*सरहद्द शौर्यथॉन- २०२५ च्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कारगिलमध्ये दाखल*
*’ऑपरेशन विजय’च्या २६ व्या विजयोत्सवात होणार सहभागी*
मुंबई दिनांक २१: भारतीय सैन्य दलांनी पाकिस्तानला पराभवाची धूळ चारत पराक्रमाची शर्थ करून जिंकलेल्या कारगिल युद्धाला २६ वर्षे पूर्ण होत असून कारगिल क्षेत्रातील द्रास येथे विशेष सरहद्द शौर्यथॉन म्हणजेच मेरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय सैन्यदल, सरहद्द संस्था पुणे आणि आरहम फाउंडेशन यांच्या पुढाकाराने पार पडणाऱ्या या शौर्यथॉनला झेंडा दाखवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः द्रास येथे होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
भारतीय सैन्य दलांचे शौर्य, धाडस आणि बलिदान यांना सलाम करण्यासाठी या शौर्यथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असून उद्या २२ जून रोजी द्रास येथील कारगिल वॉर मेमोरियल पासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
विशेष म्हणजे समुद्रसपाटीपासून १० हजार ८०० फूट उंचीवर ही मेरेथॉन स्पर्धा पार पडणार असून त्यात तीन हजार स्पर्धेक सहभागी होणार आहेत.
यातील पहिली 21. 097 किमीच्या सर्वात आव्हानात्मक दौड म्हणजेच ‘ऑपरेशन विजय दौड’ ही कारगिल वॉर मेमोरियलपासून सुरू होऊन वळसा घालून पुन्हा तिथेच येऊन संपेल. तर १० किमी लांबीची दुसरी दौड ही ‘टोलोलिंग दौड’ म्हणून ओळखली जाईल. तर तिसरी दौड ही ५ किमी लांबीची ‘टायगर हिल दौड’ म्हणून ओळखली जाईल, तर चौथी आणि शेवटची म्हणजे 3 किमी लांबीची ‘फ्युचर हिरोज दौड’ असेल.
भारतीय सैन्य दलांनी कारगिल युद्धात दाखवलेले अतुलनीय धाडस आणि सर्वोच्च बलिदानाला मानवंदना देण्यासाठी तसेच त्यांची आठवण सदैव आपल्यासोबत रहावी यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमानंतर कारगिल येथील शहीद जवानांच्या स्मृती स्थळाला भेट देऊन ते या जवानांना मानवंदना देतील.
कारगिल युद्धाला उद्या २६ वर्षे पूर्ण होत असली तरीही या युद्धाच्या आठवणी आजही आपल्या मनात जिवंत आहेत. ज्या शूर जवानांनी या युद्धात आपल्या प्राणांची आहुती देऊन मातृभूमीचे रक्षण केले त्यांच्या स्मृतींना या सरहद्द शौर्यथॉनच्या माध्यमातून अनोखी मानवंदना देण्यात येणार असून त्यांना मानवंदना देऊन त्यांच्याप्रती भारतीय नागरिक म्हणून आपल्या संवेदना व्यक्त करून आपले कर्तव्य पूर्ण करण्यासाठीच उपमुख्यमंत्री शिंदे हे या सोहळ्यात सहभागी होत आहेत.






















