*हाताला काम अन कष्टाला मोल..देणार तेच खरे राज्यकर्ते!*
*चांगभलं*- *द ग्लोबल टाइम्स* *दि ३०/८/२०२५*
*शीतल हरीष करदेकर *कार्यकारी संपादक*
मराठा समाज नेहमीच लढवय्या आणि कर्तबगारीने काम करणारा समाज म्हणून ओळखला जातो.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही वतनदारीत धन्यता मानून दिवस चाकरीत घालवणारे लोक होते. त्या लोकांना एकत्र करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज मराठा होते.
त्या काळात, मराठा समाज हा कृषी व लष्करी कौशल्याच्या आधारावर तैयार झाला.
कुणबी याचा अर्थ कृषी समुदायाच
संबंधित आहे. महाराजांनी अठरापगड जातीला एकत्र आणून स्वराज्य निर्माण केले.हे सर्वज्ञात आहे.
इतर मागासवर्गीय कोट्यातून मराठ्यांना आरक्षण मागण्यात हित नसून नुकसान आहे.हे सुशिक्षित समजुनदार मराठ्यांना कळते. इतर मागासवर्गीयांना जे आरक्षण आहे.त्याचा लाभही किती गरजुना होतो, किती वंचित रहातात. तसेच गरजू मागासवर्गीयांना आरक्षणाचा किती लाभ होतो याचा अभ्यास करण्याची वेळ आली आहे.
जरांगे पाटील जी मागणी करत आहेत, ती पुर्ण होणे कठीण आहे. हे त्यांनाही माहित असावं!
जरांगे पाटील स्टार आहेत. त्यांची हरएक अद्ययावत कृती चॅनेल्स ना आकर्षक वाटतात.राजकारण होतं. वादळ येतय..म्हणून बातम्यात नवनवे रंग भरले जातात. असं होऊ नये हे कोण सांगणार?
आपला आवाज उठवणं हा आपला अधिकार, पण हा अधिकार राजकीय मैदानाचा विषय होऊ नये.
सत्तेत आणि विरोधातील मराठा, ओबिसी, बिसी सगळ्यानीच एकत्र येऊन चिंतन करण्याची गरज आहे.
*आर्थिक निकषावर व स्वतंत्र आरक्षण हे महत्त्वपुर्ण*
मराठा असो की कृषी काम करणारे इतर जातीतील लोक जे ओबीसी त नाहीत. जे ब्राह्मण कृषी म्हणजे शेती करत नाहीत ते कुणबी नाहीत. त्यांना वगळून आरक्षण दिले तर त्याचा फायदा जास्त होणार आहे.
पुर्वीच्या मोठ्या शेतीचे तुकडे पडत-पडत शेतकरी अल्प भूधारक बनले.अर्थकारण गडबलं!
मराठ्यांच्या मुलामुलींना नोकर्या जर आर्थिक निकषांवर आरक्षणाने मिळणार असतील आणि जे १० टक्के मिळतय तर ते नाकारून ओबीसी त घुसण्यात काय हशील आहे?
*जातीवार जनगणनेसह कामानुसार ही जनगणना ही काळाची गरज*
मा. हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी घरटी एक नोकरी द्यावी अशी मागणी केली होती.कुणीही उपाशी राहू नये ही भूमिका होती. मागील अनेक वर्षांपासून आरक्षणाचा लाभ घेत घरटी ३/४ मोठमोठ्या पदावर असणारे नवश्रीमंत तयार झाले.होऊ देत आनंद आहे.पण आरक्षणाचा लाभ जर आपल्या गायगरीब बंधूभगिनीना मिळत नसेल तर विषमता वाढते आहे. छोटा शेतकरी वाईट अवस्थेत आहे. रोजगार नाही. ते प्रश्न सोडवणे आवश्यक आहे.
प्रत्येक जाती जमातीत भीषण परिस्थितीत जगणारे वंचित आहेत. त्यांचा विचार त्या-त्या जातीचे नेते करून सुधारणा करतील तो सोन्याचा दिवस असेल.
