Home मुंबई *संगमनेर अॅसिड हल्ला प्रकरण गंभीर; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची पोलीस प्रशासनाला...

*संगमनेर अॅसिड हल्ला प्रकरण गंभीर; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची पोलीस प्रशासनाला तातडीच्या कारवाईची सूचना*

30
0

*अॅसिड विक्रीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी अनिवार्य*

नाशिक, दि. १८ मार्च २०२६ : संगमनेर (जि. अहिल्यानगर) येथे १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या अॅसिड हल्ल्याच्या अत्यंत गंभीर घटनेची विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दखल घेतली असून, या प्रकरणात कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी कठोर आणि तातडीने कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांना दिले आहेत.

दि. १७ मार्च २०२६ रोजी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. संबंधित प्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास जलदगतीने पूर्ण करण्याची गरज डॉ. गोऱ्हे यांनी अधोरेखित केली आहे.

डॉ. गोऱ्हे यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, आरोपीचा शोध घेण्यासाठी आंतरजिल्हा विशेष तपास पथक गठित करून वैज्ञानिक व तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास करावा. घटनास्थळावरील पंचनामा, फॉरेन्सिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) आदी पुरावे तत्काळ संकलित करण्याचेही त्यांनी निर्देश दिले आहेत. तसेच आरोपीची ओळख पटविण्यासाठी टेस्ट आयडेंटिफिकेशन परेड घेणे आणि पीडितेचा जबाब दंडाधिकाऱ्यासमोर नोंदविणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

या प्रकरणात वैद्यकीय अहवाल (MLC), जखमांची तीव्रता आणि हल्ल्याचा हेतुपुरस्सरपणा सिद्ध करणारे पुरावे भक्कमपणे सादर करण्यावरही त्यांनी भर दिला आहे. प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून अनुभवी विशेष सरकारी वकील नेमण्याची कार्यवाही करावी, असेही त्यांनी सुचविले आहे.

याशिवाय, सर्वोच्च न्यायालयाच्या Laxmi Vs. Union of India या प्रकरणातील निर्देशांनुसार अॅसिड विक्री व साठ्याचे काटेकोर नियमन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याचीही त्यांनी मागणी केली आहे.

पीडित मुलीला तात्काळ मोफत वैद्यकीय उपचार, पुनर्वसन आणि आवश्यक पोलीस संरक्षण देण्याचे निर्देश देतानाच, परिसरात गस्त वाढवून शाळा व संवेदनशील ठिकाणी सुरक्षा बळकट करण्यावरही डॉ. गोऱ्हे यांनी भर दिला आहे. सदर घटना अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याने या प्रकरणात प्राधान्याने लक्ष घालून न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस प्रशासनाने तातडीने आणि प्रभावी पावले उचलावीत, अशी ठाम भूमिका उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here