Home मुंबई *सुनियोजन करून अंमलबजावणी केल्यास* *प्रकल्प वेळेत पूर्ण : डॉ. संजीव कुमार*

*सुनियोजन करून अंमलबजावणी केल्यास* *प्रकल्प वेळेत पूर्ण : डॉ. संजीव कुमार*

10
0

*महापारेषणचा २१ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा*
*व्हर्च्युअल सोहळ्यामुळे १ कोटींची बचत; राज्यस्तरीय पारितोषिकांचे वितरण*
मुंबई, दि. ६ : महापारेषणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी २० वर्षात चांगले काम केले आहे. पण, आता ऊर्जा संक्रमणामध्ये राईट ऑफ वे (RoW), हवामान बदल आणि अक्षय ऊर्जेसाठी काम करावे लागणार आहे. यासाठी अधिकाऱ्यांनी सुनियोजन करून अंमलबजावणी केल्यास प्रकल्प वेळेत पूर्ण होतील.“, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीचे (महापारेषण) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार (भा.प्र.से.) यांनी केले.

वांद्रे येथील प्रकाशगंगा इमारतीत महापारेषणचा २१ वा वर्धापनदिन दूरदृश्य प्रणालीव्दारे उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी आयोजिलेल्या राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभात डॉ. संजीव कुमार बोलत होते. याप्रसंगी महापारेषणचे संचालक (संचलन) श्री. सतीश चव्हाण, संचालक (प्रकल्प) श्री. दत्तात्रय पडळकर, संचालक (वित्त) श्रीमती तृप्ती मुधोळकर, कार्यकारी संचालक (राज्य भार प्रेषण केंद्र) श्री. शशांक जेवळीकर, अपर जिल्हाधिकारी तथा कार्यकारी संचालक (मानव संसाधन) श्रीमती सुचिता भिकाने उपस्थित होते.

सुरूवातीला मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, ऊर्जा राज्यमंत्री श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर आणि अपर मुख्य सचिव (ऊर्जा) श्रीमती आभा शुक्ला यांनी महापारेषणच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिलेल्या शुभेच्छा संदेशाचे वाचन करण्यात आले.

वर्धापनदिनाच्या शुभेच्छा देऊन तसेच विजेत्यांचे अभिनंदन करून डॉ. संजीव कुमार म्हणाले, महापारेषणचे राज्यात चांगले काम सुरू आहे. तांत्रिक मुद्द्यापेक्षा राईट ऑफ वे मुळे प्रकल्प प्रलंबित राहत आहेत. त्यासाठी अधिकाऱ्यांनी सर्वांशी संवाद वाढविला पाहिजे. विशेतः प्रकल्पांच्या कामात सुनियोजन केल्यास प्रकल्प वेळेत पूर्ण होतील. कळवा-पडघे वीजवाहिनीच्या कामाची अंमलबजावणी जशी झाली, त्याप्रमाणे सर्व प्रकल्पात सुसंवाद वाढविला पाहिजे.“

अपर जिल्हाधिकारी तथा कार्यकारी संचालक (मानव संसाधन) श्रीमती सुचिता भिकाने म्हणाल्या, महापारेषणचा वर्धापनदिन हा सकारात्मक प्रवासाचा उत्सव आहे. मानव संसाधन विभागाने बढती, परीक्षांचे निकाल वेळेत लावून सुमारे चार हजार उमेदवारांची नोकरभरती केली. वार्षिक आरोग्य तपासणी, सैनिकांचे प्रश्न मार्गी लावले. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या योग आणि प्राणायमसाठी आर्ट ऑफ लिव्हिंगसोबत करार केला आहे. सांघिक सामाजिक जबाबदारी (सीएसआर) निधीतून अनेक शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य, पर्यावरण आणि अक्षय ऊर्जेसाठी भरीव काम केले आहे. इको फ्रेंडली आणि सेंद्रीय पदार्थांचा वापर वाढविला पाहिजे. विकसित भारत-२०४७ साठी सर्वांनी पुढाकार घ्यावा. “

यावेळी संचालक (संचलन) श्री. सतीश चव्हाण, संचालक (प्रकल्प) श्री. दत्तात्रय पडळकर, संचालक (वित्त) श्रीमती तृप्ती मुधोळकर, कार्यकारी संचालक (राज्य भार प्रेषण केंद्र) श्री. शशांक जेवळीकर यांचीही भाषणे झाली.

ऊन-पावसाची तमा न बाळगता विशेष कामगिरी केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पारितोषिके घोषित करून गौरविण्यात आले.
या सोहळ्याला राज्यातील विविध परिमंडलातील सुमारे साडेपाच हजार अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय दूरदृश्य प्रणालीव्दारे व ऑनलाईन उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. महेश आंबेकर यांनी केले तर आभार श्री. राजू गायकवाड यांनी मानले.
———-
*व्हर्च्युअल सोहळ्यामुळे १ कोटींची बचत*
महापारेषणचा वर्धापनदिन आणि राज्यस्तरीय पारितोषिक वितरण सोहळा पारंपरिक पद्धतीने साजरा केल्यास सुमारे एक कोटींचा खर्च अपेक्षित होता. मात्र, पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या ‘अनावश्यक खर्च टाळा’ या आवाहनाला प्रतिसाद देत यंदा हा कार्यक्रम पूर्णपणे दूरदृश्य प्रणालीद्वारे घेण्यात आला. त्यामुळे महापारेषणने तब्बल एक कोटींची बचत केली. तसेच ऊर्जा बचत आणि पर्यावरण संरक्षणासाठी कार्यालयांमधील अनावश्यक दिवे बंद ठेवणे आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिक वापर करण्याचे आवाहनही अपर जिल्हाधिकारी तथा कार्यकारी संचालक (मानव संसाधन) श्रीमती सुचिता भिकाने यांनी केले.
—————–
*देशी आणि पर्यावरणपूरक सजावटीने ‘प्रकाशगंगा’ला लाभले मंदिराचे स्वरूप*
—————-
महापारेषणच्या ‘प्रकाशगंगा’ मुख्यालयाची यंदा पारंपरिक, देशी आणि पर्यावरणपूरक पद्धतीने सजावट करण्यात आली. झेंडूच्या फुलांच्या माळा, आंब्याच्या पानांची तोरणे आणि केळीच्या पानांचा वापर करून करण्यात आलेल्या या सजावटीमुळे संपूर्ण परिसराला सात्त्विकता, पावित्र्य आणि भारतीय संस्कृतीची झलक प्राप्त झाली.

सजावटीप्रमाणेच भोजन व्यवस्थेतही साधेपणा आणि पर्यावरणपूरकतेला प्राधान्य देण्यात आले. अनावश्यक खर्च टाळत भोजनात केवळ तीन पदार्थांचा समावेश करण्यात आला. यामध्ये शेंगदाणा तेलात तयार केलेला पुलाव तसेच पारंपरिक देशी भाज्यांचा समावेश होता. स्थानिक आणि पौष्टिक अन्नपदार्थांना प्रोत्साहन देत आरोग्यदायी आहाराचा संदेश देण्यात आला. साधेपणा, बचत आणि पर्यावरण संवर्धन या त्रिसूत्रीचा अवलंब करून महापारेषणने वर्धापनदिन साजरा केल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here