Home मुंबई *मॅनहोल सुरक्षेसाठी ‘मॅनहोल रेलगार्ड’ प्रतिकृतीची महापौर रितू तावडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजित...

*मॅनहोल सुरक्षेसाठी ‘मॅनहोल रेलगार्ड’ प्रतिकृतीची महापौर रितू तावडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडून पाहणी*

24
0

*एल विभागामध्ये प्रायोगिक तत्त्वावर चाचपणी; अनुभव व सूचनांच्या आधारे होणार पुढील निर्णय*

मुंबईतील मॅनहोल्सवर कामे करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल व दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ‘मॅनहोल रेलगार्ड’ (Manhole Rail Guard) ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची (प्रोटोटाइप) मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर यांनी महानगरपालिका मुख्यालयात आज (दिनांक १३ जुलै २०२६) प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी विविध नगरसेवक व नगरसेविका देखील उपस्थित होते.

या प्रतिकृतीची सविस्तर माहिती घेतल्यानंतर महापौर तावडे तसेच अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त बांगर यांनी तिच्या प्रभावी वापराच्या दृष्टीने काही सूचना केल्या. मॅनहोलच्या आकारानुसार रेलगार्डचा आकार सहजपणे कमी-जास्त (collapsible) करता येणे, काळोखावेळी दृश्यमानता वाढावी यासाठी त्यावर परावर्तक रंग (reflector) लावणे किंवा लुकलुकणारे दिवे बसवणे, यांसह इतरही सूचना दोघांनी केल्या.

नागरिक आणि महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून या चौकोनी आकाराच्या ‘मॅनहोल रेलगार्ड’ची रचना मजबूत आणि सुटसुटीत करण्यात आली आहे. उंची १ मीटर, लांबी १.५ मीटर आणि रुंदी १.५ मीटर असा आकार असलेल्या या रेलगार्डमध्ये, गरजेनुसार व विविध ठिकाणांच्या आवश्यकतेनुसार वापरासाठी २२५ किलो आणि ८० किलो असे दोन वेगवेगळे वजनी पर्याय उपलब्ध आहेत.

ही प्रतिकृती प्रायोगिक तत्त्वावर (Pilot Project) मुंबईतील एल प्रशासकीय विभाग (L Ward) मध्ये वापरात आणली जाणार आहे. या विभागात प्रत्यक्ष अंमलबजावणी केल्यानंतर, तेथील अनुभव पाहून तसेच तांत्रिक गरजा आणि महानगरपालिका कर्मचारी व नागरिकांकडून मिळणाऱ्या सूचनांच्या आधारे ‘मॅनहोल रेलगार्ड’ची जडणघडण कशी असावी, याबाबत पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

तसेच, या प्रायोगिक चाचणीदरम्यान मिळणारे अनुभव आणि सूचनांचा अभ्यास करून, मुंबईतील इतर सर्व प्रशासकीय विभागांमध्ये या प्रतिकृतीचा वापर करावा की नाही, याबाबतचा पुढील निर्णय महानगरपालिका प्रशासनातर्फे घेतला जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here