*”विरोधक दिशाभूल करत असले तरी, महिलांचा आत्मसन्मान मजबूत करण्यास शासन कटिबद्ध” – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे*
नवी दिल्ली
दिल्ली विधानसभेचे पहिले निवडून आलेले अध्यक्ष विठ्ठलभाई पटेल यांच्या कार्यभार ग्रहणाच्या शताब्दी वर्षानिमित्त अखिल भारतीय पीठासीन अध्यक्षांच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या अधिवेशनात भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात महाराष्ट्राने दिलेल्या अद्वितीय योगदानाचा गौरवपूर्ण आढावा घेतला.
या अधिवेशनात महाराष्ट्राच्या वतीने केलेल्या भाषणाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. यानंतर संध्याकाळी झालेल्या सीपीएच्या बैठकीत दिल्ली विधानसभा वाचनालयातील उपयुक्त साहित्य महाराष्ट्र विधानसभेत उपलब्ध करून देण्याबाबत चर्चाही झाली.
पत्रकारांशी संवाद साधताना डॉ. गोऱ्हे यांनी राज्य सरकारच्या ‘लाडकी बहीण’योजनेबाबत विशेष भाष्य केले. त्या म्हणाल्या, “शिवसेना महिला आघाडीच्या बैठकींतून आम्ही महिलांचा आवाज ऐकून शासनापर्यंत पोहोचवला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांतून या योजनेतून महिलांना थेट दीड हजार रुपयांचा निधी मिळत आहे. हा निधी ही फक्त सुरुवात असून पुढे आणखी उपयुक्त स्वरूपात ही योजना विकसित होणार आहे. महिलांच्या क्रेडिट बँकची सुरूवात झाली आहे. काहींना चुकीच्या पद्धतीने लाभ मिळाल्यास त्यावर कार्यवाही सुरू आहे. परंतु काही विरोधक महिलांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा आणि दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे अजिबात खपवून घेतले जाणार नाही.”
त्या पुढे म्हणाल्या की, “लाडक्या बहिणींचा आत्मसन्मान वाढविण्यासाठी व त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. ओव्हरड्राफ्ट सुविधेमुळे महिलांना आर्थिक आधार मिळतो आहे. अनेक बँका, आमदार, पालकमंत्री सहकार्य करत आहेत. महिलांच्या चेहऱ्यावर उमललेले हास्य आणि कुटुंबाचा वाढलेला सन्मान हीच या योजनेची खरी यशोगाथा आहे. शिवसेना महिला आघाडी ही योजना प्रत्येक भगिनींपर्यंत पोहोचवण्यासाठी सक्रियपणे काम करत आहे. ही योजना महिलांच्या सुरक्षिततेसाठी व विकासासाठी नक्कीच मोलाची ठरणार आहे.”



















