Home Uncategorized *उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील लोकप्रतिनिधींची संसदेत दमदार छाप; पाच खासदारांना ‘संसद रत्न’...

*उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील लोकप्रतिनिधींची संसदेत दमदार छाप; पाच खासदारांना ‘संसद रत्न’ सन्मान*

16
0

*उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून खासदारांना कौतुकाची थाप*

मुंबई,
महाराष्ट्राच्या प्रश्नांना संसदेत प्रभावीपणे वाचा फोडणाऱ्या आणि जनतेच्या हितासाठी सातत्याने आवाज उठविणाऱ्या शिवसेना व महायुतीच्या खासदारांच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेत प्रतिष्ठेच्या ‘संसद रत्न’ पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेना संसदीय गटनेते डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के तसेच महायुतीचे खासदार डॉ. हेमंत सवरा, मेधा कुलकर्णी आणि स्मिता वाघ यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे अभिनंदन करत ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असल्याचे म्हटले आहे.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी प्रसिद्ध केलेल्या संदेशात म्हटले आहे की, जनतेच्या प्रश्नांशी प्रामाणिक राहून संसदेत अभ्यासपूर्ण आणि प्रभावी मांडणी करणाऱ्या लोकप्रतिनिधींनाच अशा प्रकारची राष्ट्रीय पातळीवरील मान्यता मिळते. संसद रत्न पुरस्कारासाठी निवड झालेल्या सर्व खासदारांनी लोकहिताचे प्रश्न, विकासकामे, पायाभूत सुविधा, सामाजिक न्याय आणि राज्याच्या विविध विषयांवर सातत्याने आवाज उठवत संसदीय कामकाजात उल्लेखनीय योगदान दिले आहे.

शिंदे म्हणाले की, लोकशाही व्यवस्थेत संसद हे जनतेच्या अपेक्षा आणि आकांक्षा व्यक्त करण्याचे सर्वोच्च व्यासपीठ आहे. त्या व्यासपीठावर महाराष्ट्राचा आवाज बुलंद करण्याचे काम या खासदारांनी अत्यंत जबाबदारीने आणि प्रभावीपणे केले आहे. संसदीय चर्चांमधील सक्रिय सहभाग, प्रश्नोत्तरांमधील उपस्थिती आणि जनतेच्या प्रश्नांबाबतचा सातत्यपूर्ण पाठपुरावा यामुळे त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

विशेषतः डॉ. श्रीकांत शिंदे यांनी संसदीय गटनेते म्हणून पक्षाची भूमिका सक्षमपणे मांडत विविध विकासात्मक विषयांवर भरीव योगदान दिले आहे. नरेश म्हस्के यांनीही लोकांच्या दैनंदिन प्रश्नांपासून ते व्यापक विकासाच्या मुद्द्यांपर्यंत सातत्याने पाठपुरावा केला. तसेच डॉ. हेमंत सवरा, मेधा कुलकर्णी आणि स्मिता वाघ यांनी संसदीय कामकाजात सक्रिय सहभाग नोंदवत आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे.

“राजकारण हे केवळ सत्तेचे माध्यम नसून जनसेवेचे व्रत आहे. जनतेसाठी काम करणाऱ्या आणि त्यांचे प्रश्न राष्ट्रीय स्तरावर मांडणाऱ्या लोकप्रतिनिधींचा गौरव होणे ही लोकशाहीसाठी सकारात्मक बाब आहे. संसद रत्न पुरस्कार हा त्यांच्या कर्तृत्वाचा, अभ्यासू वृत्तीचा आणि जनतेप्रती असलेल्या बांधिलकीचा सन्मान आहे,” असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.

या सर्व खासदारांनी भविष्यातही अधिक जोमाने आणि तितक्याच समर्पणाने जनतेची सेवा करत महाराष्ट्राचा आवाज संसदेत अधिक प्रभावीपणे पोहोचवावा, अशा शुभेच्छा देत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सर्व ‘संसद रत्न’ पुरस्कार विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन केले. “महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि जनतेच्या हितासाठी काम करणाऱ्या अशा लोकप्रतिनिधींचा सन्मान म्हणजे राज्याच्या प्रगतीचा गौरव आहे,” असेही त्यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here