमुख दत्ता नरवणकर, भाजपचे किरण शेलार आणि माजी नगरसेविका रत्ना माळी यांच्यासह विविध अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान बोलताना सचिन अहिर म्हणाले की, “शासन आणि त्याच्या विविध योजना थेट जनतेच्या दारापर्यंत पोहोचवणे आणि तळागाळातील शेवटच्या घटकाला या योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. केवळ औपचारिकता म्हणून शिबिर न घेता, स्थानिक नागरिकांच्या प्रत्यक्ष गरजेनुसार अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे; जेणेकरून या अभियानाचा मूळ उद्देश खऱ्या अर्थाने साध्य होईल.”
या अभियानात प्रशासनातील तब्बल ३९ विभागांनी एकत्र येत सहभाग नोंदवला. यावेळी वरळी मतदारसंघातील शेकडो गरजू लाभार्थी नागरिकांना विविध शासकीय योजनांची प्रमाणपत्रे आणि दाखल्यांचे वाटप सचिन अहिर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून उपक्रमाचे कौतुक*
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या उपक्रमास विशेष शुभेच्छा दिल्या. “मी स्वतः वाढदिवस साजरा करत नाही; मात्र माझ्या वाढदिवसाचे आणि स्व. अजितदादांच्या जयंतीचे औचित्य साधून जर कोणी सामाजिक उपक्रम राबवत असेल आणि त्यातून शेवटच्या घटकाची सेवा होत असेल, तर त्याला माझा नेहमीच पाठिंबा असतो. एकाच छताखाली नागरिकांना शासकीय सेवा उपलब्ध करून देण्याचा महसूल विभागाचा हा प्रयत्न अत्यंत कौतुकास्पद आहे,” असा संदेश मुख्यमंत्र्यांनी या प्रसंगी दिला.
या शिबिराच्या माध्यमातून शासकीय सेवा थेट जनतेपर्यंत पोहोचवण्याचा एक सकारात्मक संदेश वरळी मतदारसंघातून देण्यात आला.














