Home Uncategorized *मालमत्‍ताकर थकविणा-या थकबाकीदारांविरोधात जप्‍ती, लिलाव कारवाईचा वेग वाढवावा-*

*मालमत्‍ताकर थकविणा-या थकबाकीदारांविरोधात जप्‍ती, लिलाव कारवाईचा वेग वाढवावा-*

62
0

*अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांचे निर्देश*

*कर निर्धारण व संकलन विभागाची आढावा बैठक संपन्‍न*

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागाने आर्थिक वर्ष २०२५ – २६ मध्ये दि. १ एप्रिल २०२५ पासून ते ४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ५,४२६ कोटी ८१ लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल केला आहे. तसेच, पुढील दोन महिन्यांसाठी मालमत्ता कर वसुलीच्या दृष्टीने व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. ज्या मालमत्ताधारकांनी अद्याप मालमत्ता कर भरलेला नाही, त्यांनी तो लवकरात लवकर भरावा, असे आवाहन अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी केले आहे. ज्या प्रकरणात न्यायालयाचे कारवाई न करण्याबाबत आदेश असतील, अशी प्रकरणे वगळून मालमत्‍ताकर थकविणा-या थकबाकीदारांविरोधात जप्‍ती, लिलाव कारवाईचा धडाका सुरू करावा. तसेच वाणिज्यिक थकबाकीदारांची नळजोडणी खंडित करावी, असे निर्देश देखील जोशी यांनी दिले आहेत.

महानगरपालिका कर निर्धारण व संकलन विभागाच्‍या कामकाजाचा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी दि. ५ फेब्रुवारी २०२६ रौ
रोजी आढावा घेतला. महानगरपालिका मुख्‍यालयात पार पडलेल्‍या या बैठकीस सहआयुक्‍त (करनिर्धारण व संकलन) विश्‍वास शंकरवार, सहायक आयुक्‍त (करनिर्धारण व संकलन) गजानन बेल्‍लाळे यांच्‍यासह संबंधित सर्व प्रशासकीय विभागातील करनिर्धारण व संकलन खात्‍याचे अधिकारी उपस्थित होते.

अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (शहर) डॉ. अश्विनी जोशी म्‍हणाल्‍या की, बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मालमत्ताधारकांकडून करसंकलन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सर्व संबंधितांनी दिलेल्या मुदतीत करभरणा करावा आणि दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई टाळावी,असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून वेळोवेळी केले जात आहे. तथापि, कर भरण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करणाऱया थकबाकीदारांविरुद्ध प्रचलित कायद्यातील तरतुदीनुसार जप्ती व अटकावणीची कठोर कारवाई तात्काळ करण्यात यावी. सदर कारवाईमध्ये भूखंड, निवासी व व्यावसायिक इमारती, व्यावसायिक गाळे तसेच औद्योगिक गाळे यांचा समावेश करण्यात यावा.
थकीत तसेच चालू आर्थिक वर्षातील मालमत्ता कराची १०० टक्के वसुली सुनिश्चित करण्यात यावी. मालमत्तेचे क्षेत्रफळ, वापर व मालकीविषयक माहिती तातडीने अद्ययावत करून नव्याने करयोग्य ठरणाऱ्या मालमत्तांचा करजाळ्यात समावेश करण्यात यावा. प्रभागनिहाय / विभागनिहाय मोठ्या थकबाकीदारांची स्वतंत्र वर्गवारी करून त्यांच्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात यावे. दीर्घ कालावधीपासून कर न भरणाऱया मालमत्तांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात यावी. तसेच, थकबाकीदारांना प्रचलित नियमानुसार नोटिसा बजावणे, दंड व व्याजाची आकारणी करणे आणि आवश्यकतेनुसार मालमत्तांवर जप्ती अथवा लिलावाची कारवाई राबविण्यात यावी. कायदेशीर कारवाईच्या संदर्भात सर्व प्रक्रिया स्पष्ट, पारदर्शक व कालमर्यादेत पुर्ण करण्यात याव्यात, असे निर्देश डॉ. जोशी यांनी दिले आहेत.

कर वसुलीसाठी ऑनलाईन पेमेंट प्रणाली तसेच विविध डिजिटल माध्यमांद्वारे नागरिकांना कर भरण्यासाठी सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यासोबतच, कर भरण्याबाबत लघुसंदेश (एसएमएस), नोटीस व प्रत्यक्ष भेटीद्वारे नियमित पाठपुरावा करण्यात आल्याने वसुलीच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे. कर भरण्याबाबत जनजागृती मोहीम, थकबाकीदारांविरोधात प्रभावी कारवाई राबविण्यात येत आहे. ज्या नागरिकांनी अद्याप कर भरलेला नाही, त्यांनी पुढील कार्यवाही टाळण्यासाठी तातडीने मालमत्ता कर भरावा. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व मालमत्ता करधारकांनी ‘केवायसी (Know Your Customer)’ प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन देखील डॉ. अश्विनी जोशी यांनी केले आहे.

मालमत्तेचे क्षेत्रफळ, वापर (निवासी / व्यावसायिक / औद्योगिक), मालकी हक्क, संपर्क तपशील (भ्रमणध्वनी क्रमांक, ई – मेल आयडी) आदी माहिती अद्ययावत ठेवण्यासाठी केवायसी आवश्यक आहे. यामुळे मालमत्ता कराचे अचूक मूल्यांकन होऊन करआकारणी व वसुली अधिक प्रभावीपणे करता येईल. केवायसी प्रक्रिया महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने तसेच संबंधित प्रशासकीय विभाग कार्यालयांमार्फत ऑफलाईन पद्धतीने करता येणार आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी मालमत्‍ता करधारकांनी प्रशासकीय विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी केले आहे.
***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here