Home मुंबई *डॉ. सुकृत खांडेकर : ‘अमृतजिव्हा’ ल्यायलेला पत्रकारितेतील ‘डॉक्टर’ ! -योगेश वसंत त्रिवेदी,

*डॉ. सुकृत खांडेकर : ‘अमृतजिव्हा’ ल्यायलेला पत्रकारितेतील ‘डॉक्टर’ ! -योगेश वसंत त्रिवेदी,

32
0

*डॉ. सुकृत खांडेकर : ‘अमृतजिव्हा’ ल्यायलेला पत्रकारितेतील ‘डॉक्टर’ ! -योगेश वसंत त्रिवेदी,

९८९२९३५३२१. “अंरें योंगेंश, आंज कांय लिंहिंलंस ? आज कांर्यक्रम कांय ? अरें तूं बोंलावलंस आणि मीं येंणांर नांहीं, अंसं शंक्यं तरी आंहें कां ? अंरे तूं आणि विंजंय वैंद्य हे मांझ्यांसाठीं पंरकें आहेत कां ? शिंवसेंनाप्रमुख बांळासाहेब ठांकरे यांच्या सांन्निध्यातले आंपण !” अंसं थोंडंसं नांकांतून बोलणं, कुणालाही न दुखावणं, आपलं काम भलं आणि आपण भलं. लिहिणं परखड, लिखाणातून ‘प्रहार’ करणं, ‘मागणी तसा पुरवठा’ हे तत्त्व तंतोतंत पाळणं, हळूहळू सर्व सोपान पादाक्रांत करणं, यासाठी जीभेवर साखर, डोक्यावर बर्फ आणि पायाला भिंगरी असा अमृतजिव्हा ल्यायलेला पत्रकारितेतील ‘डॉक्टर’म्हणजे सुकृत खांडेकर ! अशी ‘अमृतजिव्हा’ ल्यायलेले मराठी पत्रकारितेतील डॉक्टर सुकृत खांडेकर हे आपल्या वयाची ७४, वर्षे पूर्ण करुन ७५ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. सध्याचा काळ हा देशभरात ‘अमृतकाळ’ समजण्यात, मानण्यात येतोय. भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली असून या स्वातंत्र्याला येत्या १५ ऑगस्ट रोजी ७९ वर्षे पूर्ण होत आहेत. (अर्थात भारतीय जनता पक्षाचे लोक २०१४ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले असे मानतात). पंतप्रधान नरेंद्र दामोदरदास मोदी हेही अमृतमहोत्सवी वर्षात वाटचाल करीत आहेत. अनेक जण अमृतमहोत्सव साजरा करीत असतांनाच डॉ. सुकृत खांडेकर हे अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहेत ही ‘अमृताहुनी गोड’ बातमी आहे. वसंतराव त्रिवेदी या माझ्या पत्रकारितेतील विद्यापीठातून पत्रकारितेची पदवी प्राप्त करुन मी १९७३ साली माझी पत्रकारिता सुरु केली. वसंतराव त्रिवेदी यांनी ११ जून १९६६ रोजी सुरु केलेल्या साप्ताहिक आहुति मधून सुरु झालेली माझी पत्रकारिता नवशक्ति, सन्मित्र, ठाणे वैभव, मुंबई सकाळ करीत करीत हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या दैनिक सामना मध्ये १५ डिसेंबर १९८८ पासून मुंबई च्या पत्रकारितेत स्थिरावली. १९८९ साली २३ जानेवारी रोजी दैनिक सामना चे दादरच्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्मारकात दस्तुरखुद्द हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्य संपादक या नात्याने सामना चे प्रकाशन केले. याच वर्षी मी राजकीय प्रतिनिधी म्हणून मंत्रालय आणि विधिमंडळ येथे कार्यरत झालो. याच ठिकाणी सुकृत खांडेकर यांच्या संपर्कात आलो. त्यांच्या नेतृत्वाखालील मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे सहचिटणीस म्हणून जबाबदारी स्वीकारली. शिवसेनेचे नगरसेवक नारायण तातू राणे हे मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम (बेस्ट) समितीचे अध्यक्ष या नात्याने मंत्रालयात पत्रकार परिषद घेण्यासाठी आले. त्यावेळी तेलुगू देसमचे सर्वेसर्वा नंदमुरी तारक रामाराव अर्थात एन टी रामाराव यांची चलती होती. त्यांना एनटीआर म्हणून ओळखायचे. नारायण राणे हे मंत्रालयात आले तेंव्हा मी सुकृत खांडेकर यांना सांगितले की, हे महाराष्ट्राचे ‘एनटीआर’ आहेत. (नारायण तातू राणे) सुकृत खांडेकर यांनी तसा उल्लेख केला. नारायण राणे यांच्या सहित सारेच आश्चर्यचकित झाले. सुकृत खांडेकर यांनी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष होण्याची हॅटट्रिक केली. तशी ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांनी सुद्धा ठाणे जिल्हा पत्रकार संघ तसेच मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ या दोन्ही ठिकाणी अध्यक्षपदाची हॅटट्रिक केली आहे. सुकृत खांडेकर हे प्रारंभी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या केसरी मध्ये वार्ताहर म्हणून कार्यरत असतांना विधानपरिषद दीर्घेत (पत्रकार गॅलरीत) शेवटच्या बाकावर बसून वार्तांकन करीत असत. लोकमान्य टिळक यांचे नातू जयंतराव टिळक हे विधानपरिषदेचे सभापती होते. त्यामुळे सुकृत