Home पालघर-ठाणे / नवी मुंबई / रायगड / रत्नागिरी / सिंधुदुर्ग *गणेशोत्सवातून समाजप्रबोधनाची परंपरा जपणारा आनंद दिघेंचा वारसा ३७ वर्षांनंतरही कायम – एकनाथ...

*गणेशोत्सवातून समाजप्रबोधनाची परंपरा जपणारा आनंद दिघेंचा वारसा ३७ वर्षांनंतरही कायम – एकनाथ शिंदे*

30
0

*गणेशोत्सवातून समाजप्रबोधनाची परंपरा जपणारा आनंद दिघेंचा वारसा ३७ वर्षांनंतरही कायम – एकनाथ शिंदे*

*ठाण्यातील गणेश दर्शन स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न*

*गणेश दर्शन स्पर्धेतून सामाजिक बांधिलकी, जनजागृती आणि तरुणांच्या कल्पकतेला प्रोत्साहन*

ठाणे, ता. ७ : गणेशोत्सव केवळ देखावे, आरास आणि रोषणाईपुरता मर्यादित न राहता त्यातून समाजप्रबोधन, जनजागृती आणि सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे. हाच धर्मवीर आनंद दिघे यांचा गणेश दर्शन स्पर्धेमागील उद्देश होता. त्यांची ही परंपरा गेल्या ३७ वर्षांपासून कार्यकर्त्यांनी सातत्याने जपली आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

ठाणे गणेश दर्शन स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा राम गणेश गडकरी रंगायतन येथे शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला. त्या वेळी ते बोलत होते.

आनंद दिघे यांनी गणेश दर्शन स्पर्धेबरोबरच गणेशोत्सव, दहीहंडी आणि नवरात्रोत्सवासारख्या उत्सवांना सामाजिक बांधिलकीची जोड दिली. गणेश मंडळांना भेटी देताना ते सजावट, आरास, विषय आणि त्यासाठी झालेला खर्च याची बारकाईने माहिती घेत असत. मंडळातील कार्यकर्त्यांनी स्वतः सजावट केली आहे का, यालाही ते महत्त्व देत असत, अशी आठवण शिंदे यांनी सांगितली.

लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजाला एकत्र आणण्याचे काम केले. त्याच परंपरेत आज गणेश मंडळांकडून सामाजिक, पर्यावरणीय आणि जनजागृतीपर विषयांवर देखावे साकारले जात आहेत. आरोग्य शिबिरे, रुग्णवाहिका सेवा, गरजूंना मदत तसेच संकटाच्या काळात धावून जाण्याचे कामही मंडळे करतात. त्यामुळे गणेश मंडळे सामाजिक भान जपणारी केंद्रे बनली आहेत, असे शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री असताना सण-उत्सवांवरील निर्बंध दूर करून गणेश मंडळांना परवानग्या आणि मंडप शुल्काबाबत सुलभता आणली. आपली संस्कृती आणि परंपरा उत्साहाने साजरी करता यावी, हा त्यामागील उद्देश होता. दिघे यांनी ठाण्यात सुरू केलेली दहीहंडीची परंपराही पुढे महाराष्ट्रभर पोहोचली. कोणतेही सत्तेचे पद नसतानाही त्यांच्या सामाजिक कार्यामुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली, असे शिंदे यांनी नमूद केले.

गणेश मंडळांमधील तरुण कार्यकर्त्यांच्या नियोजनकौशल्याला, कल्पकतेला आणि कलागुणांना गणेश दर्शन स्पर्धेतून व्यासपीठ मिळते. आर्किटेक्चर, इंजिनिअरिंगसह विविध कौशल्यांना यातून वाव मिळत असल्याने मंडळांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.

पारितोषिक विजेत्या मंडळांचे अभिनंदन करताना यंदा बक्षीस न मिळालेल्यांनी निरुत्साहित न होता जिद्द आणि चिकाटीने पुढील वर्षी अधिक चांगली तयारी करावी, असे आवाहन शिंदे यांनी केले. तसेच उत्सव साजरा करताना इतरांना त्रास किंवा गैरसोय होणार नाही, याची काळजी घेऊन संस्कृती, परंपरा आणि सामाजिक सलोखा जपावा, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर, अभिनेता अजिंक्य देव, प्रा. प्रदीप ढवळ, शिवसेना सचिव संजय मोरे, शिवसेना सचिव राम रेपाळे,ठाणे जिल्हा महिला संघटिका सौ. मीनाक्षी शिंदे, सातारा जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे, ठाणे शहरप्रमुख हेमंत पवार, नगरसेवक अनिल भोर आणि शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी आवर्जून उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here