Home मुंबई *सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रलंबित निवृत्तीवेतन दावे प्राधान्याने निकाली काढा*

*सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रलंबित निवृत्तीवेतन दावे प्राधान्याने निकाली काढा*

35
0

*बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाची पेन्शन अदालतीत शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर यांच्या सूचना*

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित निवृत्तीवेतन (पेन्शन) दाव्यांबाबत पेन्शन अदालत शुक्रवार, दिनांक ३ जुलै २०२६ रोजी पार पडली.
शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांनी शिक्षण विभागातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रलंबित निवृत्तीवेतन दावे तातडीने निकाली काढण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या.

शिक्षण समिती अध्यक्षा श्रीमती राजेश्री शिरवडकर यांच्या अध्यक्षतेखाली करी रोड येथील शिक्षण विभागाच्या कार्यालयात ही अदालत पार पडली. या अदालतीस एकूण ८३ सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते. तसेच विविध कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधीही उपस्थित होते.

ज्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे दावे आवश्यक कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी प्रलंबित आहेत, त्यांना सर्व आवश्यक कागदपत्रांची माहिती एकाच वेळी देऊन पूर्तता करून घ्यावी, असे निर्देश श्रीमती शिरवडकर यांनी दिले. तसेच रजा विषयक अथवा इतर आस्थापना विषयक कारणांमुळे प्रलंबित असलेले दावे तात्काळ कार्यवाही करून निकाली काढण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

महानगरपालिका सेवानिवासात वास्तव्यास नसतानाही सेवाअभिलेखामध्ये महानगरपालिका सेवानिवासाचा पत्ता असलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रकरणांमध्ये विधी विभाग व मालमत्ता विभाग यांचे अभिप्राय तातडीने मागवून संबंधित दावे निकाली काढावेत, असेही त्यांनी सांगितले.

विभाग कार्यालय, लेखा अधिकारी कार्यालय, वेतनपत्रक विभाग, रजा पडताळणी विभाग तसेच दक्षता विभाग यांनी परस्पर समन्वय साधून प्रलंबित दाव्यांवर कार्यवाही करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.

पेन्शन अदालतीस उपस्थित राहिलेल्या सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित दाव्यांवर प्राधान्याने कार्यवाही करून ते पुढील दोन ते तीन महिन्यांत निकाली काढण्यासाठी आवश्यक दक्षता घ्यावी, असे निर्देशही शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here