मुंबई, शनिवार दि. 27 जून 2026 : अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या तीन फेऱ्या पूर्ण होऊनही सुमारे ५० टक्के विद्यार्थ्यांचेच प्रवेश झाल्याची माहिती समोर आली आहे. ही बाब अत्यंत चिंताजनक असून संपूर्ण प्रवेश प्रक्रियेच्या नियोजनावर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी केला आहे.
ॲड. मातेले म्हणाले की, तीन प्रवेश फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर किमान ९० टक्के प्रवेश पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र अद्याप केवळ निम्म्याच विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्यामुळे लाखो विद्यार्थी व पालक संभ्रमात आहेत. उर्वरित प्रवेश पूर्ण करण्यासाठी आणखी अनेक फेऱ्या घ्याव्या लागल्यास महाविद्यालयांचे नियमित अध्यापन किमान आणखी एक महिना उशिरा सुरू होण्याची शक्यता आहे.
सरकारने निकाल लवकर जाहीर केल्याचा गाजावाजा केला; परंतु प्रवेश प्रक्रियाच वेळेत पूर्ण होत नसेल, तर लवकर निकाल लावून विद्यार्थ्यांना नेमका काय फायदा झाला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
प्रवेश प्रक्रियेत अनावश्यक विलंब का होत आहे, जागा असूनही प्रवेश का होत नाहीत, तांत्रिक किंवा प्रशासकीय त्रुटी आहेत का, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. विद्यार्थी आणि पालकांच्या हिताशी संबंधित या प्रक्रियेत कोणताही गैरव्यवहार, हलगर्जीपणा किंवा अनियमितता झाली आहे का, याची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
मुख्य मागण्या तीन फेऱ्यांनंतरही कमी प्रवेश होण्यामागील कारणे तातडीने जाहीर करावीत.
प्रवेश प्रक्रियेचे स्वतंत्र व निष्पक्ष लेखापरीक्षण (ऑडिट) करण्यात यावे.रिक्त जागा आणि प्रवेशांची संपूर्ण आकडेवारी सार्वजनिक करावी.उर्वरित प्रवेश प्रक्रिया वेगाने पूर्ण करून महाविद्यालये नियमित सुरू करण्यासाठी तातडीची कार्यवाही करावी.
विद्यार्थी व पालकांची गैरसोय टाळण्यासाठी पारदर्शक आणि वेळबद्ध प्रवेश प्रक्रिया राबवावी.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी शासनाने तात्काळ हस्तक्षेप करून प्रवेश प्रक्रियेतील सर्व अडथळे दूर करावेत. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार विद्यार्थी व पालकांच्या न्याय्य हक्कांसाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही ॲड. अमोल मातेले यांनी दिला.


















