Home मुंबई *आसावरी जगदाळे यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा निर्णय;

*आसावरी जगदाळे यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा निर्णय;

49
0

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाचे मानले आभार*

मुंबई : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले पुण्यातील संतोष जगदाळे यांची मुलगी आसावरी जगदाळे हिला शासकीय सेवेत सामावून घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यानंतर विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या निर्णयाचे स्वागत करत आभार व्यक्त केले आहेत.

डॉ. गोऱ्हे यांनी म्हटले की, दहशतवादी हल्ल्यात कुटुंबप्रमुख गमावलेल्या कुटुंबाला शासनाकडून मिळणारा हा दिलासा अत्यंत महत्त्वाचा असून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी अनेक प्रशासकीय अडचणींवर मात करून हा निर्णय तडीस नेला आहे. अशा संवेदनशील आणि सहानुभूतीपूर्ण भूमिकेमुळे पीडित कुटुंबाला आधार मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे महानगरपालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून आसावरीच्या शिक्षणाला समकक्ष असे पद निर्माण करून तिला सेवेत सामावून घेण्याचे निर्देश दिले आहेत. शासन विशेष बाब म्हणून सहानुभूतीपूर्वक या नियुक्तीला मंजुरी देईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लवकरच आसावरी जगदाळे हिला शासकीय सेवेत सामावून घेण्याची प्रक्रिया पूर्ण होणार असून या निर्णयामुळे जगदाळे कुटुंबाला मोठा दिलासा मिळणार आहे, असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here