Home पुणे पुण्यातील भुकुममधील वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरण: आरोपींवर कडक कारवाई करण्याची शिवसेना महिला सेनेतर्फे...

पुण्यातील भुकुममधील वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरण: आरोपींवर कडक कारवाई करण्याची शिवसेना महिला सेनेतर्फे राज्य पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला यांच्याकडे आग्रही मागणी, पोलिस तपासावर प्रश्नचिन्ह (?)*

280
0

*पुण्यातील भुकुममधील वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरण: आरोपींवर कडक कारवाई करण्याची शिवसेना महिला सेनेतर्फे राज्य पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला यांच्याकडे आग्रही मागणी, पोलिस तपासावर प्रश्नचिन्ह (?)*

प्रतिनिधि:
मुंबई, २२ मे:
पुणे जिल्ह्यातील भुकुम (ता. मुळशी) येथील २३ वर्षीय वैष्णवी शशांक हगवणे हिचा संशयास्पद मृत्यू आणि त्यासंबंधित कौटुंबिक छळाचे प्रकरण आता अधिक गंभीर वळणावर आले आहे. वैष्णवीच्या मृत्यूप्रकरणी तिच्या पतीसह सासरच्यांवर गंभीर आरोप करण्यात आले असून, तिच्या कुटुंबीयांनी हे आत्महत्या नसून थेट खून असल्याचा दावा केला आहे.

१६ मे रोजी वैष्णवीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. पोस्टमार्टम अहवालातही तिच्या शरीरावर मारहाणीचे स्पष्ट व्रण आढळले असून, दोन कोटी रुपयांच्या मागणीसाठी तिचा खून करण्यात आल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. मृत्यूपूर्वी वैष्णवीने आपल्यावर होत असलेल्या शारीरिक आणि मानसिक छळाबाबत राज्य महिला आयोग व स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र, संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी वेळेवर कारवाई न केल्याने तिचा जीव गेला, असा आरोपही कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी वैष्णवीचा पती, सासू व नणंदेला अटक केली असली तरी दीर व सासरा अद्याप फरार आहेत. पोलिसांनी फरार आरोपींना तात्काळ अटक करून तपासात वेग आणावा, अशी जोरदार मागणी वैष्णवीच्या कुटुंबीयांनी केली आहे.

याशिवाय, मृत वैष्णवीच्या मोठ्या जावेलाही सासरच्या मंडळींकडून मारहाण व छळ सहन करावा लागत असल्याचे समोर आले असून, तिच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिस प्रशासनाने घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

प्रकरणातील आरोपींचे राजकीय संबंध असल्याने पोलिस यंत्रणा त्यांच्यावर ठोस कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याची जोरदार चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे. त्यामुळेच या प्रकरणात कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता, सखोल व निष्पक्ष तपास करून सर्व दोषींवर भारतीय न्याय संहितेतील कठोर कलमांखाली तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी राज्यातील पोलीस महासंचालक श्रीमती रश्मि शुक्ला यांच्याकडे करण्यात आली आहे.

वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यूप्रकरणात न्याय मिळाला नाही, तर हा एक धोक्याचा संदेश ठरेल आणि समाजात अशा प्रकारच्या छळाच्या घटनांना बळ मिळेल, अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
या शिष्टमंडळात शिवसेना नेत्या मीना कांबळी, शिवसेना सचिव व प्रवक्त्या आमदार मनीषा कायंदे, उपनेत्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे, उपनेत्या तृष्णा विश्वासराव, संध्या दोशी, व मुंबईतील असंख्य नगरसेविका व महिला सेना पदाधिकारी उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here