लोकसंख्या..आणि जगण्याचा ताळमेळ हा फक्त खरा जनहिताच राजनेतेच लावू शकतात. आणि जनमत हे चॅनलवर तयार होत नाही तर घरोघरी चे आवाज ऐकून होत असते. हे कोण समजून घेणार?
*आता दुसरा महत्वपूर्ण विषय आहे तो आपल्या गणेशोत्सवाचा.*
लोकजागराचे माध्यम म्हणून महात्मा फुले,लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक उत्सवाची कास धरली.
महाराष्ट्र शासनाने आता एक पाऊल पुढे टाकत या गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून मान्यता दिली. अनेक प्रकारे या सांस्कृतिक समृद्ध परंपरेला लोकजागराला बळ देण्याचे काम धडाक्यात सुरू केले.
*आर्थिक विकास*: गणपती उत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणात पैसे खर्च केल्याने स्थानिक व्यवसायांना चालना मिळू शकते, ज्यामुळे आर्थिक विकास होतो.
*पर्यटन प्रोत्साहन*: गणपती उत्सवादरम्यान पर्यटनाला चालना मिळू शकते, ज्यामुळे राज्याचे उत्पन्न वाढू शकते.
*सांस्कृतिक प्रोत्साहन*: राज्याच्या सांस्कृतिक वारशाचा प्रचार होऊ शकतो, ज्यामुळे राज्याची ओळख आणि प्रतिष्ठा वाढू शकते.
*नोकरी निर्मिती*: आयोजन, सजावट आणि सुरक्षिततेसारख्या नोकऱ्या निर्माण होऊ शकतात.
*सरकारी योजनांचा प्रचार*: सरकारी योजनांना प्रोत्साहन मिळू शकते, ज्यामुळे लोकांना सरकारी योजनांची जाणीव होऊ शकते.
*जगण्याचे विषय, प्रश्न यांना यातून चालना मिळावी*
हे देखील महत्त्वाचे आहे की, सरकारने मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करण्यापूर्वी, ते पैसे पारदर्शक आणि प्रभावी पद्धतीने वापरले जात आहेत याची खात्री केली पाहिजे.
अनेक आजार आहेत त्यावर काम करता येईल. फक्त अमक्या ढमक्या दिवसापुरते प्रचार प्रसार होतात. पैसा खर्च होतो.तो गणेशोत्सव,नवरात्रोत्सव अशा जबरदस्त भक्तिमय ठिकाणी नियोजनबध्दपणे लोकांपर्यंत पोहोचवले.तर सरकारचा म्हणजे आमचा पैसा कामी लागेल.
थॅलसेमिया वर जनजागृती अशाच ठिकाणी होऊ शकते जिथे युवाशक्ती एकवटते.
आरोग्य, शिक्षण, महिला, उद्योग, मायमराठी हे विषय जगण्यासाठी आणि सन्मानाने ठामपणे पुढे जाण्यासाठी महत्त्वपुर्ण आहेत.
या सार्वजनिक मंडळाचा विचार फक्त तेव्हढ्याच काळापुरता न होता. तो वर्षाचे १२ महिने व्हावा. तर विषय रुजले जातील.
*शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप* *राजांची नीती आणि शैली समजून काम करतील ते खरे राज्यकर्ते!*
*इथे गुणीजन अभ्यासू यांचं ऐकण्याची मानसिकता कमी झालीय. ती कधी सुधारेल तो सुदिन..नाहीतर आमचे शायनिंग..रिल ..सुरूच रहितील.ज्याचं जनहिताशी काही देणं घेणं नाही.*
*आपला पक्ष, आपला कार्यकर्ता असा आपपरभाव नेत्यांकडून संपेल किंवा कमी होईल, तेव्हाच खरा गुलाल भंडारा उधळला जाईल.*
*****


















