सातारा, दि. ५ : साताऱ्यातील परळी गावच्या गणेश मुर्तिकार अंजना शंकर कुंभार यांना स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रपती भवन आणि लाल किल्ल्यावर होणाऱ्या विशेष कार्यक्रमासाठी थेट राष्ट्रपती, पंतप्रधानांनी निमंत्रित केले आहे.
टपाल विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वतः त्यांच्या घरी जाऊन ही निमंत्रण पत्रिका नुकतीच त्यांना दिली. यासाठी त्यांचे गाव आणि जिल्ह्यातून अभिनंदन करण्यात येत आहे.
उद्योजिका म्हणून अंजना कुंभार यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. गावापासून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास राज्यभरात पोहोचला आणि देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत अंजना कुंभार यांची ही प्रेरणादायी कहाणी पोहोचली. त्यांच्या कार्याची दखल दिल्लीतील सर्वोच्च कार्यालयांनी घेतली.
या विशेष कामगिरीमुळे त्यांना १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावर होणाऱ्या ‘ध्वजारोहण’ सोहळ्यासाठी तसेच राष्ट्रपती भवनातील स्वागत समारंभासाठी ‘विशेष निमंत्रित’ म्हणून बोलावण्यात आले आहे. असा मान मिळवणार्या त्या जिल्ह्यातील एकमेव नवउद्योजिका आहेत.















