*’स्वच्छ-सुंदर बसस्थानक’ अभियानात राज्यात प्रथम क्रमांक*!
*उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून बारामतीकर आणि एसटी कर्मचाऱ्यांचे कौतुक*
मुंबई दि.29 :-‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान २०२५’ अंतर्गत बारामती बसस्थानकाने ‘अ’ वर्ग बसस्थानकांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे. बारामतीच्या या ऐतिहासिक आणि उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी सर्व बारामतीकर जनतेचे आणि एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, “हे यश प्रत्येक बारामतीकरासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
*१ कोटींचे बक्षीस आणि स्मृतिचिन्ह*
या अभियानात अव्वल स्थान पटकावल्याबद्दल बारामती बसस्थानकाला रुपये १ कोटींचे बक्षीस आणि स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे.
*अजितदादांच्या विकासदृष्टीची पोचपावती*
या यशाबद्दल बोलताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, “स्वच्छता, शिस्त, नियोजन आणि उत्कृष्ट व्यवस्थापनाचा आदर्श उभा करणारे बारामती बसस्थानक म्हणजे आदरणीय अजितदादांच्या स्वप्नांचा आणि विकासदृष्टीचा जिवंत नमुना आहे. बारामती अधिक सुंदर आणि आदर्श व्हावी, यासाठी दादांनी पाहिलेले स्वप्न आज संपूर्ण राज्यासमोर आदर्श ठरले आहे. या यशामध्ये दादांची दूरदृष्टी, कामाप्रती असलेली निष्ठा आणि बारामतीबद्दलचे अपार प्रेम स्पष्टपणे दिसून येते. त्यामुळे हा सन्मान म्हणजे केवळ बसस्थानकाचा गौरव नसून, अजितदादांच्या कार्याला मिळालेली खरी पोचपावती आहे.”
*कर्मचाऱ्यांच्या कष्टाचे फळ*
हे यश मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या बारामती आगारातील चालक, वाहक, यांत्रिक, प्रशासकीय व पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांच्या कष्टाचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विशेष कौतुक केले. या सर्वांच्या सांघिक प्रयत्नांमुळेच बारामतीने संपूर्ण महाराष्ट्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली असल्याचे त्यांनी नमूद केले. या आनंदाच्या आणि अभिमानाच्या क्षणी त्यांनी सर्व बारामतीकरांचे पुन्हा एकदा मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
000000



















