Home पालघर-ठाणे / नवी मुंबई / रायगड / रत्नागिरी / सिंधुदुर्ग *लातूरचे माजी मंत्री आणि आमदार विनायकराव पाटील यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश*

*लातूरचे माजी मंत्री आणि आमदार विनायकराव पाटील यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश*

9
0

*मोठ्या नेत्यांसह कार्यकर्त्यांचीही शिवसेनेमध्ये प्रवेशासाठी गर्दी, राज्यभरातून शिवसेनेचा प्रभाव वाढतोय*

*अकोला, लातूर, नांदेड जिल्ह्यातील विविध पक्षातील लोकप्रतिनिधी पदाधिकाऱ्यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश*

ठाणे,
राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या भोवती वाढत चाललेला जनाधार पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. “अपॉइंटमेंटशिवाय भेटणारा नेता” अशी प्रतिमा निर्माण झालेल्या शिंदे यांच्याकडे आता केवळ मोठे नेतेच नव्हे, तर तळागाळातील कार्यकर्त्यांचीही मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे चित्र दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला मोठा धक्का देत माजी मंत्री व माजी आमदार विनायकराव जाधव पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये भव्य प्रवेश केला.

विनायकराव जाधव पाटील यांच्या नेतृत्वाखाली बुलढाणा, नांदेड, अकोला, लातूरसह विविध जिल्ह्यांतील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला असून “बुलढाणा ते नांदेड, अकोला ते लातूर” असा विस्तार साधत शिवसेनेची ताकद राज्यभर वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या वेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी “मी मुख्यमंत्री असतानाही कार्यकर्ता म्हणूनच काम केलं आणि आजही कार्यकर्ता म्हणूनच काम करतो. शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, इथे कोणी मोठा नाही, कोणी छोटा नाही; आपण सगळे सहकारी आहोत,” असे सांगितले. “मला भेटायला कोणालाही अपॉइंटमेंट लागत नाही. मी कार्यकर्त्यांपासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सर्वांना भेटतो,” असे सांगत त्यांनी सर्वसामान्यांशी असलेला थेट संपर्क अधोरेखित केला, ज्यामुळे तळागाळातील कार्यकर्त्यांचा विश्वास वाढत असल्याचे दिसत आहे. शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांवर पुढे चालत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

विनायकराव जाधव पाटील यांच्यासह उबाठा गटाचे संतोष सोमवंशी, नवनाथ भोसले संग्राम पाटील हायगले शेकडो कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी शेतकरी नेते शंकरराव धोंडगे, माजी खासदार सुरेश जाधव हेदेखील उपस्थित होते. यावेळी या सर्वांचे पक्षात स्वागत करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या प्रवेशानंतर लवकरच २५ हजार कार्यकर्त्यांचा भव्य प्रवेश होणार असल्याचे संकेत देण्यात आले असून दररोज होत असलेल्या प्रवेशांमुळे शिवसेनेचा विस्तार आणि संघटनात्मक ताकद वेगाने वाढत असल्याचे चित्र आहे.
सरकारच्या कामगिरीचा आढावा घेत एकनाथ शिंदे यांनी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी व विविध योजना, एसटीमध्ये ५०% सवलत, मुलींचे मोफत उच्च शिक्षण आणि पिक विमा योजना यांचा उल्लेख करत “सर्वसामान्यांच्या आयुष्यात चांगले दिवस आणणे हाच आमचा उद्देश आहे,” असे स्पष्ट केले. लाडकी बहीण योजनेला विरोध करणाऱ्यांवर टीका करत ते म्हणाले, “काही जण कोर्टात गेले, पण महिलांनी त्यांना चांगलाच धडा शिकवला. कोणत्याही परिस्थितीत ही योजना बंद होणार नाही.”असा पुनरुच्चार त्यांनी केला.

राज्यातील विविध निवडणुकांमध्ये शिवसेनेची ताकद वाढत असून पक्ष ‘नंबर २’ वर पोहोचल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले या यशामागे कार्यकर्त्यांची मेहनत असल्याचे त्यांनी सांगितले. “गाव तिथे शिवसेना, घर तिथे शिवसैनिक” हे लक्ष्य ठेवून संघटन अधिक मजबूत करण्याचे आवाहन करण्यात आले असून मतदार यादी, बूथस्तरावरील काम आणि संघटन वाढ यावर विशेष लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

समाजातील प्रभावी व्यक्ती आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात शिवसेनेकडे येत असल्याचे सांगत एकनाथ शिंदे यांनी “शिवसेनेचा विजयी रथ आता कोणीही थांबवू शकणार नाही,” असा ठाम विश्वास व्यक्त केला. या सर्व घडामोडींमुळे राज्यातील राजकीय समीकरणांना नवी दिशा मिळत असून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना अधिक वेगाने विस्तारत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here