Home मुंबई *अंधेरी – घाटकोपर जोड मार्गावरील (AGLR) उड्डाणपुलाच्‍या बांधकामामुळे बाधित होणा-या पात्र रहिवाशांचे...

*अंधेरी – घाटकोपर जोड मार्गावरील (AGLR) उड्डाणपुलाच्‍या बांधकामामुळे बाधित होणा-या पात्र रहिवाशांचे (PAP) तातडीने पुनर्वसन करावे*

95
0

*रेल्‍वेमार्गावरील विद्यमान उड्डाणपुलाचे संरचनात्मक लेखापरीक्षण (Structural Audit) आवश्‍यक*

*वाहतूक पोलिसांसमवेत समन्‍वय साधून या मार्गावर अवजड वाहनांना तात्‍पुरती मनाई करावी*

*महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक भूषण गगराणी यांचे प्रत्‍यक्ष पाहणी दौ-यादरम्‍यान विविध निर्देश*

अंधेरी – घाटकोपर जोड मार्गावर (AGLR) ‘महारेल’च्‍या माध्‍यमातून रेल्‍वे मार्गावर उड्डाणपूल उभारण्‍याचे काम प्रगतिपथावर आहे. या उड्डाणपुलामुळे रस्‍त्‍याच्‍या दोन्‍ही बाजूस असणारी निवासी आणि अनिवासी बांधकामे बाधित होत आहेत. पात्र प्रकल्‍प बाधित नागरिकांचे (PAP) तातडीने पुनर्वसन करावे व पुलाच्‍या बांधकामाला गती द्यावी. रेल्‍वेमार्गावरील विद्यमान उड्डाणपुलाचे संरचनात्मक लेखापरीक्षण (Structural Audit) करावे. वाहतूक पोलिसांसमवेत समन्‍वय साधून अवजड वाहनांना तात्‍पुरती मनाई करावी, असे विविध निर्देश महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक श्री.भूषण गगराणी यांनी आज (दिनांक ९ ऑक्‍टोबर २०२५) दिले.

बृहन्‍मुंबई महानगरपालिका आणि महाराष्‍ट्र रेल इन्‍फास्‍ट्रक्‍चर डेव्‍हलपमेंट कार्पोरेशन (महारेल) यांच्‍या वतीने अंधेरी – घाटकोपर जोड मार्गावर उड्डाणपूल उभारण्‍यात येत आहे. रेल्‍वेमार्गावर उभारण्‍यात येणा-या या पूलाचे काम ‘महारेल’ करत असून बृहन्‍मुंबई महानगरपालिका अर्थसहाय्य करत आहे. केबलस्‍टेड रचना आधारीत असलेल्‍या या पुलाचे बांधकाम दोन टप्‍प्‍यात केले जाणार आहे. महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक श्री.भूषण गगराणी यांनी गुरूवारी (दिनांक ९ ऑक्‍टोबर २०२५) पहिल्‍या टप्‍प्‍यात सुरू असलेल्‍या बांधकामाची प्रत्‍यक्ष भेट देऊन पाहणी केली.

स्‍थानिक आमदार राम कदम, स्‍थानिक आमदार पराग शहा, ‘महारेल’चे व्‍यवस्‍थापकीय संचालक राजेश कुमार जैस्‍वाल, महानगरपालिका उपायुक्‍त (परिमंडळ ६) संतोषकुमार धोंडे, सहायक आयुक्‍त (एन विभाग) डॉ. गजानन बेल्‍लाळे, प्रमुख अभियंता (पूल) उत्‍तम श्रोते, उपप्रमुख अभियंता (पूल) राजेश मुळ्ये यांच्‍यासह संबंधित अधिकारी – अभियंते यावेळी उपस्थित होते.

उड्डाणपूल प्रकल्‍पाच्‍या प्रगतिचा आढावा घेताना महानगरपालिका आयुक्‍त गगराणी म्‍हणाले की, “पूल पुर्ण झाल्यानंतर परिसरातील वाहतुकीवरील ताण लक्षणीय प्रमाणात कमी होईल आणि नागरिकांना अधिक सुलभ, जलद व सुरक्षित प्रवासाचा लाभ मिळणार आहे. पूल बांधणीचा कालावधी वाढू नये आणि नागरिकांना कोणतीही असुविधा होऊ नये, याची विशेष दक्षता घ्‍यावी. बांधकामांची ठोस कालमर्यादा निश्चित करावी. रस्‍ता रूंदीकरण, पूल प्रकल्‍पामुळे बाधित होणा-या पात्र निवासी/ अनिवासी बाधितांची विगतवारी करावी. त्‍याचे तातडीने पुनर्वसन करावे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) यांच्‍याशी समन्‍वय साधून प्राधान्‍याने पुनर्वसन कार्य हाती घ्‍यावे. बाधितांचे टप्‍प्‍याटप्‍प्‍याने पुनर्वसन करून पुलाच्‍या कामाला गती द्यावी. विविध उपयोगिता वाहिन्‍यांचे नियोजनपूर्वक स्‍थलांतरण करावे. रेल्‍वे मार्गावरील अस्तित्‍त्‍वातील पुलाचे संरचनात्मक लेखापरीक्षण करावे. वाहतूक पोलिसांशी समन्‍वय साधून अवजड वाहनांना मनाई करावी. नागरिकांना पर्यायी मार्ग उपलब्‍ध करून द्यावा.”असे निर्देश गगराणी यांनी दिले.

पूल पाहणी दौ-यानंतर महानगरपालिका आयुक्‍त भूषण गगराणी यांनी घाटकोपर पूर्व येथील महानगरपालिकेच्‍या ‘एन’ विभाग कार्यालयास भेट दिली. अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (पुर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यावेळी उपस्थित होते. यावेळी गगराणी यांनी विभाग कार्यालयात कार्यरत नागरी सुविधा केंद्रास (CFC) आकस्मित भेट दिली. नागरिक व कर्मचा-यांशी संवाद साधत प्रत्‍यक्ष कामकाज, नागरिकांच्‍या अपेक्षा जाणून घेत निर्देश दिले. नाग‍री सुविधा केंद्रात नागरिकांसाठी पुरेशी आसन व्‍यवस्‍था, पिण्‍याचे पाणी, अडथळाविरहित वावरता येईल अशी जागा इत्‍यादी उपलब्‍ध असावी. इंटरनेट, सर्व्‍हर, सिस्टिम सुरळीत सुरू राहील, याची दक्षता घेतली पाहिजे. कागदपत्रांसाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागू नयेत. कमी वेळेत, कमी खर्चात नागरी सुविधा उपलब्‍ध करून द्याव्‍यात.” असे निर्देश महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी यावेळी दिले. नागरी सुविधा केंद्रामध्‍ये टोकन प्रणालीची कशाप्रकारे अंमलबजावणी होते, याची पडताळणीदेखील गगराणी यांनी केली.
***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here