मुंबई, दि. (प्रतिनिधी) :
२०१६ साली मुंबईत अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य स्मारकासाठी मोठ्या थाटामाटात जलपूजन करण्यात आले. परंतु आज दहा वर्षे होऊनही हजारो कोटी रुपये खर्च करून हे भव्य स्मारक दृष्टीपथात येऊ शकत नाही. केवडिया येथे जगातील सर्वात उंच स्टॅच्यु ऑफ युनिटी होऊ शकते पण महाराजांचे भव्य स्मारक कां होऊ शकत नाही असा खडा सवाल शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी केला. हजारो कोटी रुपये घालवून हे समुद्रातले भव्य स्मारक करण्याऐवजी महाराजांच्या गड किल्ल्यांची डागडुजी करा, त्यांची दुरुस्ती करून संवर्धन करा, तीच खऱ्या अर्थाने महाराजांची स्मारके आहेत, असेही शिवभक्त राजू देसाई यांनी स्पष्टपणे सांगितले. सकाळी शिवभक्त राजू देसाई यांचा अभीष्टचिंतन सोहोळा मल्ल्या वराडकर फ्रेंड्स क्लब तर्फे साग्रसंगीतपणे दणक्यात साजरा झाला. मागाठाणे मित्र मंडळ संचालित कै प्रबोधनकार ठाकरे ग्रंथालय येथे काल रात्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजाभिषेकानिमित्त शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई आणि इतिहासाचे अभ्यासक हरीश पाटील यांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवभक्त राजू देसाई यांनी मातीसाठी कसे जगायचे हे छत्रपती शिवाजी महाराज यांनी आणि मातीसाठी कसे बलिदान करायचे हे छत्रपती शंभूराजे यांनी दाखवून दिले असल्याचे नमूद केले. इतिहासाचे अभ्यासक हरीश पाटील यांनी विविध उदाहरणे देत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक नव्हे तर राजाभिषेक असा उल्लेख असल्याचे सांगितले. राजांवर अभिषेक करण्यात आला, राज्यावर नाही, म्हणून शिवराजाभिषेक म्हणणे हेच योग्य आहे असे स्पष्टपणे सांगितले. मागाठाणे मित्र मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार मोरे, वसंत सावंत, मनोज सनान्से, दिलीप देसाई, अभिलाष कोंडविलकर, वनिता दळवी, स्मिता डेरे, संजना वारंग आदींच्या शुभहस्ते व्याख्यात्यांना, पाहुण्यांना शाल, पुष्पगुच्छ, पुस्तक आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. योगायोगाने शिवभक्त राजू देसाई यांचा वाढदिवस असल्याने त्यांना मेघडंबरी असलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य प्रतिमा भेट देऊन त्यांचे अभीष्टचिंतन करण्यात आले. सकाळी जॉगिंग पार्क, एक्सर, बोरीवली पश्चिम येथे मल्ल्या वराडकर फ्रेंड्स संस्थेतर्फे शिवभक्त राजू देसाई यांचा अभीष्टचिंतन सोहोळा दणक्यात साजरा करण्यात आला. रश्मी मुळे, चंद्रशेखर साळुंखे, परंजय त्रिवेदी, सुरेश साळवी आदींनी इतिहासकालीन तसेच हिंदी गाणी गायली तेंव्हा सत्तरी ओलांडलेल्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये जबरदस्त उत्साह संचारला होता. रवि मल्ल्या, शेखर वराडकर, शिरीष वराडकर, नरेश नेत्रावळकर, रमाकांत राणे, भूषण मुळे, सदाशिव मराठे, अविनाश तावडे, कुमार सामंत आदींनी शिवभक्त राजू देसाई यांचे अभीष्टचिंतन केले.*




















