Home Uncategorized *सहकाराला पुन्हा गतवैभव आणणार* *वार्षिक सभेत आ. दरेकरांचे प्रतिपादन*

*सहकाराला पुन्हा गतवैभव आणणार* *वार्षिक सभेत आ. दरेकरांचे प्रतिपादन*

56
0

मुंबई – “सहकार चळवळ अडचणीत आहे. तिला ताकद देण्याची गरज आहे. कधीकाळी ग्रामीण अर्थव्यवस्थेवर सहकाराचा पगडा होता. बँका, सहकारी संस्था अडचणीत आहेत. ज्याप्रकारे स्वयं पुनर्विकासासाठी दरेकर समिती नेमून त्याचा अहवाल मी शासनाला सादर केला तशाच पद्धतीने राज्यातील सहकारावरील अडचणीचा अहवाल सरकारला देणार आहे. सहकाराला पुन्हा गतवैभव आणून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार.” असे प्रतिपादन भाजपा गटनेते आणि महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांनी केले. ते मुंबई पूर्व उपनगर जिल्हा मजूर सहकारी संस्थेच्या ३१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते.

या प्रसंगी मुंबई पूर्व उपनगर जिल्हा मजूर सहकारी संस्थेचे अध्यक्ष बाळा साळुंखे, संचालक, मुंबई बँकेचे संचालक आनंदराव गोळे, माजी नगरसेवक ईश्वर तायडे यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना दरेकर म्हणाले की, “या मजूर चळवळीतूनच आपण मोठे झालो. राज्याच्या राजकारणात एका टप्प्यावर येऊन पोचलो असेन, विरोधी पक्षनेता म्हणून काम केले, विधिमंडळाचा नेता म्हणून काम करत असेन तरी माझे मूळ हे मजूर चळवळ आहे याचे मला सातत्याने भान असते. मुंबईतील मजूर संस्थांना चांगल्यापैकी कामे मिळताहेत हे नाकारण्यासारखे नाही. मजूर चळवळीच्या ज्या अडचणी होत्या त्या सोडविण्याचे काम आपणच केले. प्रसंगी टीकाही सहन केली, मात्र चळवळीपासून कधीच पळ काढला नाही. प्रत्येक संकट अंगावर घेऊन मजूर संस्थेला सुरक्षित ठेवण्याचे काम केले असल्याचेही दरेकर म्हणाले.

ते पुढे म्हणाले की,: तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने राज्य सहकारी संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. निवडणूक लढवून २१ पैकी २० जागा जिंकलो. १०६ वर्षांपूर्वी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी या संघाची स्थापना केली. वसंतदादा पाटील, विलासराव देशमुख यांसारख्या अनेक नेत्यांनी संघाला मार्गदर्शन केले. सहकार चळवळीला दिशा देण्याचे काम संघाने केले. परंतु अलिकडच्या काळात संघाची स्थिती बिकट झाली. वर्षभराच्या काळात राज्याच्या संघाचे चित्र बदलणार. संघाच्या माध्यमातून राज्यभर शिक्षण प्रशिक्षण देण्याचे काम करणार. केंद्र आणि राज्य सरकारने शिक्षणाला खूप महत्व दिले असून येणाऱ्या सहा महिन्यात नीट शिक्षणाचा ढाचा उभा राहिलेला दिसेल, असा विश्वासही दरेकरांनी व्यक्त केला.

*मुंबई बँकेच्या माध्यमातून अनेक योजना राबविल्या*

दरेकर म्हणाले की, “मुंबई जिल्हा बँकेच्या माध्यमातून अनेक योजना आणल्या. बाराशे कोटींची बँक आपण १५ हजार ७०० कोटींवर नेली. अशा प्रकारे बँकेची प्रगती केली असून बँक म्हणजे केवळ कर्ज घ्या, डिपॉजिट वाटा यापलीकडे जाऊन काम केलेय. मुंबई बँकेच्या माध्यमातून शिक्षण संस्था, गिरणी कामगार, माथाडी कामगार यांना आर्थिक मदत केली. लाडक्या बहिणींसाठी शून्य शिल्लक खाते सुरु केले. महिलांना बिनव्याजी कर्ज योजना सुरु केली. ”

*तंत्रज्ञानानुसार बदलावे लागेल*

दरेकर म्हणाले की, “सहकारातील पैसा सहकारात राहिला पाहिजे. आपल्या बँका मजबूत झाल्या तर, मुंबईच्या अर्थव्यवस्थेवर सहकाराचा पगडा राहील. तंत्रज्ञानानुसार बदलावे लागेल. स्पर्धेप्रमाणे, लोकांच्या गरजेप्रमाणे बदलावे लागेल. येणाऱ्या स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी एकेक पाऊल ताकदीने पुढे टाकले पाहिजे. येणारा काळ आपला आहे. प्रत्येक संस्था, मुंबईतील सहकार चळवळ ताकदवान झाली पाहिजे. राज्याच्या सहकाराला दिशा देण्याचे काम मुंबई शहर करेल.”असा दृढ विश्वासही दरेकरांनी व्यक्त केला.

00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here