Home मुंबई चार राज्ये आणि एक केंद्र शासित प्रदेश निवडणुका :एक अन्वयार्थ.

चार राज्ये आणि एक केंद्र शासित प्रदेश निवडणुका :एक अन्वयार्थ.

20
0

पश्चिम बंगाल आणि आसाम या दोन महत्वाच्या, सरहद्दीवरील संवेदनशील राज्यात भारतीय जनता पक्ष विजयी झाला आहे.दोन्ही राज्याना,अलीकडेच प्रचंड राजकीय उलथा पालथ झालेला बांगलादेश शेजारी आहे. तिथल्या तीव्र संवेदनशील वातावरणाची पार्श्वभूमी आहे.

आसाम मध्ये भाजप सत्तेत होताच.आता बंगाल सुद्धा त्यांना मिळाला आहे.
त्यासाठी त्यांचे शर्थीचे प्रयत्न होते.त्यात ते यशस्वी झाले.
त्यांचे याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन.

यामागची संक्षिप्त ऐतिहासिक पार्श्वभूमी:

लॉर्ड कर्झनने १९०५ साली केलेल्या बंगालच्या फाळणीपासून हा इतिहास सुरु होतो..

पश्चिम बंगाल आणि पूर्व बंगाल अशी दोन राज्ये ब्रिटिश सत्ताधाऱ्यानी सांप्रदायिक तेढ वाढविण्यासाठी निर्माण केली.

बंगाल हे आकाराने प्रचंड मोठे, अतिशय संपन्न आणि राजकीय सामाजिक दृष्टीने जागरूक आणि संवेदनशील असे राज्य जाणीवपूर्वक फोडण्यात आले.जास्तीत जास्त आर्थिक शोषण करता यावे. रयतेचा विरोध दडपून टाकता यावा, यासाठी हे विभाजन करण्यात आले.

यात हिंदू-मुस्लिम यांची संख्यात्मक बहुलता हा निकष होता आणि त्यात फोडा आणि झोडा ही भेदनीती प्रमुख होती.

पुढे काँग्रेस आणि महात्मा गांधी यांच्या लढ्यामुळे देशाला स्वातंत्र्य देण्याचे निश्चित झाले. यासाठी संविधान असावे, म्हणून संविधान सभेसाठी निवडणूक झाली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर या निवडणुकीसाठी, आता बांगलादेश मध्ये असणाऱ्या जेस्सोर -खुलना मतदार संघातून उभे राहिले. त्यांचे त्या वेळचे अनुयायी, मित्र आणि सहकारी बॅरिस्टर जोगेंद्रनाथ मंडल यांचे अत्यन्त मोलाचे योगदान मिळाले. शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे मंडल साहेब बंगालचे प्रमुख नेते होते.डॉ बाबासाहेब आंबेडकर घटना समितीवर असणे अत्यावश्यक आहे, असा मंडल यांचा आग्रह आणि सक्रिय प्रयत्न होता.
घटना समितीच्या निवडणूका झाल्या आणि देशाची फाळणी जाहिर झाली. जेस्सोर-खुलना पूर्व पाकिस्तानात म्हणजे बांगलादेशात गेले. बाबासाहेबांची घटना समितीवरची तिथून झालेली निवड व्यपगत झाली. त्याना पुन्हा मुंबईतून निवडून यावे लागले.

बॅरिस्टर जोगेंद्रनाथ मंडल तिथले मूळ निवासी होते. त्यांनी तिथेच म्हणजे पूर्व पाकिस्तानात रहाणे पसंत केले. ते पाकिस्ताच्या घटना समितीवर निवडून आले. तिथे पहिल्या मंत्रीमंडळात कायदा आणि मजूर मंत्री झाले. पाकिस्ताच्या घटना समितीचे अध्यक्ष झाले.बॅरिस्टर जिन्ना यांचे जेष्ठ सहकारी झाले. पाकिस्तानात राहिलेल्या अल्पसंख्य हिंदू समाजाचे ते अत्यन्त महत्वाचे आणि प्रमुख नेते ठरले.

