Home आरोग्य / पर्यावरण आज डॉ. आनंद नाडकर्णी आपल्यात नसला तरी तो लोकांच्या हृदयावर कायमच कोरलेला...

आज डॉ. आनंद नाडकर्णी आपल्यात नसला तरी तो लोकांच्या हृदयावर कायमच कोरलेला असेल! …आनंद कभी मरते नही हेच खरं ! — अच्युत गोडबोले

33
0

आपल्या आयुष्यात सतत आनंद पेरणारा माझा अत्यंत जवळचा चाळीस वर्षांचा मित्र आनंद आज माझा हात सोडून गेला यावर विश्वासच बसत नाहीये. मला आयपीएचकडून त्याचं मोठं ऑपरेशन होणार आहे याची, त्यानंतर ऑपरेशन चांगलं झाल्याची आणि त्यानंतर त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची अशा अनेक बातम्या आणि अपडेट्स सतत मिळत होते. त्यामुळे एकीकडे काळजी आणि चिंता वाटत असली तरी सगळं ठाकठीक होतंय हे ऐकून बरंही वाटत होतं. पण हे ऑपरेशन गुंतागुंतीच होतं आणि त्यामुळे अचानकच प्रकृती बिघडून आनंद आपल्याला सोडून निघून गेला.

अनिल अवचट गेल्यानंतर हा माझ्यासाठी प्रचंड मोठा धक्का आहे. हे सगळं भयंकर आहे. माझ्या जवळची अनेक मंडळी कॅन्सरनं इतक्या पटापट डोळ्यासमोरून निघून जावीत हे पचवणं खरोखरच महाकठीण आहे. कुमार शिराळकर, डॉ. शंतनू अभ्यंकर, विजय तापस, अतुल परचुरे, द्वारकानाथ संझगिरी आणि आता आनंद !

माझं मन अनेक दशकं झपाझप मागे गेलं. १९८० च्या दशकात जेव्हा माझा मुलगा निहार याला ऑटिझम डिटेक्ट झाला, तेव्हा डॉ. राजेंद्र बर्वे या माझ्या सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ञानं त्याचं प्रथम निदान केलं होतं. त्यावेळी माझ्यासकट अनेकांनी ऑटीझम हा शब्दच ऐकलेलाच नव्हता. त्यामुळे राजेंद्रच्या रूममधून बाहेर येताना हा काहीतरी बारीकसा प्रकार असेल आणि थोड्याशा गोळ्या घेऊन बरा होईल असं मला पहिल्यांदा वाटत होतं. त्यावेळेला दादरला राजेंद्रच्याच जवळ आनंद प्रॅक्टिस करत होता. त्याच्याकडे मी जाऊन ऑटिझम म्हणजे काय एवढच विचारलं. त्यावेळी आनंदनं मला त्याची पूर्ण कल्पना दिली आणि मी आतून हादरुनच गेलो. खरं म्हणजे तो क्षण माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला आणि पुर्णपणे गर्तेत गेलेला मी आयुष्यात पुन्हा उभा राहिलो हे सगळं राजेंद्र आणि आनंद यांच्यामुळेच शक्य झालं असं मला वाटतं.
त्यानंतर आनंदच्या माझ्या गाठीभेटी अनेक वेळा होत गेल्या. त्यानं माझा आत्तापर्यंत दोन-तीन वेळेला इंटरव्ह्यूसुद्धा घेतलेला होता आणि मीही त्याचा घेतला होता. एकदा आठवतंय गडकरी रंगायतानमध्ये ‘शहाण्यांचा सायकायट्रिस्ट’ या त्याच्या पुस्तकाचं प्रकाशन होणार होतं. समकालीन प्रकाशनांनं ते छापलं होतं. यानिमित्त अनिल अवचट त्याची मुलाखत घेणार होता पण त्याची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे आनंद अवधानी यांनं आनंद नाडकणीला आता काय करायचं असं विचारलं. तेव्हा आनंद नाडकर्णीनं त्याला फक्त माझं नाव सुचवलं असं नाही तर आनंदनं माझ्याशी अगोदरच त्याविषयी चर्चाही करून ठेवलेली होती. मग मी ती मुलाखत घेतली. ती खूपच सुंदर झाली होती.

