मुंबई
बेस्ट अध्यक्ष तृष्णा विश्वासराव यांनी बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतन, ग्रॅच्युइटी तसेच इतर देयकांबाबत राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी ठाम मागणी केली आहे.
या संदर्भात मुख्यमंत्री/उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आलेल्या पत्रात त्यांनी बेस्ट उपक्रमातील निवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या कायदेशीर लाभांमध्ये मोठ्या प्रमाणावर विलंब होत असल्याकडे लक्ष वेधले आहे. मुंबईतील सार्वजनिक परिवहन व्यवस्थेचा कणा असलेल्या बेस्ट उपक्रमावर आर्थिक ताण वाढत असून कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर देयके प्रलंबित असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
पत्रात म्हटले आहे की, अनेक निवृत्त कर्मचाऱ्यांचे ग्रॅच्युइटी आणि अंतिम देयके अद्याप अडकलेली असून, यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना गंभीर आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या देयकांची रक्कम कोट्यवधी रुपयांमध्ये असून, ती तातडीने मंजूर करून अदा करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
बेस्ट उपक्रमाच्या आर्थिक स्थितीमुळे हा प्रश्न अधिक गंभीर होत चालला असून, शासनाने तातडीने हस्तक्षेप करून कर्मचाऱ्यांचे हक्काचे पैसे त्यांना मिळावेत, अशी मागणीही पत्रात करण्यात आली आहे.

















