दि १ऑगस्ट २०२५ *चांगभलं*..*शीतल हरीष करदेकर* कार्यकारी संपादक, *द ग्लोबल टाईम्स*
*प्रस्तावना*
*”भारतीय असंतोषाचे जनक” , स्वराज्याचे पहिले आणि प्रबळ पुरस्कर्ते होते. तसेच ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक मजबूत जहालवादी नेते. प्रखर देशप्रेमी, ‘केसरी’ नावाप्रमाणेच त्यांचे अग्रलेख राजकीय पत्रकारितेचे अग्रणी! “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते मी मिळवणारच!” अशी गर्जना करणारे,सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? म्हणून खडसावून प्रश्न विचारणारे , जनजागृतीसाठी सार्वजनिक गणेशोत्सव,नवरात्रौत्सव या माध्यमातून कार्य करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक ! महात्मा गांधींनी त्यांना “आधुनिक भारताचा निर्माता” म्हटले.
*लो.टिळक यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन!* *लोकशाहीत ,संयुक्त महाराष्ट्र चळवळ जनमानसात रुजविण्याचे काम करणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!*
*आज पुन्हा नव्याने काही भरभरून लिहावसं वाटलं! इतिहासाचं स्मरण आणि ज्यांनी समाज,देशहितासाठी काम केलं..आपलं आयुष्य खर्ची घातलं अशा महान विभुत स्मरण सगळेच करतात!अलिकडे तर राजकीय स्वार्थापोटी त्यांच्या नावाचा उपयोग करतात! …पण खरच आपण त्यांच्या विचार व कार्याचा सन्मान करतो का हा विचार अस्वस्थ करतो!*
*आज पुन्हा सरकारला विचारावंसं वाटतंय,सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?*
चुकीच्या गोष्टींना पाठीशी घालणे, आणि डोळ्यावर झापडं लावून सरकारी बाबूंनी लिहून दिलेले रकाने विरोधक आणि जनतेसमोर टाकले की काम संपतं अशा भूमिकेत राहून काम करणारे जर वाढले तर, कसं जनहित साधणार आपण? सरकार नि विरोधक वादाचे बहुसंख्य विषय हेही विचार करायला लावणारे आहेत. असं म्हणण्यास पुर्ण वाव आहे!
जहाल राजकीय पत्रकारितेची केसरी लेखणी जर आज चालली असती तर, कदाचित टिळकांना लेखन करताना ‘पुनश्च हरिओम’ म्हणावं लागलं असतं! कारण आजची बहुसंख्य पत्रकारिता नेमस्त हून मवाळ आणि अगदी लोटांगणधारी झाली… प्रसार माध्यमाची संख्या, विविधता वाढली, मात्र गुणवत्ता ढासळली… लोकशाहीचे तीन स्तंभ अधिकृत आहेत मात्र चौथा स्तंभ अधिकृत नाही. हे कसलं गणित आहे कळत नाही असं नाही. पत्रकारांचं हितरक्षण करणं हे सरकार, प्रशासनाचे काम! पण ‘अधिकृतपणे जे नाही ते हळूवारपणे सांगण्याचे काम आमच्या ‘कामगार विभागा’ने केले!…’आहे हो असंघटित कामगारांचे महामंडळ आहे’,त्यात पत्रकार पत्रकारितेतील कर्मचारी आहेत! … इकडे तत्कालीन मुख्यमंत्री ‘भाऊ एकनाथ शिंदें’ नी ‘पत्रकार महामंडळ’ आश्वासन देऊन घोषित केले,मंत्रिमंडळाची मंजुरी घेतली.. आणि नंतर नवे मुख्यमंत्री ‘देवाभाऊ’ फडणवीस आले…सगळं गतीमान..तरीही निवांत!’अगा जे घडलेची नाही’ ,म्हणत ..थोड हसत सत्तेवर पकड घट्ट करत.. महाराष्ट्र वेगाने पुढे नेताना ; या यशात ‘लाडकी बहिण योजने’चा आणि घरोघरी लाडका भाऊ म्हणून प्रतिमा तयार झालेले एकनाथ शिंदें यांचा मोठा वाटा आहे हे थोडं मागे टाकत चाललेत! तर दुसरीकडे गुलाबी नं झपाटून महिला भगिनींसाठी काम करणारे अजितदादा आहेत..ट्रिपल इंजिन गतिमान करण्यात लाडकी बहिण योजना महत्त्वपूर्ण ठरली!.हे वास्तव!
*लाडकी बहिण विरोधकांच्या टिकेचा विषय बनली*
लाडकी बहिण योजना ,जर विरोधी पक्ष सत्तेवर असता तर अशी किंवा वेगळ्या प्रकारे वादाचा विषय ठरली असती का ? तर उत्तर , काही सांगता येणार नाही असंच येणार!
या योजनेअंतर्गत १४,००० पुरुषांना पैसे मिळाले; अजित पवार म्हणतात की, “सरकार पैसे वसूल करेल!” अगदी बरोबर आहे.नियम बाह्य काम झाल्यावर वसुल केले जातील असं योजनेअंतर्गत अर्ज भरताना लिहिलं आहे.