माझ्या किमयागार पुस्तकाचं प्रकाशन अभिनेत्री रीमा हिच्या पुढाकारानं डॉ. वसंत गोवारीकर यांच्या हस्ते झालं होतं. त्यावेळी संगीत, साहित्य, रंगभूमी, चित्रपट आणि विज्ञान या क्षेत्रातले अनेक दिग्गज हजर होते. त्यातही आनंद माझ्याकरता ठाण्याहून माझं कौतुक करायला हजर होता याचं मला केवढं अप्रुफ वाटलं होतं ! माझ्या लिखाणाला तो सतत प्रोत्साहन देत असे.
मनोविकारांवर ‘मनकल्लोळ’ नावाची दोन पुस्तकं मी नीलांबरी जोशीबरोबर लिहिली. ती लिहिल्यानंतर त्यात टेक्निकल काही चूक राह्यला नको म्हणून ती आनंदला वाचायला मी दिली होती. त्यानंतर त्याच्या घरी अनेक तास याच्यावर चर्चा आम्ही केली तेव्हा त्याच्या त्या विषयावरच्या सखोल ज्ञानाची तर झलक आम्हाला बघायला मिळालीच पण एवढ्या व्यस्त दिनक्रमात त्यानं त्या पुस्तकाची ओळन ओळ वाचली होती याचं मला प्रचंड आश्चर्य अनेक दिवस वाटत राहिलं. ते पुस्तक आज प्रचंड पॉप्युलर झाल्याचं खूप मोठं श्रेय मी आनंदलाच देईन.
एकाच वेळी अतिशय ज्ञानी आणि लोकाभिमुख मनोविकारतज्ञ, लेखक, उत्कृष्ट वाचक, कवी, गायक, नाटककार, वक्ता, सामाजिक कार्यकर्ता, छायाचित्रकार, कॉर्पोरेट ट्रेनर, संत वाङ्ममयाचा सखोल अभ्यासक हे सगळं असणं ही जवळपास अशक्य गोष्ट फक्त आनंदच करू जाणे !
तो स्वतःला मनोविकारतज्ञ म्हणण्याऐवजी मनोविकारतज्ज्ञच म्हणायचा. त्यातच त्याची सामाजिक दृष्टी जाणवायची. फक्त माणसांचे मनोविकार दूर करून भागणार नाही तर त्यांचा विकास पण झाला पाहिजे असं तसे ठाम होतं.

आणि यामुळेच त्यानं लहान मुलांपासून अनेक विद्यार्थी आणि माणसं यांच्यावर सामाजिक संस्कार व्हावेत म्हणून ठाण्यामध्ये ‘वेध’ या नावानं कार्यक्रम करायला सुरुवात केली. ते इतके पॉप्युलर झाले की नंतर ते खूप मोठ्या पटांगणावर व्हायला लागले. पण सुरुवातीला एका शाळेच्या पटांगणात तो ते कार्यक्रम करत असे. विद्यार्थ्यांसमोर नवीन नवीन विषय मांडणं, त्यांना प्रवृत्त आणि प्रेरित करणं यासाठी तो प्रचंड धडपडत असे. मला आठवतंय एका प्रोग्राममध्ये त्यानं सुप्रसिद्ध अभिनेता आमीरखान याला आणि मलाही भाषण द्यायला बोलवलं होतं. अमीरखान बोलल्यानंतर माझं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीवर भाषण झालं. ते ऐकायला समोर अमीरखान आणि सदाशिव अमरापुरकर हे दोघेही बसलेले होते. भाषणानंतर आम्ही तिघं आणि आनंद एक तासभर गप्पा मारत बसलो होतो हेही मला चांगलं आठवतंय. पण एकूण वेध या कार्यक्रमांमधून आनंदनं हजारो तरुणांना मार्गदर्शन केलं होतं आणि त्यांची मन जिंकली होती हे मात्र नक्की !

ठाण्यातले अनेक डॉक्टर्स अनेक वर्षांपुर्वी काही ठराविक रविवारी एकत्र जमून गायचे. त्यात आनंद होताच. मनोज भाटवडेकर आणि इतरही काही डॉक्टर्स त्यात असल्याचं मला अंधुकसं आठवतंय. मी असे हौशी कलाकार एकत्र जमून गायलेले अनेकदा ऐकलेले आहेत. पण या डॉक्टरांच्या कार्यक्रमातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळे अतिशय उत्कृष्ट गायचे. सगळं प्रकरण एकदम प्रोफेशनल वाटायचं.
अनिल अवचट आणि आनंद यांनी व्यसनमुक्तीसाठी पुण्यामध्ये मुक्तांगण चालू केलं आणि त्यासाठी आनंदनंसुद्धा अनिलबरोबरच प्रचंड श्रम केले आणि योगदान दिलं. दोन तीन वेळेला मुंबईहून पुण्याला रेल्वेनं जाताना मला आनंद गाडीत भेटला होता. कुठे चाललास असं विचारलं तर मी मुक्तांगणला नेहमी जातो असं त्यांनं मला सांगितलं. हा टाईम मॅनेजमेंट केव्हा आणि कसं करतो याचं मला नेहमीच कोड पडे.
त्याची मानसशास्त्रावर आणि भावनांवर तसंच REBT वरची व्याख्यानं म्हणजे एक बौद्धिक आणि भावनिक पर्वणीच असे. तो एक उत्कृष्ट आणि बुद्धिमान वक्ता तर होताच पण त्याचं वाचनही अफाट होतं. तो अनेक धर्मातले तसंच संत वाङ्ममयातले इतके संदर्भ द्यायचा की हा मनोविकारतज्ञ ( खरं म्हणजे मनोविकासतज्ञ) आहे का कोणी संत वाङ्मयातला गाढा अभ्यासक आहे हेच कळायचं नाही.

