मंगलप्रभात लोढा हे कुण्या एका समाजाचे मंत्री नाहीत!
मंगलप्रभात लोढांनाही सुनावले
दादर येथील कबुतरखान्याजवळ झालेल्या आंदोलनावरून राज ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आहे. तसेच मंत्रीमंगलप्रभात लोढा हे कुण्या एका समाजाचे मंत्री नाहीतअसेही ते म्हणाले.
कबुतरखाने बंद करण्याच्या वादावर राज ठाकरे यांनी आपली रोखठोक भूमिका व्यक्त केली आहे.
“कबुतरखान्याबाबत उच्च न्यायालयाचा निर्णय आहे. त्याप्रमाणे सर्वांना वागावे लागेल. जैन मुनींनी या गोष्टीचा विचार करणे गरजेचे आहे. उच्च न्यायालयाने कबुतरखान्यांवर बंदी घातली आहे, तर त्याचप्रकारे ती गोष्ट झाली पाहिजे”, असे मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सांगितले . मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी कबुतरखान्यांवरील बंदी आणि काही महानगरपालिकांनी १५ ऑगस्ट रोजी मांस विक्रीवर आणलेल्या बंदीविषयी त्यांची स्पष्ट भूमिका सांगितली.
राज ठाकरे पुढे म्हणाले, “कबुतरांमुळे कोणत्या प्रकारचे रोग होतात, याबद्दल अनेक डॉक्टरांनी माहिती दिली आहे. कबुतरांना खायला देऊ नये, असे उच्च न्यायालयाने सांगूनही जर कुणी खायला टाकत असेल तर त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करणे गरजेचे आहे. धर्माच्या नावावर खायला टाकत असाल तर ते चुकीचे आहे.”
“एकाने खायला टाकल्यानंतर बाकीचेही तसेच करणार. मग उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय हवेच कशाला? दादरच्या कबुतरखान्याबद्दल जैन धर्मीयांनी आंदोलन केले, त्यानंतर ही बंदी कायम राहावी यासाठी काल मराठी संघटनेनेही आंदोलन केले. पहिले आंदोलन झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करायला हवी होती. पण ती झाली नाही”, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.


















