मुंबई – विधानपरिषद सभागृहात आज प्रश्नोत्तराच्या तासावेळी भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी माणगाव येथील क्रीडा संकुलाच्या झालेल्या दयनीय अवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केला. तसेच वानखेडेच्या धर्तीवर कोकणातही भव्य असे स्टेडियम उभारावे, अशी विनंतीही शासनाला केली.
आ. दरेकर म्हणाले की माणगाव क्रीडा संकुलाची अवस्था दयनीय झाली आहे. इमारतीला तडे गेले असून गळती होतेय. क्रीडा साहित्य खराब झाले त्यामुळे खेळाडूंना ज्या आवश्यक सुविधा हव्यात त्या मिळत नाहीत. माणगाव मधील शेकडो युवक-युवती तसेच आजूबाजूच्या परिसरातील क्रीडापटू या क्रीडा संकुलावर अवलंबून आहेत. २०२० पासून हे क्रीडा संकुल वापरात नाही. २०२० मध्ये सर्व पत्रे उडून गेले, त्याची दुरुस्ती केली पण त्याचा अजिबात उपयोग झाला नाही. पाण्याचीही व्यवस्था नाही. जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी तीन कोटींचे इस्टिमेट दिले. पूर्वीच्या इमारती दुरुस्ती, इंडोर गेमसाठी हॉल, पाण्याची व्यवस्था याचा यात समावेश आहे. या क्रीडा संकुलाचे स्ट्रक्चर ऑडिट करण्यात यावे. क्रीडा संकुलाच्या देखभालीची जबाबदारी कोणत्या अधिकाऱ्यावर होती त्यावर कोणती कारवाई करणार? पोलादपूर तालुक्यालाही क्रीडा भवन व्हावे यासाठी अनेकदा मागणी केली. पोलादपूरचे तालुका क्रीडा भवन मंजूर करण्याबाबत घोषणा करण्यात यावी. शहरांमध्ये मोठमोठी स्टेडियम आहेत. वानखेडेच्या धर्तीवर कोकणातही भव्य असे स्टेडियम व्हावे, यासाठी शासनाने प्रयोजन करावे. रत्नागिरी क्रीडा संकुलाला १५ कोटी निधीची गरज आहे. त्याला निधी उपलब्ध होत नाही हे दुर्दैव आहे. रत्नागिरी क्रीडा संकुलातील राहिलेल्या अर्धवट कामासाठी १५ कोटींचा निधी द्यावा, अशी मागणीही दरेकर यांनी केली.
त्यावर उत्तर देताना मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटले की, बहुतांशी तालुक्यात क्रीडा संकुलाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. श्रीवर्धन, तळा, रोहा, त्याचवेळी माणगावच्या क्रीडा संकुलाची इमारतही मंजूर झाली होती. २०२० मध्ये आलेल्या चक्रीवादळामुळे नादुरुस्त झाले. त्याच्या लगतच्या क्षेत्रात विभागीय क्रीडा संकुलाची जागा क्रीडा विभागाला हस्तांतरित केली. ८५ कोटीचा प्रस्तावही क्रीडा विभागाकडे मान्यतेसाठी पाठवला. खारघर क्षेत्रात विभागीय क्रीडा संकुल असावे असा प्रस्ताव आला. तालुक्याच्या क्रीडा संकुलालगतच विभागीय क्रीडा संकुल आले की तालुक्यातील क्रीडा संकुल त्यात समाविष्ट करण्यात येईल अशी क्रीडा विभागाच्या धोरणानुसार कारवाई सुरू होती. मात्र ते प्रलंबित राहिले. त्या कामाला गती देण्याच्या दृष्टिकोनातून विभागाची बैठक घेऊ. नाशिक विभागात दोन विभागीय क्रीडा संकुल मंजूर करण्यात आले. तसाच स्वतंत्र प्रस्ताव उपविभागीय क्रीडा संकुल माणगावात द्यावे यासाठी तयार करण्यात येईल. तसेच पोलादपूर येथे तालुका क्रीडा भवन उभारण्यासाठी जागेचा प्रस्ताव मागवला होता. विभागाची जागा क्रीडा विभागाकडे हस्तांतरित करून तिथे तालुक्यातील क्रीडा भवन बनवावे. जागा उपलब्ध करून दिली तर त्याचीही मंजुरी यंदाच्या वर्षी दिली जाईल. त्याचबरोबर विशेष बाब म्हणून रत्नागिरीच्या मुख्य क्रीडा संकुलासाठी १५ कोटी निधीबाबत सकारात्मक प्रस्ताव तयार करू असे आश्वस्त केले.
00000


