तो एक उत्कृष्ट नाटककार होता. त्याची अनेक नाटकं मी बघितली आहेत. त्याचं सगळ्यात शेवटचं नाटक म्हणजे ‘लॉस्ट सपर’. हे नाव सुद्धा ‘लास्ट सपर’ वरून घेतलेलं होतं, कारण याला ख्रिश्चन धर्मामध्ये खूप महत्त्व होतं आणि त्यावरूनच अनेक प्रसिद्ध चित्रकारांनी याच नावाची चित्रंही काढली होती. आनंदचं नाटक मात्र विवेकानंदांच्या आयुष्यातल्या आणि स्वभावातल्या वेगळ्याच छटांवर प्रकाश पाडत होतं. आनंदनं मला फोन करून ते बघायला खास बोलवलं होतं. ते इंग्रजीतलं नाटक अतिशय उत्कृष्ट तर्हेनं सादर केलं होतं. त्यातल्या गिरीश परदेशीची विवेकानंदांची भूमिका अजूनही डोळ्यासमोर तरळते आहे.

तसंच काही दिवसांपूर्वी त्यानं हिंदी सिनेमातली गाणी आणि वेगवेगळ्या भावना यांची सांगड घालणारा एक प्रोग्राम पुण्यामध्ये यशवंतराव चव्हाणमध्ये केला होता. मला त्यानं आग्रहानं बोलवलं होतं. अतिशय उत्कृष्टपणे त्यानं त्याचं सादरीकरण केलं होतं. प्रोग्रॅम संपल्यानंतर टाळ्यांचा कडकडाट थांबलाच नाही आणि नाट्यगृहातल्या सगळ्या लोकांनी उभं राहून त्याला मानवंदना दिली होती.

एवढं सगळं चालू असताना त्यानं इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ म्हणजेच आई पी एच ही संस्था काढली आणि ती मुंबई आणि पुणे इथे अतिशय समर्थपणे चालवली. हजारो मनोरुग्णांना सल्ला आणि औषध देणं हे काम या संस्थेनं केलं आणि अजूनही करत आहे. आत्महत्येपासून परावृत्त करण्याकरता २४ तासांची हेल्पलाइन चालू करण्यापासून अनेक उपक्रम तो त्यात राबवत असे. आणि एवढं करून रोज तो त्याची ओपीडी मात्र कधी चुकवत नसे. हे सगळं अजबच !

एकदा कोणीतरी माझ्यावर एक डॉक्युमेंटरी काढायचं ठरवलं. बरंचसं शूटिंग पण झालं आणि त्यानंतर अनिल अवचट, कुमार केतकर, आनंद नाडकर्णी आणि इतर एक दोन अशा सुप्रसिद्ध लोकांनी माझ्याविषयी भाष्य करावं असं ठरलं. त्यावेळी आनंद माझ्याबद्दल दहा मिनिटं जे बोलला ते मी आयुष्यात कधीही विसरणार नाही.

गेल्या वर्षी मला ७५ वर्षे पुर्ण झाली तेव्हा त्या कार्यक्रमात डॉ.अनिल काकोडकर आणि आनंद यांना प्रमुख पाहुणे आणि अध्यक्ष म्हणून बोलवलं होतं. त्यावेळी सुद्धा आनंद माझ्याविषयी जे चांगलं बोलला ते ऐकून मला हर्षवायूच झाला होता. !

थोडी सवड काढून दरवर्षी तो भारतात किंवा भारताबाहेर फिरायला जाई आणि तिथले फोटो मात्र हमखास पाठवत असे.

एकंदरीतच आनंद हा रसरशीत आयुष्य जगला. खरं म्हणजे त्याच्या आयुष्यात खूप संघर्ष होता. लहानपणीच झालेला पोलिओ, त्यानंतर आलेल्या अनेक शारीरिक व्याधी, वैयक्तिक आयुष्यात आलेले अनेक कटू प्रसंग आणि चढ-उतार, मधेमधे येणाऱ्या आर्थिक अडचणी अशा अनेक अडचणींमधून हा मनुष्य वाट काढतो आहे असं त्याला भेटणाऱ्या कोणालाच कळणं शक्य नव्हतं इतका तो सतत स्वतः आनंदी असे आणि खरोखरच नावाप्रमाणे इतरांनाही तसा वाटत असे.

आज आनंद आपल्यात नसला तरी तो लोकांच्या हृदयावर कायमच कोरलेला असेल यात शंकाच नाही. त्याला कदापी विसरणं शक्य नाही कारण आनंद कभी मरते नही हेच खरं !
***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here