मुंबई, दि. (प्रतिनिधी) : अभय मोकाशी यांचे गुणगान, त्यांचा गौरव अनेकांनी केला. आम्हाला याचा निश्चितच अभिमान आहे. परंतु अभय मोकाशी यांनी अखेरपर्यंत लढा दिला, अगदी कर्करोगाशी लढा देतांना तब्बल ७० दिवस तो अन्न पाण्यावाचून राहिला. आपण पहा प्रयत्न करुन दोन दिवस अन्नपाण्याशिवाय राहिलो तर काय परिस्थिती निर्माण होते ? अभय मोकाशी यांनी आपल्या प्रामाणिक, लढाऊबाण्याने आयुष्य जगतांना तसेच आजारपणात स्वतः वर संयम राखून, योगसाधना करीत विविध प्रकारचे संदेश दिले आहेत, त्या मार्गाने मार्गक्रमण केले तर तीच अभय मोकाशी यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ झुंझार पत्रकार अभय मोकाशी यांचे वडिल बंधू संदेश मोकाशी यांनी केले. ज्येष्ठ झुंझार लढवय्या पत्रकार अभय मोकाशी यांचे २ मे रोजी पोटाच्या कर्करोगाने निधन झाले. उत्तर मुंबई पत्रकार संघातर्फे मुंबई वैश्य समाजाच्या सदडेकर सभागृहात अभय मोकाशी यांना आदरांजली वाहण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अभय मोकाशी यांचे वडिल बंधू संदेश मोकाशी यांनी अभय मोकाशी यांच्या आजारपणातील विविध प्रकारचे कंगोरे सांगतांना याही परिस्थितीत त्यांनी दाखविलेला लढाऊ बाणा वाखाणण्याजोगा होता आणि आपण तसेच आपला परिवार या संपूर्ण काळात त्याचे साक्षीदार राहिलो आहोत, असे स्पष्ट केले. संदेश मोकाशी यांनी जी हकीकत कथन केली त्यामुळे उपस्थितांच्या अंगावर शहारे आले. उत्तर मुंबई पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री विनायक घोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या शोकसभेत बोलतांना अभय मोकाशी यांचे वडिल बंधू संदेश मोकाशी यांनी अभय मोकाशी यांच्या जीवनाने तसेच आजारपणात दिलेल्या लढाऊ बाण्याने सत्याचा आग्रह, कुटुंबाप्रती बांधिलकी, स्नेह आणि लढवय्येपणा हे तीन संदेश दिले आहेत, असे आवर्जून सांगितले. विनायक घोडे यांनी अभय मोकाशी यांच्या समवेत दूरदर्शनवर झालेल्या चर्चेतील त्यांच्या परखड व्यक्तिमत्वाचा परिचय झाल्याचे कृतज्ञतापूर्वक सांगितले. ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुकृत खांडेकर, प्रसाद मोकाशी, अभय मोकाशी यांच्या भगिनी सौ. शुभांगी सारस्वत, अक्षरभेटचे संपादक सुभाष सूर्यवंशी, प्रगती खांबिया आदींनी आपापल्या आठवणी सांगितल्या. ज्येष्ठ पत्रकार विजय तारी यांनी अभय मोकाशी यांच्या आठवणींना उजाळा देत ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते।पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते॥ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः॥ या स्तोत्राने आदरांजली वाहिली. यावेळी उपस्थित सर्वांनी स्तब्ध उभे रहात श्रद्धांजली अर्पण केली. अभय मोकाशी यांचे निकटवर्तीय, ज्येष्ठ पत्रकार डॉ. प्रवीण भाटिया यांच्या वतीने साऊथ वेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटी, सेंट्रल कौन्सिल ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिसिन आणि होली एंजल्स कॉलेज ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिसिन या संस्थांनी अभय मोकाशी यांना डॉक्टरेट प्रदान करण्यात आली असून या संस्थांतर्फे डॉ. अभय मोकाशी यांच्या नावाने उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात येतील, त्यांची निवड उत्तर मुंबई पत्रकार संघ करील असे घोषित करण्यात आले. उत्तर मुंबई भारतीय जनता पक्षाच्या प्रसिद्धी प्रमुख नीलाबेन सोनी यांनीही अभय मोकाशी यांना पक्षातर्फे श्रद्धांजली वाहिली. संदेश मोकाशी यांच्या स्नुषा सौ. सोनल गौरव मोकाशी, उत्तर मुंबई पत्रकार संघाचे सरचिटणीस प्रवीण वराडकर, प्रियेन पुरेचा, अभय मोकाशी यांचे जुने सहकारी विजय परब, दिनेश सावंत, अभय मोकाशी यांच्या प्रेरणेने इंग्रजी पत्रकारिता करणारे युवा पत्रकार अनुष्का अनिलकुमार, नीलम पाटील, हर्षल खाडे, ज्येष्ठ पत्रकार राजेश शाह, सत्यवान ताठरे आदी मान्यवर उपस्थित होते.*


















