*जलदगती न्यायालयात खटला, निकम कुटुंबाला पोलीस संरक्षण; पीडिताच्या पत्नी मयूरी निकम यांनी मानले आभार*
*दि. २९, सातारा | प्रतिनिधी*: खटाव तालुक्यातील चितळी येथील माजी सैनिक रणजीत मदन निकम यांच्या हत्या प्रकरणात आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्याचे तसेच खटला जलदगती न्यायालयात चालविण्याबाबत १९ जून रोजी पोलीस प्रशासनाला लेखी आदेश देण्यात आले आहेत.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्याचे माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी गांभीर्याने दखल घेत पाठपुरावा केला. मयत रणजीत निकम यांच्या पत्नी मयूरी रणजीत निकम यांनी ११ ऑगस्ट २०२५ रोजी मंत्री देसाई यांची भेट घेऊन न्यायाची मागणी केली होती. त्यानंतर १ मे २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित यंत्रणांची आढावा बैठक घेण्यात आली.
बैठकीतील तीन महत्त्वपूर्ण निर्णय
– आरोपी संघटित गुन्हेगारी टोळीचे सदस्य असल्याने त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करावी.
– विशेष सरकारी वकील नियुक्त करून खटला जलदगती (फास्ट ट्रॅक) न्यायालयात चालवावा.
– निकम कुटुंबाच्या सुरक्षेसाठी चितळी गावात बीट पेट्रोलिंग वाढवून डायल 112 सुविधेद्वारे आवश्यक पोलीस संरक्षण उपलब्ध करून द्यावे.
याबाबत प्रतिक्रिया देताना मयूरी रणजीत निकम म्हणाल्या, *पतीच्या निधनानंतर मी पूर्णपणे एकटी पडले होते. मंत्री शंभूराज देसाई यांनी माझी व्यथा ऐकून या प्रकरणाची तत्काळ दखल घेतली. त्यांच्या पुढाकारामुळे आढावा बैठक झाली आणि त्यानंतर आवश्यक आदेशही निघाले. एका माजी सैनिकाच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी दाखवलेली संवेदनशीलता आणि तत्परता आयुष्यभर विसरणार नाही.”
दरम्यान, रणजीत निकम यांनी काही वर्षांपूर्वी शाळेतील मुलींची छेड काढणाऱ्या गुंडांना विरोध केला होता. त्याचाच सूड उगवत त्यांची हत्या झाल्याचा आरोप आहे. त्यामुळे आरोपींवर कठोर कारवाई करून खटला जलदगतीने चालवावा आणि न्यायालयाने कायद्यानुसार कठोर शिक्षा सुनावावी, अशी मागणी चितळी ग्रामस्थ आणि खटाव तालुका माजी सैनिक संघटनेने तसेच मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या अध्यक्ष शीतल हरीश करदेकर यांने केली आहे.


















