बोरिवली, कांदिवलीत पाणी बाणीला, 36 तासात पूर्ण विराम…!!
कांदिवली वार्ताहर
महावीर नगर वसंत कॉम्पलेक्स न्यू लिंक रोड जंक्शन ते मार्वे रोड मालाड मीठ चौकी जंक्शनपर्यंत भूमिगत नवीन १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी बदलण्याचे काम जल कामे विभागाने ३६ तासात युद्ध पातळीवर पूर्ण केले. सेंट्रल एजन्सी आणि आर /दक्षिण वार्ड मधिल जल विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या शब्दा प्रमाणे तब्बल दोन किलोमीटर आंतराची जलवाहिनी व इतर जोडण्या वेळेत पूर्ण करून दुसऱ्या दिवशी वेळेत पाणी पुरवठा केल्याने नागरिकांना फार मोठा दिलासा दिला आहे.
आर दक्षिण जलकामे विभागाचे सहाय्यक अभियंता आर एस गोडके, दुय्यम अभियंता सुरज पवार, सेंट्रल एजेंसी सहाय्यक अभियंता चंद्रशेखर मिटकरी, अभियंता शिवराज कालगे इतर सर्व अधिकारी आणि जवळपास ४५ कर्मचाऱ्यांनी अहोरात्र चिकाटीने काम करून २० फूट खोलवरील भूमिगत १२०० मिलीमीटर लिंक रोड च्या मुख्य सिग्नल मधोमध बदलण्याचे काम पूर्ण केले.
पालिकेच्या जल विभागाकडून
गुरुवार २ मे रोजी रात्री १० वाजता सुरु करण्यात आलेले काम ३ मे रोजी रात्रौ ११ वाजता पूर्ण करण्यात आले.यामुळे फक्त ३ मे रोजी नागरिकांना पाणी बाणीचा
सामना करावा लागला.४ मे रोजी कमी दाबाने पाणी पुरवठा करण्यात आला. सुरुवातीला थोडे गढूळ पाणी आले.मात्र पाणी वेळेत मिळाल्याने नागरिकांनी पालिकेचे आभार मानले.
सहाय्यक अभियंता आर एस गोडके आर /दक्षिण
जुनी जल वाहिनी बदलल्याने पाण्याच्या दाबात वाढ़ झाली. पाणी गळतीवर नियंत्रण आले.भविष्यात उदभवणाऱ्या अनेक समस्या कमी होतील.



















