Home मुंबई वरळीतील मोक्याचा भूखंड पंचतारांकित हॉटेलसाठी देऊ नका, लिलाव प्रक्रिया तात्काळ थांबवा :–...

वरळीतील मोक्याचा भूखंड पंचतारांकित हॉटेलसाठी देऊ नका, लिलाव प्रक्रिया तात्काळ थांबवा :– खा. वर्षा गायकवाड

22
0

५ हजार चौरस मीटरचा भूखंड कवडीमोल भावाने देऊन महापालिकेचे कोट्यवधींचे नुकसान, लोकप्रतिनिधींशी चर्चा करून नियमानुसारच व्यवहार करा.

मुंबई

मुंबई विकण्याचा भारतीय जनता पक्षाचा सपाटा सुरुच असून महानगरपालिकेच्या सत्तेची चावी हाती येताच मुंबईतील मोक्याचे भूखंड विकण्यास सुरुवात झाली आहे. वरळीतील महत्वाच्या ठिकाणी असलेला ५१६६ चौरस मीटरचा भूखंड अवघ्या ४५५ कोटी रुपयांत लाडक्या बिल्डरचा देण्याचा घाट घातलेला आहे. हा व्यवहार महापालिकेचे नुकसान करणारा असून बिल्डर व सत्ताधाऱ्यांचे खिसे भरणारा आहे. ही लिलाव प्रक्रिया तात्काळ थांबवावी अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

महानगरपालिका आयुक्त व महापौर यांना लिहिलेल्या पत्रात खासदार वर्षा गायकवाड पुढे म्हणतात की, मुंबई शहरात महानगरपालिकेच्या मालकीचे अनेक भागात भूखंड आहेत, हे भूखंड विकसीत करताना, विकासक अथवा व्यावसायीकांना देताना पारदर्शकता असणे गरजेचे आहे. हे भूखंड मुंबईकरांसाठी आहेत ना की, कोणाचा फायदा व्हावा यासाठी….,कोणताही भूखंड विकसीत करण्यास देण्याची एक प्रक्रिया आहे, नियम आहेत, त्याचे पालन झाले पाहिजे. परंतु मागील काही वर्षापासून मुंबई शहरातील भूखंडांचे लिलाव करताना योग्य प्रक्रिया राबविली जात नाही असे दिसून येत आहे. अनेक भूखंड नियमबाह्य, बेकायदेशीररित्या देण्यात आलेले आहेत. मुंबई महानगरपालिका सक्षम असताना असे भूखंड महानगरपालिका स्वतःच का विकसीत करत नाही? तसे केल्यास महानगरपालिकेलाच फायदा होईल, याचा विचार करावा.

वरळीतील महत्त्वाच्या ठिकाणी असलेला ५१६६ चौरस मीटरचा भूखंड अवघ्या ४५५ कोटी रुपयांत एका विकासकाला देण्यात आला आहे. हा व्यवहार महानगरपालिकेचे नुकसान करणारा आहे. पंचतारांकित हॉटेलच्या बदल्यात बीएमसीला केवळ ४५५ कोटी रुपये आणि चाचणी प्रयोगशाळेसाठी फक्त १३०० चौरस मीटर जागा मिळणार आहे. या व्यवहारातील अटी केवळ विशिष्ट बिल्डरांना सोयीस्कर ठरतील अशा प्रकारे ठरवण्यात आल्या आहेत. बिल्डर हा भूखंड गिळंकृत करून पंचतारांकित हॉटेलच्या माध्यमातून प्रचंड नफा कमवणार आणि महानगरपालिकेचे मात्र नुकसान होणार हे योग्य नाही.
खा.वर्षा गायकवाड पुढे म्हणतात की, “बीएमसीच्या मालमत्तांच्या लिलावावर बीएमसी गट नेत्यांसमोर चर्चा होणे आवश्यक आहे. स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून योग्य त्या कायदेशीर बाबींचा विचार करूनच असे व्यवहार केले पाहिजेत, अशी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. वरळीतील भूखंडाच्या व्यवहारात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झालेला असून बीएमसीच्या मोक्याच्या मालमत्तांचे अनियोजित लिलाव करण्यास काँग्रेस पक्षाचा तीव्र विरोध आहे. वरळीतील भूखंडाची लिलाव प्रक्रिया तात्काळ थांबवावी आणि भविष्यात मुंबईकरांचे नुकसान होणार नाही, मुंबईला विकण्याच्या प्रकारांना चाप बसला पाहिजे, याची खबरदारी घ्यावी.” असे खा. वर्षा गायकवाड म्हणाल्या..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here