खांडेकर यांना डोळ्यात तेल घालून काम करायला लागायचे. अर्थात केसरीचे मालक जरी असले तरी जयंतरावांचा हस्तक्षेप नसायचा, मार्गदर्शन जरुर करीत. सुकृत खांडेकर यांनी मग हळुहळू लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स या आघाडीच्या वर्तमानपत्रात काम करतांना अगदी नवी दिल्ली येथे सुद्धा संसदेच्या सभागृहात वार्तांकन केले. ज्या केसरी मध्ये वार्ताहर म्हणून काम केले त्याच केसरीचे संपादक होण्याचा बहुमान सुद्धा त्यांना लाभला. नवी दिल्ली येथे संसदेत पत्रकार म्हणून सुकृत खांडेकर यांना जाण्यासाठी मित्रवर्य विजय तारी यांनी सुद्धा उत्तम भूमिका बजावली आहे. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, मुंबई मराठी पत्रकार संघापासून अगदी खऱ्याखुऱ्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्षपद भूषविण्याची संधी सुकृत खांडेकर यांना मिळाली. एका बाजूला वर्तमानपत्रात काम दुसरीकडे संघटनांच्या जबाबदाऱ्या ही तारेवरची कसरत आपल्या ‘अमृतजिव्हे’ मुळेच उत्तमरित्या पार पाडू शकले. शरद पवार यांच्या पासून राष्ट्रीय नेत्यांमध्ये उठबस करण्याचेही भाग्य त्यांना लाभले. मुंबई मध्ये नवशक्तिचे संपादक म्हणून काम केल्यानंतर त्यांची हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रबोधन प्रकाशन परिवारात काम करण्याची इच्छा होती. परंतु तो योग आला नसला तरी बाळासाहेब ठाकरे यांच्या संपादकत्वाखाली सुरू झालेल्या आणि शिवसेनेचे मुखपत्र म्हणून ओळखण्यात येणाऱ्या दैनिक सामना या राजकीय पक्षाच्या वर्तमानपत्रावर प्रचंड अभ्यास करुन सुकृत खांडेकर यांनी लोकमान्य टिळक विद्यापीठात प्रबंध सादर केला. या टिळक विद्यापीठातून त्यांनी पीएचडी करुन डॉक्टरेट मिळवली. योगायोग असा की जेंव्हा सुकृत खांडेकर यांना डॉक्टरेट मिळाली त्या वेळी ते शिवसेनेचे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या नारायण राणे यांच्या ‘प्रहार’ चे संपादक होते. ज्या दिवशी सुकृत खांडेकर यांनी डॉक्टरेट मिळवली त्या दिवशी त्यांनी नारायण राणे यांच्या कानावर ही गोष्ट घातली. तेंव्हा नारायण राणे यांनी आनंदित होऊन सामना, शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल मनात कटुता न ठेवता खांडेकर यांना स्वतः पेढा भरविला आणि त्यांचे तोंड गोड करीत त्यांच्या आनंदात सहभागी झाले. वास्तविक मराठी पत्रकार संघटनांच्या दृष्टीने ही मोठी अभिमानाची बाब आहे. म्हणून पत्रकार संघटनांनी डॉ सुकृत खांडेकर यांचा माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख आणि मार्मिक, सामना व दोपहर का सामना चे मुख्य संपादक उद्धव ठाकरे यांच्या शुभहस्ते तसेच माजी मुख्यमंत्री खासदार आणि प्रहारचे मुख्य सल्लागार संपादक नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर सत्कार केला असता तर मराठी पत्रकारितेत एक वेगळे चित्र निर्माण झाले असते. असो, अजूनही वेळ गेलेली नाही. विविध पत्रकार संघटनांनी एकत्र येऊन डॉ सुकृत खांडेकर यांच्या अमृतमहोत्सवी वर्षात हा अमृततुल्य योग घडवून आणावा. सध्या डॉ सुकृत खांडेकर हे संपूर्ण महाराष्ट्रात स्टेट लाईन, इंडिया कॉलिंग, बॉम्बे कॉलिंग या नावाने स्तंभलेखन करीत असून कुणाचाही मुलाहिजा बाळगत नाहीत. सातत्याने घडणाऱ्या घटनांवर प्रहार करुन पत्रकारितेत नवशक्ति निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. केसरी , जांभळा, पिवळा, हिरवा हे कोणतेही रंग त्यांना वर्ज्य नाहीत. तसे ते गुलाबीच आहेत. अर्थात हे करतांना कोणत्याही घटकांशी सामना न करता सौजन्यपूर्ण, सौहार्दपूर्ण निकोप वातावरण कसे होऊ शकेल याची पुरेपूर दक्षता ते घेत आहेत. डॉ. सुकृत खांडेकर यांच्या अमृतजिव्हेतून झिरपणारे गोड अमृतवचन ऐकण्याची, जाणून घेण्याची संधी प्राप्त करावी. यासाठी मराठी पत्रकारितेतील विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आलेल्या डॉ सुकृत खांडेकर यांना उदंड आयुष्य आणि ठणठणीत आरोग्य प्राप्त होवो, त्यांचे मार्गदर्शन मराठी पत्रकारितेला सातत्याने मिळत राहो, या मनःपूर्वक शुभेच्छा ! -योगेश वसंत त्रिवेदी, ९८९२९३५३२१. (लेखक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत).*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here