महाराष्ट्राच्या महिला आणि बालविकास विभागाने (WCD) केलेल्या ऑडिटमध्ये आढळून आले आहे की पुरुषांनी फसवणूक करून आर्थिक लाभ मिळवले आहेत. १४,२९८ पुरुषांना २१.४४ कोटी रुपये वितरित करण्यात आले. योजनेचा फसवा वापर सुरू झाल्यानंतर जवळजवळ १० महिन्यांनी उघडकीस आला. २,२००लाभार्थी सरकारी कर्मचारीही आहेत.
पहिल्या वर्षात अंदाजे १,६४० कोटी रुपयांचे नुकसान हे दुसरे कारण मोठ्या प्रमाणात अपात्र नोंदणी.
महिला आणि बाल विकास आयोगाच्या अहवालात असेही नमूद केले आहे की योजनेत प्रति कुटुंब जास्तीत जास्त दोन महिलांना लाभ देण्यास मर्यादा! असे असूनही, एकाच कुटुंबातील अधिक महिलांनी नोंदणी केल्याने एकूण ७.९७ लाखांहून अधिक महिलांची नोंदणी झाली होती. यामुळे सरकारी तिजोरीवर १,१९६ कोटी रुपयांचा बोजा पडला .
६५ वर्षांवरील सुमारे २.८७ लाख महिलांना लाभ मिळत आहेत, अंदाजे ४३१.७ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे चारचाकी वाहने असलेल्या कुटुंबातील १.६२ लाख महिलांचे नाव देखील लाभार्थी यादीत आढळली आहेत.
या निष्कर्षांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सखोल चौकशीची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा. सुप्रिया सुळेंनी केली. लोकांनी फॉर्म कसे भरले? त्यांना कोणी मदत केली? नोंदणीचे कंत्राट कोणत्या कंपनीला देण्यात आले? यामागे एक मोठे षडयंत्र आहे. कंपनीची चौकशी झाली पाहिजे आणि या प्रकरणाची एसआयटी किंवा ईडीकडून चौकशी झाली पाहिजे.” *हेही बरोबर!*
जानेवारीमध्ये, महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी सुधारात्मक कारवाई करण्याचे जाहीरपणे वचन दिले होते आणि सांगितले होते की ५ लाख अपात्र लाभार्थ्यांना प्रणालीतून काढून टाकण्यात आले आहे.जून २०२५ पासून, या २६.३४ लाख अर्जदारांचे फायदे तात्पुरते स्थगित करण्यात आले आहेत. … गरजू पात्र महिलांना पैसे मिळत आहेत…
*गरीब महिलांना मदत मिळायलाच हवी!*
आजवरच्या महिलांसाठीचे अनेक कायदे पहा.त्यांचा फायदा पिडीत महिलांपेक्षा चुकीचा उपयोग करण्यासाठी होत आलाय! यावर काम करणारे संख्येनं कमी आहेत! बहिण कोणाचीही असो ती अबला असहाय असता कामा नये. राज्याच्या मदत निधीतील मोठा हिस्सा संख्येत समान असणाऱ्या महिला हितासाठी व्हायला हवा! आपल्याकडे अनेकदा महिला हितासाठी आलेले पैसे वापरले न जाण्याचे प्रकार घडले आहेत. मग सध्या ही ‘लाडकी बहीण योजना ‘ वादासाठी अस्त्र का बनतेय? पुरोगामी महाराष्ट्रात असे वाद होण्यापेक्षा , या विषयावर अभ्यास करुन सुधारणा करणे गरजेचे आहे. असे खूप अभ्यासाचे विषय आहेत,त्यांना बाजुला करुन विधान भवनात फ्रिस्टाईल करणारे
चलचित्र पहाताना किती धन्य वाटत असेल जनतेला ?
*नग लोकप्रतिनिधींकडून काय अपेक्षा करावी लोकमान्य आम्ही?*
लोकांचा पैसा कुठे ,कधी ,कसा ,कोण वाया घालवतो यावर एक मोठी परिषद आझाद मैदानावर व्हावी! लोकांच्या मतांचा , पैशांचा किती अचुक उपयोग केला जातो याची नोंद व्हायला हवी.
खरा पत्रकार,पत्रकारितेचे दमन होते मग भ्रष्टाचार किती कुठे होतोय ? माणुसकीला चुड कुुठे लागतेय हे कसं समोर येणार?
जबाबदारी विसरुन स्वमग्न असलेले पदासाठी राजकारणात डुबलेले आमचे हित,भलं कसं नि कधी करणार?
श्रमिकांच्या हातावर, कष्टावर जग चालतं ; इथे ‘श्रमिक पत्रकार ‘ ही ओळख पुसून टाकत आहेत. पत्रकारितेला तिचे लोकशाहीने दिलेले चौथ्या स्तंभाचे हक्क , अधिकृत असण्याचा अधिकार न देण्यामागे षडयंत्र आहे. आणि म्हणूनच असं म्हणावसं वाटतं आदरणीय लोकमान्य टिळक की, इतका कचरा करुन ठेवलाय तर शेंगा खाऊन कोण गेलं हे न कळणं आणि सगळच दुर्लक्षित केलं जाणं…म्हणजेच लोकशाहीचा, स्वातंत्र्याचा अपमान आहे. …
“खरा गुलाल अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उधळला जाईल, जेव्हा ‘जाज्वल्य पत्रकारिता’ टिकेल !” *प्रत्येक माध्यमकर्मी समाजहितासाठी लिहिता बोलता राहिल!* *****






















