*• मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या (बीएलओ) गृहभेटीदरम्यान अधिकाधिक गणना करण्यासाठी सहाय्य करण्याचेही आवाहन*
*• विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात बैठक पार पडली*
माननीय भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन – SIR) कार्यक्रम अंतर्गत बृहन्मुंबई क्षेत्रात (मुंबई शहर आणि उपनगरे) कार्यवाही सुरू आहे. या अनुषंगाने राबविण्यात येत असलेल्या विविध प्रक्रियांमध्ये राजकीय पक्षांनी सहकार्य करावे. तसेच, दिनांक ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीदरम्यान मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या (बीएलओ) गृहभेटीदरम्यान अधिकाधिक गणना होण्याच्या दृष्टिने सहाय्य करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी केले आहे.
मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम संदर्भात माहिती देण्याच्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक अधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांच्या अध्यक्षतेखाली विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आज (दिनांक ३० जून २०२६) पार पडली. त्यावेळी श्रीमती भिडे बोलत होत्या.
उपमहापौर श्री. संजय घाडी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती प्राजक्ता वर्मा-लवंगारे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. अभिजीत बांगर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी (मुंबई शहर जिल्हा) तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती आंचल गोयल, सहआयुक्त (करनिर्धारण व संकलन) श्री. विश्वास शंकरवार आदी यावेळी उपस्थित होते. तसेच, विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हा निवडणूक अधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे पुढे म्हणाल्या की, दिनांक ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीदरम्यान मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) गृहभेटी देणार आहेत. मतदारांनी संबंधित बीएलओ यांना आवश्यक माहिती उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. कोणताही पात्र मतदार वंचित राहू नये आणि कोणतीही अपात्र व्यक्ती समाविष्ट होऊ नये, हा या संपूर्ण प्रक्रियेचा उद्देश आहे. त्यामुळे, या प्रक्रियेसाठी सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन श्रीमती भिडे यांनी केले आहे.
मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन – SIR) कार्यक्रम अंतर्गत सुरू असलेली प्रक्रिया, वेळापत्रक आणि कार्यवाहीच्या अनुषंगाने राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना यावेळी सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच, राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या विविध मुद्द्यांवर चर्चाही करण्यात आली.
***
(जसंवि/२३८)



















