ओम श्री साईनाथ सेवा ट्रस्टच्या सहयोगाने वाळूमधील शंकर पिंडी पूजन
मुंबई
हिंदू नववर्षाच्या पहाटे प्रभादेवी समुद्र तटावर स्थानिक रहिवाशांनी एकत्र येत भक्तिभावाने भगवान शंकराची वाळूमध्ये पिंड निर्माण करून पूजन व संकल्प विधी पार पाडला. उगवत्या सूर्याच्या साक्षीने संपन्न झालेल्या या पूजनामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले.
सदर उपक्रमाचे हे सलग चौथे वर्ष असून, दरवर्षी यामध्ये सहभागी होणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हिंदू संस्कृतीचे जतन व संवर्धन तसेच समाजात धार्मिक जागृती निर्माण करणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
या पूजनामध्ये माजी नगरसेवक संतोष धुरी, भाजप नेते तसेच झोपडपट्टी मोर्चा मुंबई भाजपा चे माजी महामंत्री योगेश सुभाष खेमकर यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्वांनी सामुहिकरित्या भगवंताचे स्मरण करून समाजाच्या कल्याणासाठी संकल्प केला.
सदर उपक्रम ओम श्री साईनाथ सेवा ट्रस्ट यांच्या सहयोगाने तसेच सचिन बाळा पालकर यांच्या संकल्पनेतून व व्यवस्थापनातून दरवर्षी नित्यनियमाने आयोजित करण्यात येतो. हा उपक्रम अधिक व्यापक होत असून समाजात सकारात्मक धार्मिक संदेश पोहोचत आहे.




















