Home Uncategorized *”ऊसतोड व घरकामगारांसाठी विशेष नोंदणी मोहिम राबवा”; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे...

*”ऊसतोड व घरकामगारांसाठी विशेष नोंदणी मोहिम राबवा”; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश*

79
0

अहिल्यानगर, दि. १५ मे : अहिल्यानगर जिल्ह्यातील ऊसतोड व घरकामगारांना शासकीय योजनांचा थेट लाभ मिळावा, त्यांच्या आरोग्य, सुरक्षा व सामाजिक सक्षमीकरणासाठी पायाभूत सुविधा मिळाव्यात, यासाठी विशेष नोंदणी कँपचे आयोजन करून ही प्रक्रिया मोहिम स्तरावर राबवावी, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.

शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त प्रविण कोरगंटीवार, कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. वीरेंद्र बडदे आदी उपस्थित होते.

*कामगारांसाठी कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवा*

डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, ऊसतोड व घरकामगारांची नोंदणी गतीने पूर्ण करावी. त्यांच्यासाठी आरोग्य शिबिरे घ्यावीत, तसेच आरोग्य व अपघात विम्याचा लाभ देण्यासाठी आवश्यक प्रस्ताव तयार करून सादर करावा.

महिला व बालकल्याण विभागासाठी वार्षिक योजनेतील राखीव निधीतून अत्याचारग्रस्त महिलांना तातडीची मदत, समुपदेशन व मनोधैर्य योजनेचा लाभ त्वरित मिळेल याची खात्री करावी.

*बालस्नेही पोलीस ठाणे आणि भरोसा सेल सशक्त करा*

बालकांवरील अत्याचाराच्या घटनांवर तत्काळ व संवेदनशील कार्यवाही होण्यासाठी जिल्ह्यात पाच बालस्नेही पोलीस ठाण्यांचे प्रस्ताव सादर करावेत. तसेच, भरोसा सेलचे सक्षमीकरण करावे व गरजेनुसार ऑनलाईन भरोसा सेल सुरू करावेत. महिला पोलीस कर्मचाऱ्यांना मानवीदृष्टीकोनातून सेवा देण्यासाठी प्रशिक्षण देण्यात यावे.

शाळा व महाविद्यालयांमध्ये अँटी-रॅगिंग सेल व अंमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रम राबवावे. विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रांच्या गरजांसाठी समाधान शिबिरे आयोजित करावीत. ‘सखी सावित्री समिती’साठी कार्यपद्धती निश्चित करावी, जेणेकरून इतर जिल्ह्यांनाही याचा फायदा होईल, असे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सुचवले

*पर्यटकांसाठी मदत सेवा केंद्र सुरू करा*

जिल्ह्यातील पर्यटनस्थळी येणाऱ्या पर्यटकांना मदतीसाठी तक्रार निवारण सेवा केंद्र उभारण्यात यावेत. त्यासाठी स्वतंत्र नोडल अधिकारी नियुक्त करावा. लोकशाही दिनामध्ये महिलांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र वेळ राखीव ठेवून त्यांचे तातडीने निराकरण करावे, असेही त्यांनी सुचवले.

बैठकीच्या शेवटी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जिल्ह्यातील विविध योजनांची माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here