स.न.वि.वि.
आपण रविवारचा दिवस असून पतीच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या सुनेत्रा पवार यांच्यावर लिहिलेला अग्रलेख वाचला. तळवलकरी तिरस्कार व रात्रीची भेटीत मिळालेली स्मोकी सिंगलमाल्ट या दोन गोष्टींमुळे सामान्य कुवतीचा माणूस उंटाच्या पार्श्वभागाचा मुका घेण्याच्या नादात सदसद विवेक कसा गमावून बसतो त्याचे चपखल उदाहरण म्हणजे हे आपले विशेष संपादकीय आहे.
सुनेत्रा पवार या पतीच्या गंड शमनार्थ राज्यसभेत गेल्या इथपासून आपण टिकेस सुरुवात केली आहे. देशात किती व कुणी अशाप्रकारे गंड शमवले याची बेरीज वजाबाकी केलीत तर तुमचे पद तुमच्या साठीनंतरही जे तुमच्यापाशी राहिले आहे ते राहिल का, याचा विचार करावा. आदरणीय इंदिरा गांधीपासून कुटुंबातील व्यक्तीकडे राजकीय वारसा देण्याची जी पद्धत सुरू झाली ती अखंड भारत वर्षात अव्याहत सुरू आहे. यात राजीव गांधी, सोनिया गांधी, राहूल, प्रियंका, अखिलेश यादव, डिम्पल यादव, शिवपाल यादव, राबडी देवी, तेजस्वी, तेजप्रताप यादव, एम के स्टालीन, कन्नीमोई, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, विठ्ठलराव गाडगीळ, अनंत गाडगीळ, सुप्रिया पवार, रोहित पवार अशा लंबी चौडी यादी असून ती प्रसिद्ध करायची झाल्यास गोयंका शेटजीला कागदाचे दोन ट्रक मागवावे लागतील. तर या सगळ्यांनी कुणा कुणाचे गंड शमनार्थ राजकारणात प्रवेश केला याचेही सविस्तर विश्लेषण आपण करावे ते प्रसिद्ध करण्यासाठी आम्ही महाराष्ट्रातील तमाम जनतेकडून निधी जमा करू.
असो त्यानंतर आपण महामहोपाध्याय भारतरत्न पां. वा. काणे यांच्या वरताण धर्मशास्त्राचे अभ्यासक असून काणे यांनी आपल्याच मार्गदर्शनाखाली धर्मशास्त्राचा इतिहास लिहिल्यासारखे हिंदू धर्मातील अंत्यविधीचे निती नियम दिले आहेत. त्यामुळेच वर आपणास महामहोपाध्याय उल्लेखिणे गरजेचे होते.
तर कुबेरजी सुनेत्रा यांनी धर्मशास्त्रानुसार कितव्या दिवशी शपथ घेणे गरजेचे होते यावर जो प्रकाश आपण पाडला आहे, त्या धर्मशास्त्रानुसार पतीच्या निधनानंतर वैधव्य आल्यावर स्त्रीस कोणते अधिकार बहाल केले आहेत हे जरा सांगितलेत तर बरे होईल. राजा राममोहन रॉय यांच्या पासून ते महात्मा फुले सावित्रीमाई एवढेच कशाला या निती नियमांच्या विरोधात उभे राहून तमाम भारत वर्षाच्या मनात परम आदराचे स्थान असलेल्या जिजामातेस सती जाण्यापासून रोखणारे आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी जी सुधारणेची परंपरा या महाराष्ट्रातून सुरू केली ती पुन्हा एकदा महाराष्ट्रातील अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात तुम्हाला नेऊन ठेवायची आहे हे आम्ही जाणून आहोत. कारण अंत्यविधीनंतर १०-१२ दिवसांनंतर उदकशांती करून आप्तेष्ट व सहृद यांच्या भोजनानेच सुतक समाप्ती होते, हे आपण आवर्जून लिहून लग्न असो वा मयत लाडू, जिलब्यांचे भोजन हाणून सुटलेल्या पोटावरून हात फिरवत व जानव्याने पाठ खाजवत
ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर्ब्रह्माग्नौ ब्रह्मणा हुतम्।
ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिना॥
हे असले निरर्थक मंत्रोच्चार करण्याचा आपल्या पूर्वजांचा व्यवसाय शेटजीची चाकरी संपत आल्याने आपणास भविष्यात करायचा असल्याचे मानस स्पष्ट होते. पण त्यासाठी एका महिलेस ती विधवा झाली असून पतीचे सूतक न पाळताच घराबाहेर पडून जवाबदारी घेण्यास उभी राहिल्याने तिच्यावर अशी अश्लाघ्य टीका करणे सभ्य सुधारणावादी समाजात शोभणारे खचितच नाही.
सूतकाचा हा निकष आपण सुनेत्रा पवार यांना लावताना, कै. अजितदादांची राख सावडून लगेचच निरा नदीच्या प्रदुषणाची पाहणी करण्यास गेलेले त्यांचे काका आदरणीय शरद पवार साहेब यांना का लावला नाहीत? अस्थीविसर्जनानंतर दुसऱ्याच दिवशी देशाचे बजेट आहे म्हणून दिल्लीला गेलेल्या आमच्या नेत्या सुप्रिया सुळे यांना या निकषात का बसवले नाहीत? सुतक केवळ पत्नीस लागत नाही महामहोपाध्याय सुतक संपूर्ण घरास लागते ना?
तर असो महामहोपाध्याय गोयंका शेटजींनी लाथ घातल्यावर आपण किरवंताचा व्यवसाय करण्याचे योजल्याचे यावरून स्पष्टच झाले आहे. त्यासाठी आपणास शुभेच्छा! फक्त यापुढे बहुजन समाज व खास करून बहुजन स्त्रियांना धर्मशास्त्राचे सल्ले देण्यापूर्वी महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, वि. रा. शिंदे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या थोरांचे विचार कुणाकडून तरी समजून घ्यावेत ही विनंती. अन्यथा नाठाळाचे माथी काय हाणायचे हे आम्हांस जगद्गुरू तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलेलेच आहे.
कळावे,
आपला
प्रमोद हिंदुराव




















