Home Uncategorized “प्राचीन मठ आणि मंदिरं पाडून विकास नको! “पंढरपूर मंदिर कॉरिडॉरचा पुनर्विचार करावा!”...

“प्राचीन मठ आणि मंदिरं पाडून विकास नको! “पंढरपूर मंदिर कॉरिडॉरचा पुनर्विचार करावा!” डॉ. सुब्रमण्यम स्वामींचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र!

56
0

“पंढरपूर हे फक्त एक शहर नसून ते ‘भुवैकुंठ’ आहे, तिथला प्राचीन वारसा नष्ट करून कॉरिडॉर उभारणे म्हणजे वारकरी संप्रदायाचा अपमान तसेच पैशांचा चुकीचा वापर आहे.”अशा स्पष्ट शब्दांत भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले असून प्रस्तावित ‘पंढरपूर मंदिर कॉरिडॉर” वर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. सुब्रमण्यम स्वामी मागील काही काळापासून हिंदूं मंदिरांच्या सरकारीकरणाचा सरकारवर आरोप करत आहेत. “सरकारने ही पवित्र तीर्थक्षेत्र कॉरिडॉर करून पर्यटनस्थळ बनवू नयेत.” अशी मागणी सुब्रमण्यम स्वामी करत आहेत.

प्राचीन मठ-मंदिरे पाडून विकास नको!

डॉ. स्वामी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, वाराणसी आणि उज्जैनच्या धर्तीवर पंढरपुरात कॉरिडॉर बनवण्याचा महाराष्ट्र सरकारचा विचार आहे. मात्र, यासाठी मंदिराच्या १०० मीटर परिघातील ७०० हून अधिक मालमत्ता, प्राचीन मठ, मंदिरे आणि घरे पाडण्याचे नियोजन आहे. हे पाऊल आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा नष्ट करणारे ठरेल.

पत्रात काय म्हटलं?पंढरपुरात वारकरी अनेक पिढ्यांपासून ठराविक घरांमध्ये (मठ/वाडे) मुक्कामाला येतात. ही ‘यजमान कृत्य’ पद्धत मोडीत काढून तिथे शॉपिंग सेंटर्स किंवा कमर्शियल कॉम्प्लेक्स उभारणे हा विरोधाभास आहे, असं स्वामींनी म्हटलं. तीर्थक्षेत्रातील मोकळ्या जागांवर आणि वारकऱ्यांसाठी राखीव असलेल्या जमिनींवर झोपडपट्ट्यांचे अतिक्रमण झाले आहे. हे अतिक्रमण काढण्याऐवजी सरकार जुनी आणि कायदेशीर बांधकामे पाडत असल्याचा आरोप स्वामींनी केला आहे.

पंढरपुरात आधीच १००० हून अधिक मठ आणि धर्मशाळा आहेत. तसेच मंदिर समितीचे स्वतःचे यात्री निवास आहेत. त्यामुळे नवीन यात्री निवास बांधण्यासाठी ऐतिहासिक वास्तू पाडण्याची गरज नाही. स्वामींनी पत्रात नमूद केले की, पंढरपुरात देशातील सर्वाधिक सुलभ संकुल आहेत, परंतु त्यांची देखभाल नीट होत नाही. नवीन कॉरिडॉर बांधण्यापेक्षा आहे त्या सुविधांची दुरुस्ती करणे अधिक हिताचे ठरेल.

चंद्रभागेच्या पलीकडील तीरावर कॉरिडॉर उभारावा!

डॉ. स्वामी यांनी मुख्यमंत्र्यांना सुचवले आहे की, “कॉरिडॉर उभारायचाच असेल, तर तो चंद्रभागा नदीच्या पलीकडील तीरावर जिथे मोकळी जागा आहे तिथे उभारावा. यामुळे शहराचा विस्तार होईल आणि जुन्या पंढरपुरचा ऐतिहासिक वारसाही जपला जाईल.

“वारकरी संप्रदायासाठी पंढरपूरची माती ही पवित्र आहे. येथील प्राचीन वास्तू पाडून भजन-कीर्तनासाठी नवीन मंडप उभारणे हास्यास्पद आहे, कारण भक्ती संकीर्तन सभागृह आधीच अस्तित्वात आहे. मला आशा आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाविक आणि वारकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन या प्रकल्पाचा पुनर्विचार करतील आणि ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाी पर्यायी मार्ग काढतील,” असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here