Home मुंबई *रंगभूमीवर अनोखा प्रयोग ‘भुल भुलैय्या’* दिग्दर्शक कुमार सोहनींचं १२५ वे नाटक

*रंगभूमीवर अनोखा प्रयोग ‘भुल भुलैय्या’* दिग्दर्शक कुमार सोहनींचं १२५ वे नाटक

20
0

नाट्य दिग्दर्शन कुमार सोहोनी.. त्यांच्या प्रदीर्घ नाट्य कारकिर्दीकडे महत्त्वाचा टप्पा म्हणजे त्यांचं १२५वं नाटक… ‘भुल भुलैय्या’.

तब्बल ५३ वर्षांची अखंड नाट्यसेवा आणि १२५ नाट्यकृतींचा समृद्ध अनुभव पाठीशी असलेल्या सोहोनी यांनी ‘भुल भुलैय्या’ या नव्या नाटकाद्वारे एक वेगळी दिशा शोधण्याचा प्रयत्न केला आहे.

‘भुल भुलैय्या’ नाटकाचे निर्माते असलेले केदार सामंत आणि रणजीत देसाई हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील असून ‘बाबा वर्दम थिएटर्स’ या हौशी नाट्य संस्थेशी गेली अनेक वर्षे जोडलेले आहेत. ही संस्था ५४ वर्षांपासून हौशी व प्रायोगिक रंगभूमीवर कार्यरत आहे. या संस्थेमार्फत दोघेही गेली २८ वर्षे नाट्यक्षेत्रात सक्रिय आहेत. राज्यभरातील कलाकारांना व्यावसायिक रंगभूमीवर संधी मिळावी या हेतूने त्यांनी ‘श्री लक्ष्मीनारायण प्रॉडक्शन्स’ची स्थापना केली. केदार सामंत यांनी १३ नाटके, ६ बालनाट्ये आणि ६ एकांकिकांचे दिग्दर्शन केले असून अनेक नाटकांत अभिनय व तांत्रिक बाजू सांभाळली आहे. रणजीत देसाई यांनी नाटकांचे व्यवस्थापन आणि नाट्य महोत्सवांचे आयोजन केले आहे.

‘नाटकाची कथा ऐकल्यानंतरच हे नाटक करण्याचा मी निर्णय घेतल्याचे कुमार सोहोनी सांगतात. कथेत असा वेगळा गाभा होता की त्यावर नाटक होऊ शकतं, हे स्पष्ट जाणवलं आणि त्यामुळेच हा प्रयोग करण्याचं ठरवलं’. या नाटकाचा फॉर्म पारंपरिक चौकटींपेक्षा पूर्णतः वेगळा आहे. विज्ञान, वास्तुशास्त्र आणि तंत्र-मंत्र या तीनही घटकांच्या साह्याने ‘आत्म्याचा शोध’ घेण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे हे नाटक केवळ फॅण्टसी नसून, एक सखोल आणि विचारप्रवर्तक शोधयात्रा आहे.

मराठी रंगभूमीवर अशा प्रकारचा प्रयोग प्रथमच सादर होत असल्याचं कुमार सोहोनी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. आशय, मांडणी आणि सादरीकरण या तीनही स्तरांवर वेगळेपण जपणारे हे नाटक प्रेक्षकांना एक नवीन अनुभव देईल,असा विश्वास यावेळी नाटकाच्या टीमने व्यक्त केला. कुमार सोहोनी यांचा हा प्रयत्न नक्कीच रसिकांच्या उत्सुकतेचा विषय ठरणार आहे.
‘रंगत संगत’आणि ‘श्री लक्ष्मीनारायण प्रॉडक्शन्स’ निर्मित ‘भुल भुलैय्या’ची कथा हेमंत एदलाबादकर यांची असून रंगावृत्ती, दिग्दर्शन, प्रकाश कुमार सोहोनी यांचे आहे. रणजित देसाई, केदार सामंत नाटकाचे निर्माते आहेत. अभिनेत्री प्रिया बेर्डे, साहिल देसाई, परिणिता पावसकर, आरती सोळंकी, अमीर तडवळकर, आशुतोष घोरपडे, विजय सूर्यवंशी हे कलाकार नाटकात आहेत. नेपथ्य संदेश बेंद्रे तर संगीत विजय गवंडे यांचे, वेशभूषा मंगल केंकरे यांची तर सूत्रधार-विजय सूर्यवंशी आहेत.

‘भुल भुलैय्या’ नाटकाचे शुभारंभाचे प्रयोग रवि १९ एप्रिल दु. ४वा. रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, सोम २० एप्रिल रात्रौ ८ वा. डॉ. काशिनाथ घाणेकर, ठाणे मंगळ २१एप्रिल दु. ४ वा. दीनानाथ नाट्यगृह, पार्ले येथे रंगणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here