मुंबईवर पुन्हा सुनियोजित वक्रदृष्टी कोणाची?
संपादकीय- शीतल करदेकर
मुंबईसह महाराष्ट्र अर्थात संयुक्त महाराष्ट्र, हे हक्काचे त्याग व बलिदान पर्व कोणीही मुंबईकर कधीच विसरणार नाही! मात्र महाराष्ट्र ची चेतना, उर्जा म्हणजे इथला मूळ मराठी माणूस हे कुणी विसरुन फक्त घाणेरडे राजकारण करत असेल तर, त्यावर उपचार कसा करायचा हे मुंबईकरांना माहिती आहे.
मागील काही महिन्यांपासून मुंबईतील कबुतरं आणि कबुतरखाने हे वादाचे विषय बनले. प्रकरण न्यायालयात गेले. मुंबई मनपानेही आपली भूमिका मांडून कृती सुरु केली.
गिरगावात या विषयावर एक प्रकारे लढाई उभा करण्यात आला आम्ही गिरगांवकर या संस्थेच्या माध्यमातून! या लढ्याचा चांगला परिणाम होऊन
जैनमुनी निलेशचंद्र सोबत काही जैन राजस्थानी मंडळी आम्ही गिरगांवकर समिती सोबत आली आणि जैन मुनी निलेशचंद्र यांनी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आठवण अनेकदा काढत काही गोष्टी समोर आणल्या..
*मराठी-जैन वादाचे सूत्रधार लोढा , असा जैनमुनी निलेशचंद्र यांनी थेट आरोप करत या वादाबाबत अनेक मुद्दे मांडले.
ते म्हणाले, कबुतर खाने आणि मांसाहारावरून मराठी जैन समाजात पेटलेला वाद मिटविण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा मंत्री मंगलप्रभात लोढा यांना दिली होती. मात्र मंगलप्रभात लोढा यांनी हा वाद मिटवला नाही. मराठी जैन समाजात जैनमुनी नयन पद्मसागर यांनी भांडणे लावली. त्याला लोढा यांचे समर्थन आणि पाठबळ आहे, असे सांगून मराठी जैन वादाचा खरा सूत्रधार म्हणत जैनमुनी निलेशचंद्र यांनी भाजपा मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे सरळ सरळ निर्देश केले. या वादात जैन समाजाचा थेट सहभाग नसून लोढा यांचे निकटवर्ती काही बिल्डर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हा वाद आम्ही गिरगांवकर संघटनेसोबत जाऊन स्वतःहून पुढाकार घेऊन मिटवीत आहोत
यामागे असलेल्या मंगलप्रभात लोढा यांच्या टॉवरमध्ये जाऊन ‘जय महाराष्ट्र आणि जय जिनेंद्र’असे लिहिणार असल्याचा इशाराही जैनमुनी निलेशचंद्र यांनी दिला आहे.
तर आम्ही गिरगांवकर संस्थेचे सागवेकर म्हणाले की, ” कबुतर खान्यात कबुतरांना खाणं देणार असाल तर आमच्या मराठी लोकांत कावळ्यांना वेगळं महत्त्व आहे, म्हणून कावळ्यांना मास-मच्छी देण्याची परवानगी असायला हवी.
कबुतरांना दाणे नि कावळ्यांना मांस,मच्छी देण्याची सुरुवात होणार का? तर त्याचं उत्तर ‘हो’ असं येणार नाही; कारण आपल्या हिंदु धर्मात कावळ्यांना असा पोसण्याचं काम कुणीच करणार नाही.
देव धर्म, पुण्य, पाप यांचा हिशेब दिखावा करुन,इतरांना त्रास होईल अशी कृती आपण मराठी लोक करणार नाही!
आम्ही गिरगांवकर संस्थेचे अध्यक्ष गौरव सागवेकर यांनी स्पष्ट केले की, जिथे-जिथे मराठी आणि मराठी संस्कृतीच्या विरोधात ‘अरे’ ची भाषा
केली जाईल तिथे आम्ही त्यांना शब्द आणि ताकदीने ‘काय रे?’ ची भाषा करू, असा इशाराच त्यांनी जैनांना दिला. जन कल्याण पार्टीच्या माध्यमातून जैनमुनी निलेशचंद्र यांनी मराठी जैन वाद मिटवण्यासाठी आम्ही गिरगावकर या संस्थेला शांततापुर्ण चर्चेसाठी प्रेस क्लब येथे नुकतेच निमंत्रित केले होते. त्यावेळी अध्यक्ष गौरव सागवेकर, शिल्पा नायक, मिलिंद वेदपाठक उपस्थित होते. ही सगळी चर्चा व विषय मांडणी प्रसार माध्यमांसमोर करण्यात आली. तेव्हा निलेशचंद्र म्हणाले की, मराठी मांसाहाराचा वाद हा ५ ते ७ वर्षांपुर्वी जैनमुनी नयन पद्मसागर यांनी सुरु केला होता.
विचार करण्यासारखी गोष्ट की ही कबुतरबाजी मुंबईत का व कुणी सुरु केली? आणि आता निवडणुकीच्या तोंडावर जैन मुनी सुसंवादी व वाद मिटवण्याची भाषा करतात!
मुंबई आमची कर्मभूमी ,महाराष्ट्र जन्मभूमी आहे.
महाराष्ट्राचे नेहमीच सहकार्य राहिले आहे.
असं खूप काही मुनी निलेशचंद्र म्हणाले.
ठीक आहे देर से ही सही काही बरं सुचलं यांना, या शांतीसाठी काही राजकारण असेल तर असो पण मुंबईकर मराठी माणूस कधीही कोणताही अन्याय दादागिरी सहन करणार नाही , कारण महाराष्ट्र, मुंबई ही मोठ्या मनाची भूमी असली तरी वीरांची भूमी आहे.
तरीही सांगावसं वाटतं, सावधान हो मुंबईकर!
***





















