मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे ह्या, आज दिनांक १९ जुलै २०२६ रोजी सायंकाळी, एका सोहळ्यासाठी घाटकोपरच्या दिशेने प्रवास करीत होत्या.
त्यावेळी, कुर्ला उड्डाणपुलावर एक लहान टेम्पो दादरच्या दिशेने येताना दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेला पलटी होऊन अपघात झाल्याचे आढळले.
ते पाहून महापौर श्रीमती रितू तावडे यांनी तत्काळ आपले वाहन रस्त्याच्या कडेला थांबवले. सोबतच्या वाहनचालक, सुरक्षा कर्मचाऱ्यांसह, अपघातामुळे पुलावर थांबलेल्या अन्य वाहनातील नागरिकांना एकत्र आणून सदर टेम्पो पुन्हा उभा करण्यासाठी महापौरांनी प्रयत्न केले. टेम्पोतील चालक तसेच क्लिनर यांची विचारपूस केली. टेम्पो चालक व क्लिनर यांना किरकोळ खरचटले होते आणि सुदैवाने गंभीर इजा झालेली नव्हती.



















