Home Uncategorized *मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिरात ‘माघी श्री गणेश जयंती महोत्सव’*

*मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिरात ‘माघी श्री गणेश जयंती महोत्सव’*

56
0

*२२ जानेवारीला मुख्य जन्मोत्सव आणि भव्य रथ शोभायात्रा*

मुंबईचे आराध्य दैवत असलेल्या प्रभादेवीच्या श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात ‘माघी गणेश जयंती’ च्या औचित्याने ‘माघ श्री गणेश जयंती महोत्सवा’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी दि. १९ जानेवारीपासून सुरू झालेला हा उत्सव दि.२५ जानेवारीपर्यंत चालणार आहे. सात दिवसांच्या या सोहळ्यात धार्मिक विधींसह सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी भाविकांना मिळणार आहे.
महोत्सवाच्या काळात मंदिरात कार्यक्रमांची सुरुवात दररोज पहाटे ५ ते ५.३० या वेळेत होणाऱ्या काकड आरतीने होईल. त्यानंतर दिवसभर महा नैवेद्य, अभिषेक आणि नमस्कार यांसारखे पारंपरिक वैदिक विधी संपन्न होणार आहेत. भक्तांना बाप्पाचे मंगलमय रुप डोळ्यात सामावण्यासाठी मंदिर प्रशासनाने विशेष अशी व्यवस्था केली आहे.

या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे दररोज संध्याकाळी आयोजित केले जाणारे सांस्कृतिक कार्यक्रम! यामध्ये देशभरातील प्रख्यात कलाकार आपली कला बाप्पाच्या चरणी अर्पण करणार आहेत. यात भजन, लोकनृत्य, शास्त्रीय गायन, शास्त्रीय नृत्य आणि वाद्य संगीताचे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

*२२ जानेवारीला भव्य रथ शोभायात्रा!*

“भाविकांना चांगली सुविधा मिळाली पाहिजे, ही आमची प्राथमिकता आहे. दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळ्या रांगेचे व्यवस्था करण्यात येते. २२ जानेवारी रोजी माघी गणेश जयंतीचा मुख्य सोहळा संपन्न होणार आहे. या दिवशी दुपारी ३ वाजता श्री सिद्धिविनायकाची एक भव्य रथ शोभायात्रा काढली जाणार आहे. सजवलेल्या रथातून बाप्पा आपल्या भक्तांच्या भेटीला येणार असून, ही शोभायात्रा पाहण्यासाठी आणि बाप्पाच्या दर्शनासाठी मुंबईतील भाविकांची अलोट गर्दी होण्याची शक्यता आहे.” अशी माहिती सिद्धिविनायक मंदिराचे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांनी दिली.

*सांस्कृतिक वारसा जपणे*
“आठवडाभर चालणाऱ्या या महोत्सवाचा मुख्य उद्देश केवळ धार्मिक अनुष्ठान नसून, आपली समृद्ध भारतीय सांस्कृतिक परंपरा कायम राखणे हा आहे,” असे मंदिर प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here