*उबाठा प्रमुख आणि देवेंद्र फडणवीस यांच्या एकत्रित विमानप्रवासावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया*
*उबाठा प्रमुखांच्या सभा म्हणजे वरातीमागून घोडे..*
*रायगड पालकमंत्रीपदाचा निर्णय लवकरच होणार असल्याची दिली ग्वाही*
रायगड २७ जून :-विमानापेक्षा ईमान महत्वाचे असून, कपटी मित्र किती घातक असतो हे देवेंद्र फडणवीस यांना २०१९ साली चांगलेच कळले आहे. त्यामुळे असे प्रयत्न करून काहीही साध्य होणार नाही अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५३ वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यासाठी शिंदे आज रायगडावर आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
यावेळी बोलताना त्यांनी, २०१९ साली शिवसेना आणि भाजप या दोघांनाही एकाच विमानातून प्रवास करण्याचे तिकीट जनतेने दिलेले होते. मात्र त्यावेळी ऐनवेळी उद्धव यांनी स्वार्थासाठी विमान बदलून काँग्रेस सोबतचे विमान धरत जनमताशी बेइमानी केली. त्यामुळेच आज ते गटांगळ्या खात सुटलेत, त्यामुळेच आता त्यांचे हे प्रयत्न सुरू आहेत. मात्र देवेंद्र फडणवीस हे फार हुशार आहेत, त्यांना २०१९ साली कपटी मित्र किती घातक असतो ते पाहिलेले आहे, त्यामुळे मला याबाबत अधिक काही बोलण्याची आवश्यकता नाही असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
यासोबतच उबाठा गट प्रमुखांच्या सभाबद्दल विचारले असता, उबाठा प्रमुख आज सभा घेत फिरत असले तरीही त्यांना यावेळीही मीच घरातून बाहेर काढले आहे. मराठीत एक म्हण आहे वरातीमागून घोडे अशी यांची आज अवस्था आहे. सगळे निघून गेल्यावर हे पोहचत आहेत त्यामुळे जो बुंद से गयी वो हौदसे नहीं आयेगी एवढा टोला शिंदे यांनी उबाठा प्रमुखांना लगावला.
रायगड पालकमंत्रिपदबाबत बोलताना, आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५३ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी मी इथे आलो होतो. अतिशय सुंदर सोहळा पार पडला. छत्रपतींच्या आशीर्वादाने सगळ्या गोष्टी सुरळीत होतील लवकरच पालकमंत्री पदाचा निर्णय देखील होईल आणि तुम्हाला त्याची बातमी मिळेल असे शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

















