*वांद्रे येथील ‘मुंबई डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्र’ला सदिच्छा भेट,कार्यपद्धती, वक्तशीरपणा आणि इतिहास जपण्याच्या प्रयत्नांचा महापौरांनी केला गौरव*
मुंबईची ओळख असलेल्या ‘डबेवाला’ व्यवस्थेने आपल्या शिस्तबद्ध कार्यपद्धती, वक्तशीरपणा आणि अढळ विश्वासाच्या बळावर जगभरात वेगळे स्थान निर्माण केले आहे. ही व्यवस्था केवळ जेवण पोहोचवण्यापुरती मर्यादित नसून उत्कृष्ट व्यवस्थापन आणि सेवा संस्कृतीचे जिवंत उदाहरण आहे. डबेवाले हे खऱ्या अर्थाने मुंबईच्या कार्यसंस्कृतीचे राजदूत आहेत.” असे प्रतिपादन मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी केले.
महापौर रितू तावडे यांनी वांद्रे (पश्चिम) येथील रिझवी महाविद्यालय परिसरातील ‘मुंबई डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्र’ ला बुधवारी संध्याकाळी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी केंद्रातील विविध विभागांची पाहणी केली तसेच डबेवाल्यांशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.
दरम्यान, डबेवाला संघटनेचे सदस्य दिनेश आरडे यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना तातडीने डॉ. रु. न. कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही माहिती मिळताच महापौर रितू तावडे यांनी कूपर रुग्णालयात जाऊन आरडे यांची भेट घेतली आणि विचारपूस केली. तसेच, संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना आवश्यक ते निर्देश दिले. आरडे यांची प्रकृती आता स्थिर आहे.
डबेवाला केंद्र भेटीप्रसंगी नगरसेविका स्वप्नाली म्हात्रे, नगरसेविका सायली कुलकर्णी, मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष रामदास करवंदे, सचिव किरण गवांदे, नूतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष उल्हास मुके, सचिव विनोद शेट्टी, तसेच अनुभव केंद्राचे सुबोध सांगळे आणि डबेवाला संघटनेचे इतर मान्यवर सदस्य उपस्थित होते.
मुंबई डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्र हे डबेवाल्यांच्या ऐतिहासिक परंपरेचे जतन व प्रसार करणारे महत्त्वाचे ठिकाण आहे. येथे डबे वर्गीकरण, कोडिंग आणि वितरण प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो. डिजिटल आणि इंटरॅक्टिव्ह माध्यमांतून या सेवेचा इतिहास व परंपरा अभ्यागतांना समजावून सांगितली जाते. त्याची पाहणी महापौर तावडे यांनी केली.
यावेळी डबेवाल्यांशी संवाद साधताना महापौर रितू तावडे म्हणाल्या की, “सुमारे १३५ वर्षांहून अधिक काळ अखंडपणे सुरू असलेली डबेवाल्यांची सेवा ही कौतुकाच्या पलीकडची आहे. संपुर्ण मुंबईत दुपारी ठराविक वेळेत जेवणाचे डबे पोहोचवण्याची ही व्यवस्था लाखो नागरिकांच्या जीवनाशी निगडित आहे. वारकरी परंपरेतून प्रेरित होऊन भगवंताचे नामस्मरण करत सुरू असलेली ही सेवा मुंबईला जागतिक स्तरावर प्रतिष्ठा मिळवून देणारी ठरली आहे. डबेवाल्यांचे सांघिक कार्य, वेळेचे अचूक नियोजन आणि शिस्तबद्ध कार्यपद्धती ही व्यवस्थापन शिकणाऱ्या प्रत्येकासाठी आदर्श आहे.” असे त्यांनी नमूद केले.
पुढे त्या म्हणाल्या की, “मुंबईत प्रस्तावित प्रवेशद्वारांपैकी एक प्रवेशद्वार डबेवाला संकल्पनेवर आधारित उभारण्याचा मानस आहे. डबेवाल्यांसाठी लवकरच १०५ ई-बाइक्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पुर्वीच्या तुलनेत डबेवाल्यांची संख्या काहीशी कमी झाली असली तरी या सेवेचा गौरव आणि प्रतिष्ठा आजही तितकीच उंचावलेली आहे. या अनुभव केंद्रातून सकारात्मक ऊर्जा मिळाली असून त्या प्रेरणेच्या आधारे मुंबईकरांची अधिक सक्षम सेवा करण्याचा माझा प्रयत्न राहील.”असे सांगत महापौरांनी मनोगताचा समारोप केला.
डबेवाला प्रतिनिधींशी संवाद साधताना त्यांच्या अपेक्षा जाणून घेत, या केंद्राच्या उपक्रमांसाठी आणि डबेवाल्यांच्या हितासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाही देखील महापौरांनी दिली.
महापौरांनी डबेवाल्यांच्या दैनंदिन कामकाजातील ‘सॉर्टिंग’ (वर्गीकरण), ‘कोडिंग’ आणि वितरण प्रक्रियेची सविस्तर माहिती घेतली. अत्यंत गुंतागुंतीची ही प्रक्रिया अत्यल्प त्रुटींनी पार पाडत लाखो डबे वेळेत पोहोचवण्याच्या त्यांच्या कौशल्याचे त्यांनी कौतुक केले.
केंद्रातील ‘वारसा प्रदर्शन’ (Heritage Display) आणि ‘VR झोन’ (Virtual Reality) द्वारे डबेवाल्यांचा प्रवास प्रभावीपणे सादर केला जातो. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ‘डबेवाला’ स्वरूपातील स्वतःचे छायाचित्र पाहण्याची सुविधा देखील येथे उपलब्ध असून, महापौरांनी त्याचाही अनुभव घेतला.
डबेवाला संघटनेच्या वतीने माहिती देताना किरण गवांदे यांनी सांगितले की, डबेवाला सेवेची सुरुवात १८९० मध्ये झाली. या सेवेची मुळे वारकरी संप्रदायाशी जोडलेली आहेत. सध्या मुंबईत दररोज सुमारे एक लाख डबे वितरित केले जातात; कोविडपूर्व काळात ही संख्या दुप्पट होती. टाळेबंदीच्या काळात मुंबईकरांसह जगभरातून मिळालेल्या मदतीमुळे डबेवाल्यांचा उदरनिर्वाह सुरू राहिला आणि त्यांच्या कुटुंबांना मोठा आधार मिळाला. या संकटातून प्रेरणा घेऊन ही सेवा नव्या उर्जेने पुन्हा उभी राहत असल्याचे त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार श्रीकांत भारतीय यांच्या पाठिंब्यामुळे डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्र उभे राहिले, असे नमूद करीत जगभरातून येणारे पर्यटक, विद्यार्थी आणि व्यवस्थापन तज्ज्ञ यांच्यासाठी हे केंद्र माहितीचा मोठा स्रोत ठरत असल्याचे गवांदे यांनी सांगितले.
***





















