मुंबई – विधानपरिषदेच्या सभागृहात आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ सुधारणा २०२६ विधेयकावर चर्चा करताना भाजपा गटनेते आ. प्रवीण दरेकर यांनी कोकणात अशा प्रकारचे विद्यापीठ स्थापन झाले याचा अभिमानच आहे. कोकणातील नव्हे तर राज्यातील पेट्रोकेमिकल, केमिकल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रिक इंजिनिअर सारख्या पदवी अभ्यासक्रमाची व्यवस्था झाली आहे. या कायद्यात सुधारणा चांगल्या आहेत पण विद्यापीठाचा कारभार सुधारण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे नमूद केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ सुधारणा २०२६ विधेयकाला समर्थन देत आ. दरेकर म्हणाले कि, रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी लोणेरे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ आहे. माझाही तो जिल्हा असल्याने या विद्यापीठातील समस्यांबाबत विद्यार्थी व पालक मला भेटत असतात. या विद्यापीठाच्या व्यवस्था सुधारणा करण्याची गरज आहे. परीक्षा व निकालांत गैरप्रकार होतात. या विद्यापीठात अनेक पदे रिक्त आहेत, बांधकाम अपूर्ण आहे, निधीची गरज आहे, विद्यापीठाला प्रादेशिक व उपकेंद्रासाठी अजूनही जागा मिळालेली नाही. मागील काळात या विद्यापीठातील गैरकारभार, गैरव्यवस्थापनासंदर्भात माजी सनदी अधिकारी किशोर निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय त्रिसदस्य समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने विद्यार्थ्यांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी चांगली यंत्रणा उभी करा, निकालानंतर विलंब टाळण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करा, संलग्न महाविद्यालयांसोबत समन्वयाचा अभाव आहे तो दूर करा, शासनाकडून विद्यापीठाला निधी मिळतो त्याचे योग्य नियोजन विद्यापीठाकडून होत नाही त्यात सुधारणा करा, अशा अनेक शिफारशी केल्या आहेत. शिफारशींच्या अनुषंगाने शासनाने विद्यापीठाला नोटीसही बजावली, पण यापैकी किती सुधारणा विद्यापीठ स्तरावर झाली. आजही या तक्रारी कायम आहेत. कोकणात अशा प्रकारचे विद्यापीठ स्थापन झाले याचा आम्हाला अभिमानच आहे. कोकणातीलच नव्हे तर राज्यातील पेट्रोकेमिकल, केमिकल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रिक इंजिनिअरसारख्या पदवी अभ्यासक्रमाची व्यवस्था झाली आहे. कायद्यात सुधारणा चांगल्या आहेत, पण विद्यापीठाचा कारभार सुधारण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे आ. दरेकरांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिले.
00000


















