Home महाराष्ट्र मंत्रालयातील ६ व्या माळ्यावरून नोकरीचा महाघोटाळा! तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या PA सह...

मंत्रालयातील ६ व्या माळ्यावरून नोकरीचा महाघोटाळा! तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या PA सह ५ जणांवर गुन्हा दाखल; ४० तरुणांना कोट्यवधींचा गंडा?

235
0

मंत्रालयातील ६ व्या माळ्यावरून नोकरीचा महाघोटाळा! तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या PA सह ५ जणांवर गुन्हा दाखल; ४० तरुणांना कोट्यवधींचा गंडा?

मुंबई

*मंत्रालयातील ६व्या माळ्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाचा (दालनाचा) गैरवापर करून शासकीय नोकऱ्यांचे बनावट आमिष दाखवून तरुणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारे एक मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पीए (PA) प्रभाकर काळे यांच्यासह पाच जणांविरोधात मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. मंत्रालयाच्या आवारातच थेट मुलाखती घेऊन तरुणांना बनावट नियुक्तीपत्रे देण्यापर्यंत या टोळीची मजल गेल्याने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

# *७ लाख ६५ हजारांची फसवणूक आणि बनावट नियुक्तीपत्र*
तळोजा येथील रहिवासी वर्षा भुताळे यांनी याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या बहिणीचा मुलगा रितेश कांबळे (रा. नांदेड) याला शासकीय सेवेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. यासाठी सुरुवातीला २० लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती, मात्र अखेर ७ लाख ६५ हजार रुपयांवर बोलणी पक्की झाली. भुताळे यांनी आरोपी विश्वनाथ गच्चे यांच्या बँक खात्यात ७ लाख २५ हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले, तर ४० हजार रुपये रोख स्वरूपात दिले.

# *मंत्रालयातच मुलाखत आणि पोस्टिंगचे ‘नाटक’*
पैसे मिळाल्यानंतर आरोपी विश्वनाथ गच्चे, साईनाथ व्हटकर, स्नेहल कोळी आणि मनोहर चोरगे यांनी रितेशची थेट मंत्रालयाच्या तळमजल्यावर मुलाखत घेतली. इतकेच नव्हे, तर त्याला सातव्या माळ्यावर मुख्यमंत्र्यांच्या दालनात नेऊन त्याची पोस्टिंग कुठे होणार आहे, हे देखील दाखवण्यात आले. त्यानंतर त्याला मुंबईतील जी.टी. रुग्णालयात नेऊन त्याची वैद्यकीय तपासणी (Medical Test) करण्यात आली. “मुख्यमंत्री सध्या फाईलवर स्वाक्षरी करत नाहीयेत,” अशी बतावणी करत आरोपींनी त्याला ‘फॉरेस्ट गार्ड’ (वनरक्षक) पदाचे बनावट नियुक्तीपत्र आणि प्रशिक्षणाचे पत्र हाती सोपवले.

# *ट्रेनिंगच्या नावाखाली पळ काढला, विचारणा केली तर धमक्या!*
नियुक्तीपत्र दिल्यानंतर रितेशला जॉईनिंगसाठी नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे नेण्यात आले. तिथून पुन्हा मेडिकलच्या नावाखाली नाशिकला आणले. त्यानंतर आठ दिवसांच्या ट्रेनिंगसाठी त्याला सातारा जिल्ह्यातील पाटण येथे नेण्यात आले. मात्र, तिथे कोणतेही ट्रेनिंग झालेच नाही. आरोपी साईनाथ व्हटकर रितेशला तिथेच एकटे सोडून पळून गेला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर भुताळे यांनी आरोपींशी संपर्क साधला असता, “तुम्हाला काय करायचे ते करून घ्या,” अशी थेट धमकी आरोपींनी दिली.

#*४० तरुणांना कोट्यवधींचा गंडा घालण्याचा आरोप*
या घोटाळ्याची व्याप्ती अत्यंत मोठी असण्याची शक्यता आहे. वर्षा भुताळे यांनी एफआयआर (FIR) मध्ये नमूद केले आहे की, ज्या दिवशी रितेशची मंत्रालयात मुलाखत झाली, त्याच दिवशी तिथे सुमारे ४० तरुण मुलाखतीसाठी आले होते. या सर्व तरुणांकडून नोकरीसाठी प्रत्येकी १५ ते २० लाख रुपये उकळण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. वर्षा भुताळे जेव्हा या तरुणांशी बोलण्याचा प्रयत्न करत होत्या, तेव्हा आरोपी विश्वनाथ गच्चे आणि स्नेहल कोळी यांनी त्यांना दमदाटी केली होती.

### **बँक खात्यातील ‘पाच कोटी’ दाखवून गुपित उघड केले!**
तक्रारीतील आणखी एका धक्कादायक आरोपानुसार, आरोपी विश्वनाथ गच्चे याने मुख्यमंत्र्यांच्या दालनात भुताळे यांना आपल्या बँक खात्यातील ५ कोटी रुपये दाखवले होते. पुण्यातील एका बिल्डरचे तळ्याच्या कामाचे बिल मंजूर करून दिल्यानंतर, त्या बदल्यात मुख्यमंत्र्यांचे पीए प्रभाकर काळे यांना ५ कोटी आणि स्वतःला ५ कोटी रुपये मिळाल्याचा दावा गच्चे याने केला होता.

### *या आरोपींवर गुन्हा दाखल:*
मरीन ड्राईव्ह पोलिसांनी या महाघोटाळ्याप्रकरणी खालील आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे:
१. **प्रभाकर काळे** (तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे पीए)
२. *विश्वनाथ गच्चे*
३. *स्नेहल कोळी*
४. *मनोहर चोरगे*
५. *साईनाथ व्हटकर*

मंत्रालयासारख्या राज्याच्या सर्वोच्च आणि सुरक्षित ठिकाणी हे फसवणुकीचे रॅकेट कसे चालत होते? आरोपींना मंत्रालयात मुक्त प्रवेश कसा मिळत होता? या मागे आणखी कोणाचे हात आहेत का? याचा सखोल तपास आता मरीन ड्राईव्ह पोलीस करत आहेत.

—-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here