*राजमाता जिजाऊ बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेचा उत्साहात समारोप*
शेगाव –
“बॉक्सिंग क्षेत्रात चांगले बॉक्सर घडावेत ही आमची भावना आहे. खेळाडूंना ताकद, राजाश्रय देणे, महाराष्ट्रातील बॉक्सर देश-आंतरराष्ट्रीय पातळीवर जावे हे माझे स्वप्न असून ते नक्कीच पूर्ण करणार.”असे प्रतिपादन महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष व भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी केले. महाराष्ट्र राज्य राजमाता जिजाऊ बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेचा समारोप नुकताच पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष आ. हेमंत पाटील, डॉ. अपर्णा संजय कुटे, विजय राऊत, महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे कार्याध्यक्ष विठ्ठल लोखंडकार, महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे महासचिव भरत व्हावळ यांसह मोठ्या संख्येने बॉक्सिंग असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. या स्पर्धेत जळगाव (खानदेश) जिल्ह्याने प्रथम, पुणे जिल्ह्याने द्वितीय, तर मुंबई उपनगर संघाने तृतीय क्रमांक पटकावला.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना आ. दरेकर म्हणाले की, “बॉक्सिंगमध्ये मी काय पंच मारतो ते तुम्ही सर्वांनी विधिमंडळात पाहिले आहात. खेळाला राजाश्रय नसेल तर कितीही कर्तृत्ववान मुले असली तरी त्यांना पुढे जाता येत नाही. खेळाडूंचे अनेक विषय आहेत. नोकरीत सामावून घेणे, प्रत्येक जिल्ह्यात बॉक्सिंग रिंग, प्रशिक्षक व अद्ययावत अशा उपकरणांनी सुसज्ज असे प्रशिक्षण केंद्र असावे अशा अनेक मागण्या आहेत. इतर खेळांप्रमाणे राज्यातील बॉक्सिंगला पुन्हा वैभवाचे दिवस क्रीडामंत्र्यांच्या नेतृत्वात येतील,” असा विश्वासही दरेकरांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
दरेकर पुढे म्हणाले की, बॉक्सिंग हे क्षेत्र माझे नव्हते. आम्ही राजकारणात बॉक्सिंग करायचो. परंतु ४-५ वर्ष या खेळाकडे कुणाचेच लक्ष नव्हते. जय कवळी, लोखंडकर यांनी आग्रह केला. हा मातीतील खेळ आहे. महाराष्ट्राने अनेक शिवछत्रपती पुरस्कार विजेते दिले. पुन्हा देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर बॉक्सिंग पोचले पाहिजे व ते मी करून दाखवेन असा विश्वासही दरेकरांनी व्यक्त केला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यावेळी निवडणुका होत्या त्यावेळी आपल्यामागे त्यांचा आशीर्वाद होता म्हणूनच दैदिप्यमान असे यश आपण मिळवले. चॅरिटी कमिशनर यांच्या आदेशाने बॉक्सिंग असोसिएशनची रीतसर निवडणूक झाली. लोकशाही मार्गाने आम्ही निवडून आलो. तरी अडॉप्ट कमिटी या स्पर्धा बोगस असल्याचे सांगते. लोकशाही मार्गाने घेतलेली स्पर्धा बोगस कशी? असा सवाल करत त्यांना खाबुगिरीची सवय लागली होती. खोटी प्रमाणपत्रे वाटायची, बॉक्सिंगसाठी काही करायचे नाही. या खोट्या लोकांची चौकशी लावलीय. त्याचाही निर्णय होणार असल्याचे, दरेकर म्हणाले.
दरम्यान, कार्यक्रमाचे संचालन शिप्रा मानकर यांनी केले. समारोपप्रसंगी आभार प्रदर्शन महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. संतोष आंबेकर, निलेश इंगळे यांनी केले. बॉक्सिंग फेडरेशनचे सहायक प्रकल्प अधिकारी राजू महाले, जिल्हा सहसचिव विनोद टिकार, संकेत धामंदे, संकेत सरोदे व आरती खंडागळे यांसह आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
*बोगस खेळाडूंवर कारवाई करणार – क्रीडामंत्री कोकाटे*
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले की, “नुकताच विधानपरिषदेत आ. प्रविण दरेकर यांनी बॉक्सिंग खेळासंदर्भात प्रश्न उपस्थित केला असून, सुविधांबाबत सकारात्मक उत्तर मिळाले आहे. राज्यात स्पोर्ट्स कोड व कायदा आणण्यात येणार असून बोगस खेळाडूंवर कडक कारवाई केली जाईल. शहरासह ग्रामीण भागातील बॉक्सिंग खेळाडूंना आवश्यक सुविधा देण्यात येतील. आगामी ऑलिम्पिक स्पर्धेत महाराष्ट्राचा एकतरी खेळाडू सुवर्णपदक जिंकेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. तसेच राजाश्रय नसेल तर कितीही हुशार खेळाडू असला तरी तो पुढे जाऊ शकत नाही. क्रीडा खात्याचे कार्य निश्चितच वाखाणण्याजोगे आहे. बॉक्सिंगसारख्या देशी खेळांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. महाराष्ट्राने अनेक शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू घडवले असल्याचेही, मंत्री कोकाटे म्हणाले.
00000



