मात्र हे महत्व आणि महात्म्य फार काळ टिकले नाही. तेथील प्रशासन, लष्कर, नोकरशाही आणि राजकीय पक्ष हे हिंदूना आणि त्यातही हिंदू दलितांना फक्त स्वच्छतेची कामे करण्यासाठी वापरण्याचे, शोषण करण्याचे साधन मानतात हे बॅरिस्टर जोगेंद्र नाथ मंडल यांच्या लक्षात आले. त्यानी नुसता राजीनामा दिला नाही तर पूर्व बंगाल म्हणजे पूर्व पाकिस्तान मधील आपली जन्मभूमी सोडली. ज्या नामशूद्र नावाच्या तथाकथित अस्पृश्य/ दलित समाजात ते जन्मले, त्या सर्वांना घेऊन त्यांनी पश्चिम बंगाल मध्ये येण्याचा निर्णय घेतला.

पश्चिम बंगाल मध्ये दलित निर्वासित यांचा प्रश्न खूप व्यापक आहे. दलित मतदारसंख्या मोठी आहे.मात्र दलितांच्या स्थलांतरामधील संविधानिक अनिवार्यता, अपरिहार्यता आणि धर्मावर आधारीत निर्माण झालेल्या द्विराष्ट्र निर्मिती मधील भारत सरकारची टाळता न येणारी अविभाज्य जबाबदारी,हे महत्वाचे मुद्दे होते आणि आहेत.

लॉर्ड कर्झन यांनी आणि पुढे बॅरिस्टर जिन्ना यांनी निर्माण केलेल्या फाळणीचे सर्वांत भयंकर बळी हे हिंदू दलित होते आणि अद्यापही आहेत.

देशाच्या फाळणीनंतर जेष्ठ भारतीय राजकीय नेते आणि भारतीय जनसंघांचे संस्थापक डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी ह्या विसंगती विरुद्ध ठळकपणे बोलत राहिले.

बंगालच्या निर्वासित हिंदु दलिताना आजच्या दिवसापर्यंत थांबावे लागले.
महाराष्ट्र राज्यात हिंदू दलित या संकल्पनेचा अर्थ वेगळा आहे. पश्चिम बंगाल मध्ये तो अर्थ नाही. हे येथे नमूद करणे आवश्यक आहे.

जेस्सोर -खुलना मधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घटना समितीवर निवडून आणणाऱ्या दलितांना,
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी कुशलतेने गेली 12 वर्षे सक्रिय केले.
यापूर्वीच्या सरकारानी जबाबदारी टाळून, अस्तित्व नाकारलेल्याना,
सेक्युलर दिसण्यासाठी, जमिनीवरचे सत्य जाणीवपूर्वक दुर्लक्षित केले होते.त्यांना भाजपने या निवडणुकीत पश्चिम बंगाल मध्ये संघटित केले.

यापूर्वीच हे आसाम मध्ये झाले होते.

डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी आणि
बॅरिस्टर जोगेंद्र नाथ मंडल यांचे अपूर्ण राहिलेले काम आता पूर्ण होणार आहे. अशी आशा आता निर्माण झाली आहे.

तामिळनाडू, केरळ येथील बदल स्वागतार्ह आहेत.
पुढदूचेरी ह्या केंद्र शासित प्रदेशात उत्तर राजकीय संस्कृती आणि मुरब्बी माणसे कार्यरत आहेत.

आसाम मध्ये नवा चेहरा मुख्यमंत्री म्हणून आल्यास चांगले होईल.
बंगाल मध्ये शांतता हवी असेल तर सुवेंदू अधिकारी यांना मुख्यमंत्री करू नये. नवा कोरा चेहरा भाजपाने द्यावा.

मोदी- शहा आणि भाजपा यांना हवे ते बरेचसे मिळाले आहे.

दक्षिण भारत मात्र अजूनही भाजप ला मिळत नाही. बंगाल मध्ये काँग्रेस आणि सिपीएम शून्यावर आहे.

तामिळनाडू मध्ये भाजप शून्यावर आहे.
भारतीय संघराज्यातील प्रादेशिक लोकशाही अशी जबरदस्त उत्कंठावर्धक आहे. हा लोकांचा विजय आहे. हे चित्र आशावादी आहे.

जयंत गायकवाड,
वरळी, मुंबई.
निवृत्त आय ए एस अधिकारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here