Home मुंबई *समाजातील सर्व घटकातील महिलांची वाटचाल सुसह्य करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका कटिबद्ध*

*समाजातील सर्व घटकातील महिलांची वाटचाल सुसह्य करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका कटिबद्ध*

66
0

*- जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या सन्मान सोहळ्यात महापौर रितू तावडे यांचे प्रतिपादन*

*- विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या ४४ कर्तृत्ववान महिलांचा बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून सन्मान*

सामाजिक, राजकीय, वैद्यकीय, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक यासह विविध क्षेत्रात महिलांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या महिलांच्या पाठीशी बृहन्मुंबई महानगरपालिका सतत उभी असते. सक्षमीकरणाची उंची गाठलेली स्त्री आता अबला नसून सबला झाली आहे, अशा शब्दात मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी स्रीशक्तीचा सन्मान केला. समाजातील सर्व घटकातील महिलांची वाटचाल सुसह्य व्हावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका नेहमी प्रयत्नशील राहील, असेही त्यांनी नमूद केले.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नियोजन विभागाकडून विविध क्षेत्रातील ४४ कर्तृत्ववान महिलांचा दि ३१ मार्च रोजी सन्मान करण्यात आला. भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील पेंग्विन सभागृहात हा सन्मान सोहळा पार पडला. यावेळी महापौर रितू तावडे बोलत होत्या.

उपमहापौर संजय घाडी, महिला बालकल्याण समितीच्या अध्यक्षा मीनल तुर्डे, ए, बी आणि ई प्रभाग समिती अध्यक्ष ज्ञानराज निकम, स्थापत्य समिती (शहर) अध्यक्षा यामिनी जाधव, स्थापत्य समिती (उपनगरे) अध्यक्षा संगीता शर्मा, विधी समितीच्या अध्यक्षा दीक्षा कारकर, महिला बालकल्याण समितीच्या उपाध्यक्षा रिटा मकवाना, आर मध्य आणि आर उत्तर प्रभाग समितीचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, सी आणि डी प्रभाग समिती अध्यक्ष आकाश पुरोहित, महानगरपालिकेचे विविध नगरसेवक, नगरसेविका तसेच संचालक (नियोजन) डॉ. प्राची जांभेकर, महानगरपालिका सचिव मंजिरी देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

महापौर रितू तावडे म्हणाल्या, क्षेत्र कोणतेही असो सातत्याने परिश्रम घेतले की एक दिवस यश मिळतेच. आज या समारंभात विविध क्षेत्रातील ४४ महिलांचा सन्मान करण्यात आला. या प्रत्येक महिलेने आपल्या क्षेत्रात भरीव योगदान दिले. जेव्हा स्त्री घराबाहेर पडत असते तेव्हा कुटुंबासह समाजानेही तिच्या पाठिशी उभे रहायला हवे. अशी साथ मिळाल्यास प्रत्येक स्त्री ही कुटुंबासह समाजासाठी सतत लढत असते.”असेही त्या म्हणाल्या.

पुरस्कार्थी महिलांची पाठ थोपटताना महापौर तावडे यांनी आपल्याही आठवणींना उजाळा दिला. त्या म्हणाल्या, मी देखील समाजकार्याची सुरुवात बचत गटापासून केली होती. त्यावेळी मला देखील वाटले होते की आपल्याला हा पुरस्कार मिळावा. आज त्याच पुरस्काराचे वाटप करण्याची संधी मला मिळाली आहे. बचत गटापासून सुरू झालेला हा प्रवास मुंबईच्या प्रथम नागरिक महापौर पदापर्यंत पोहोचला. या प्रवासात कुटुंबाचा, समाजाचाही तितकाच मोठा वाटा असल्याचे, महापौर रितू तावडे यांनी सांगितले.

उप महापौर संजय घाडी म्हणाले, “समाजातील प्रत्येक क्षेत्रात महिलांचे योगदान आहे. समाजविकासासाठी योगदान देणाऱ्या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका विविध योजनांच्या माध्यमातून सतत प्रयत्नशील असते. महानगरपालिकेचा नियोजन विभाग यासाठी विविध उपक्रम राबवित असल्याचे श्री. घाडी यांनी सांगितले. यावेळी उप महापौर श्री. घाडी यांनी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच नियोजन विभागाने बचत गटाच्या माध्यमातून सुरू केलेल्या माहिम सी फूड प्लाझाचे कौतूक केले. सी फूड प्लाझामुळे कोकणी खाद्य संस्कृती जोपासली जात असून, पर्यटनातही वाढ होत असल्याचे सांगितले. यासोबतच उपस्थितांशी खास मालवणी भाषेत खुमासदारपणे संवाद साधताच उपस्थितांनी देखील ‘होय महाराजा’ म्हणत प्रतिसाद दिला.

महिला बालकल्याण समितीच्या अध्यक्षा श्रीमती मीनल तुर्डे म्हणाल्या, महिलांच्या कार्याचा गौरव केला तर त्यांना अशा कार्यक्रमातून प्रेरणा मिळत असते. ज्या समाजात स्त्रियांचा सन्मान होतो तोच समाज पुढे जातो, असेही त्या म्हणाल्या.

प्रास्ताविक संचालक (नियोजन) डॉ. (श्रीमती) प्राची जांभेकर यांनी केले. बृहन्मुंबई महानगरपालिकेने विविध बँकांच्या माध्यमातून अर्थसहाय्य केलेले आठ हजारांपेक्षा अधिक बचत गट मुंबई कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रत्येक गटाने विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे. तसेच बचत गट आता पारंपरिक व्यवसायांसोबतच ऑनलाइन व्यवसायातही उतरल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात शिक्षण, वैद्यकीय, क्रीडा, ग्रामीण सशक्तीकरण, महिला बालविकास, सामाजिक, उद्योग, योग, पत्रकारिता, वन्यजीव कल्याण अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ४४ महिलांचा सन्मान करण्यात आला. तसेच सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here