ठाणे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी वर्षात ठाण्यात कोणकोणती कामे केली जातील, याचा आराखडा मांडला. २०३० सालापर्यंत मेट्रोचं काम पूर्ण होईल, असेही फडणवीसांनी सांगितले.
ठाणे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विजय मिळवण्यासाठी राज्यातील बड्या नेत्यांनी या ठिकाणी सभांचा धडाका लावला आहे. बुधवारी ७ जानेवारीला ठाण्यातल्या ‘आपलं ठाणे आपला देवाभाऊ’ या मुलाखतवजा कार्यक्रमात ठाण्यातील विकासकामाबद्दल फडणवीस यांनी सांगितलं तसेच नवीन वर्षात ठाण्यात कोणती विकासकामे केली जातील? दळणवळणाच्या सुविधांचा विस्तार कसा केला जाईल? याचा सविस्तर आराखडा मांडला. “भविष्यात सर्व लोकल एसी असतील. विशेष म्हणजे एसी लोकल असल्या तरीही तिकीट दर मात्र वाढणार नाही.”असे फडणवीसांनी सांगितले.
२०३० सालापर्यंत मेट्रोचं काम पुर्ण करणार!
“मुंबई आणि एमएमआरमधील लोकांचा राहण्याचा आणि दळणवळणाचा प्रश्न सोडवता आला तर खऱ्या अर्थाने आपण यशस्वी झालो असे मानता येईल. दळणवळणाच्या दृष्टीने आपण अनेक गोष्टी केल्या आहेत. २०१४ सालानंतर माझ्याकडे राज्याचा कारभार आला तेव्हा आम्ही ५ पाच वर्षात ४७५ किलोमीटरच्या मेट्रोचं प्लॅनिंग केले आणि कामही सुरू केले. पुन्हा आमचे सरकार गेल्यानंतर यातील काही कामांवर स्थगिती देण्यात आली होती. पुन्हा एकनाथ शिंदे यांचे सरकार आले. आम्ही पुन्हा काम चालू केलं,” असे फडणवीस यांनी यावेळी सांगितले. तसेच आम्ही आतापर्यंत २०० किमीचं काम पुर्ण केलं. आम्ही प्रत्येक वर्षाला ५० किमीचं काम पुर्ण करणार आहोत.एकूण ४००किमीचं काम २०२८ च्या शेवटापर्यंत आम्ही पुर्ण करू. सोबतच २०३० सालापर्यंत आम्ही मेट्रोचं संपुर्ण नेटवर्क पुर्ण करू,” असे आश्वासनही त्यांनी जनतेला दिले.



















